-
शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं रविवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात निधन झालं. त्यांच्या निधनावर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
-
विनायक मेटे यांच्या निधनामुळे मराठा समाजाचं मोठं नुकसान झाल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून उमटत असून अनेक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.(फोटो – नरेंद्र वासकर)
-
रविवारी पहाटे ५ च्या सुमारास मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मडप बोगद्याजवळ विनायक मेटेंच्या कारला भीषण अपघात झाला. मात्र, अपघातानंतर जवळपास तासाभराने घटनास्थळावर रुग्णवाहिका पोहोचल्याचा दावा त्यांच्या सहकाऱ्याने केला आहे.(फोटो – नरेंद्र वासकर)
-
विनायक मेटे यांच्यासोबत अपघातावेळी गाडीमध्ये दोन जण होते. यामध्ये त्यांचा बॉडीगार्ड आणि त्यांचा सहकारी यांचा समावेश आहे. त्यांच्या बॉडीगार्डची प्रकृतीही गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या सहकाऱ्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.(फोटो – नरेंद्र वासकर)
-
विनायक मेटेंसोबत असणारे त्यांचे सहकारी एकनाथ कदम यांनी एबीपीशी बोलताना नेमका अपघात कसा झाला, याचा घटनाक्रम सांगितला आहे.
-
एकनाथ कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, विनायक मेटे आणि त्यांचे सहकारी बीडवरून मुंबईच्या दिशेने येत होते. पहाटे ५ च्या सुमारास त्यांची कार एमएच ०१ डीपी ६३६४ ला एका मोठ्या ट्रकनं बाजूने धडक दिली.
-
ट्रकने धडक दिल्यानंतर कारचालकाचं नियंत्रण सुटलं. त्यातून झालेल्या अपघातामध्ये कारचा अक्षरश: चुराडा झाल्याचं घटनास्थळावरील छायाचित्रांवरून स्पष्टपणे दिसत आहे.
-
“आमचा अपघात ५ वाजता झाला. पण मदत पोहोचण्यासाठी एक तास लागला. मी फोन केला तेव्हा कंट्रोल रूमवरच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने प्रतिसाद दिला नाही. जवळपास ६ वाजता रुग्णवाहिका आली”, असा दावा त्यांचे सहकारी एकनाथ कदम यांनी केला आहे.(फोटो – नरेंद्र वासकर)
-
दरम्यान, चालक मुंबईच्या दिशेने कार नेत असताना त्यांचा गाडीवरील ताबा सुटला आणि कारने पुढे जाणाऱ्या दुसऱ्या वाहनाला धडक दिल्यामुळे हा अपघात झाल्याचं महामार्ग पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
-
या सगळ्या प्रकारावर प्रतिक्रिया देताना अपघाताची चौकशी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.(फोटो – नरेंद्र वासकर)
-
दरम्यान, एकीकडे अपघातामध्ये घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला जात असताना दुसरीकडे अजित पवार यांनी चालकाच्या डुलकीमुळेच हा अपघात झाला असण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
-
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर राजकीय वर्तुळातील अनेक नेतेमंडळींनी कामोठे रुग्णालयात जाऊन विनायक मेटे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं.
-
विनायक मेटेंनी आपल्याला शनिवारी रात्री सव्वादोन वाजता मेसेज करून आपण उद्या बोलू, असं म्हटल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.(फोटो – नरेंद्र वासकर)
-
रविवारी दुपारी मराठा आरक्षणासंदर्भात बोलावलेल्या बैठकीसाठी विनायक मेटे बीडहून मुंबईच्या दिशेने निघाले असताना हा अपघात झाला आहे.
-
रुग्णालयात विनायक मेटेंना उपचारांसाठी दाखल करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना तपासणी केल्यानंतर मृत घोषित केलं.

४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी