-
सीडीएस बिपिन रावत यांना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर तामिळनाडूत कोसळलं, घटनास्थळावरचे विदारक फोटो आले समोर!
-
तामिळनाडूच्या कुन्नूर भागामध्ये वायूदलाचं हेलिकॉप्टर कोसळल्याचं धक्कादायक वृत्त बुधवारी सकाळी समोर आलं. या हेलिकॉप्टरमध्ये एकूण १४ जण प्रवास करत होते.
-
हे हेलिकॉप्टर दिल्लीतील लष्कराच्या एअर बेसवरून कुन्नूरच्या दिशेनं जात होतं. मात्र, दुपारी साडेबाराच्या सुमारास हे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं.
-
या विमानातून तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख अर्थात चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत हे प्रवास करत असल्याची माहिती समोर आली. रावत यांच्यासोबतच लष्कराचे इतरही काही मोठे अधिकारी या हेलिकॉप्टरमध्ये होते.
-
हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर तिथे तातडीने स्थानिक प्रशासनाकडून बचावकार्य हाती घेण्यात आलं. या दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्या प्रवाशांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
-
हेलिकॉप्टर कुन्नूर परिसरातल्या निलगिरी या डोंगराळ भागात दुर्घटनाग्रस्त झाल्यामुळे तिथे बचावकार्य करण्यासाठी बऱ्याच अडचणी येत होत्या.
-
हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर त्यानं पेट घेतला. त्यामुळे विमान विझवण्यासाठी तातडीने हालचाली करण्यात आल्या.
-
IAF MI-17V5 या श्रेणीतलं हे हेलिकॉप्टर होतं. लष्करातील किंवा इतर कोणत्याही व्हीआयपींच्या प्रवासासाठी अशा प्रकारच्या हेलिकॉप्टर्सचा वापर केला जातो. त्यामुळे या हेलिकॉप्टर्समध्ये सर्व प्रकारच्या सुरक्षेच्या उपाययोजनांची काळजी घेतली जाते.
-
दरम्यान, एवढा सुरक्षित हेलिकॉप्टरचा देखील अपघात झाल्यामुळे लष्करानं तातडीने या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत.
-
हेलिकॉप्टरचा अपघात नेमका कसा झाला, यासाठी आता हेलिकॉप्टरमधील ब्लॅक बॉक्स उघडल्यानंतर अधिक माहिती मिळू शकेल, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
-
या हेलिकॉप्टरमध्ये सैन्यदलाचे प्रमुख बिपीन रावत हे वेलिंगटनला निघाले होते. तिथे सैन्यादलातील प्रशिक्षणार्थींशी ते संवाद साधणार होते.
-
हेलिकॉप्टरमघ्ये बिपीन रावत यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मधुलिका रावत, ब्रिगेडियर लिडर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, नायक गुरसेवक सिंग, नायक जितेंद्र, लान्स नायक विवेक कुमार, लान्स नायक बी साई तेजा आणि हवालदार सतपाल हे प्रवास करत होते.
-
या दुर्घटनेचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र तांत्रिक कारणामुळे दुर्घटना झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
-
भारतीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टर अपघाताच्या ठिकाणावर मोठ्या प्रमाणावर आग लागल्याचे आणि स्थानिक लोक तात्काळ बचाव कार्यात मदत करत असल्याचे दिसून आले.
-
या अपघातासंदर्भात देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तातडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती दिली आहे.

‘छावा’च्या कलेक्शनमध्ये ९ व्या दिवशी मोठी वाढ! दुसऱ्या शनिवारी कमावले तब्बल…; ‘या’ ३ शहरांमध्ये सर्वाधिक कमाई