-
टाळ मृदंगच्या गजरात आणि ज्ञानोबा-तुकारामाच्या अखंड जयघोषात संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झाला. ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या गजराने अवघी उद्योगनगरी दुमदुमून निघाली होती. (फोटो – लोकसत्ता टीम)
-
संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने शनिवारी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. मुख्य मंदिराला प्रदक्षणा घातल्यानंतर पालखीचा पहिला मुक्काम देहूतीलच इनामदार वाड्यात झाला. रविवारी सकाळी शासकीय पूजा करण्यात आली. देहूकरांनी मुख्य कमानीवरून पालखीवर पुष्पवृष्टी केली. त्यानंतर पालखी पिंपरी-चिंचवड शहराच्या दिशेने मार्गस्थ झाली. (फोटो – लोकसत्ता टीम)
-
ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजरात लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत सायंकाळी पालखी शहरात दाखल झाली. पालखी सोहळ्यामुळे सर्व परिसर भक्तिमय झाल्याचे पहायला मिळाले. यावेळी शहरातील अनेक नागरिक संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पाहण्यासाठी आले होते, सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले होते. आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात पालखीचा आजचा मुक्कामी आहे. सोमवारी सकाळी पालखी पुण्याकडे मार्गस्थ होणार आहे. (फोटो – लोकसत्ता टीम)
-
पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून पालखीचे स्वागत करण्यात आले. निगडीतील भक्ती-शक्ती चौकात स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. दिंडी प्रमुखांना पालिकेच्या वतीने कापडी शबनम पिशवी, त्यामध्ये माहिती पुस्तिका, आरोग्य किट देऊन सन्मान करण्यात आला. आमदार महेश लांडगे, आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मुख्य रथाचे सारथ्य केले. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, शहर अभियंता मकरंद निकम आदी उपस्थित होते. (फोटो – लोकसत्ता टीम)
-
पर्यावरणाबाबत जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने हरित वारी, निर्मल वारी हा संदेश पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने देण्यात आला. त्याअंतर्गत पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांना पालिकेच्या वतीने साग, रक्तचंदन, बहावा, अर्जुन, करंज, जांभुळ, आंबा, चिंच, विलायती चिंच, गुलमोहर प्रकारच्या वृक्षांच्या एक लाख बियांच्या कागदी पाकिटांचे वाटप करण्यात आले. (फोटो – लोकसत्ता टीम)
-
पुणे जिल्हापरिषदेकडून निर्मलवारीसाठी यंत्रणा सज्ज ठेवली असून जगद्गुरू संत तुकाराम पालखी सोहळा पंढरीकडे मार्गस्थ झाल्यानंतर देहू नगरीतील रस्त्यासंची त्वरीत स्वच्छता करण्यात आली. १४ टन ओला कचरा व इतर कचरा, तसेच ६५० किलो प्लास्टिक कचरा संकलित करण्यात आला. (फोटो – Info Pune ट्विटर)
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2023/06/rohit-pawar-4.jpg?w=737)