-
पुण्यातील सदाशिव पेठेत मंगळवारी (२७ जून) सकाळी साडेनऊच्या दरम्यान एका तरुणीवर जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यात तरुणी थोडक्यात बचावली आहे. पीडितेवर प्राथमिक उपचार करून तिला डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर पोलिसांनी हल्लेखोराला अटक करून विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. शंतनु लक्ष्मण जाधव (वय २२) असं आरोपीचं नाव असून तो मुळशी तालुक्यातील डोंगरगाव येथील रहिवाशी आहे. (सर्व फोटो – लाशपाल जवाळगे instagram)
-
दरम्यान, हा थरारक प्रकार घडला तेव्हा सदाशिव पेठेत रहदारी होती. हातात कोयता घेऊन एक तरुण तरुणीच्या दिशेने धावत सुटला तरीही त्याला थांबवण्याचं सौजन्य वा धाडस एकाही पादचाऱ्याने केलं नाही.
-
तरुणीचा जीव धोक्यात आहे हे कळताच एमपीएससीची तयारी करणारा लेशपाल जवळगे याने आपल्या जीवाची पर्वा न करता पीडितेच्या मदतीला धावून गेला.
-
पीडिता स्वतःचा जीव वाचवण्याकरता एका दुकानाच्या आडोशाला लपली होती. हल्लेखोर तिच्यावर कोयत्याने हल्ला करणार तेवढ्यात लेशपाल जवळगे याने त्याचा हल्ला रोखून धरला. हल्लेखोराचा हात मागच्या मागे धरून ठेवत त्याने पीडितेचा जीव वाचवला. यावेळी त्याच्या मदतीला हर्षल पाटील नावाचा युवकही धावून आला.
-
लेशपाल जवळगेने दाखवलेल्या प्रसंगावधानतेमुळे त्याचं सर्वत्र कौतुक होतंय. राज ठाकरेंपासून, जितेंद्र आव्हाडांपर्यंत सर्वांनी त्याचं कौतुक केलंय. त्यामुळे लेशपाल जवळगे नक्की कोण आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकाला लागली आहे.
-
लेशपाल जवळगेने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तो मेकॅनिकल इंजिनिअर असल्याचं सांगितलं आहे. तसंच, तो पीएसआय बनण्यासाठी पुण्यात अभ्यास करत असल्याची माहिती त्याने एका मुलाखतीत आज दिली होती.
-
“पीएसआयची तयारी करतोय.स्वप्न पीएसआयचं आहे तर ही जबाबदारीच आहे आपली, पुढे जाऊन हेच करायचं आहे”, असंही लेशपाल जवळगे म्हणाला.
-
“सगळीकडून कौतुक होतंय खरं, पण हे माझं कर्तव्य होतं, उलट तुम्ही माझं कौतुक करून उपकाराची भावना दाखवताय. मी त्या ताईवर उपकार नाहीत केले, मी माझं कर्तव्य पार पाडलं. तरीही सर्वांचे खुप खूप आभार, अशी फेसबूक पोस्टही लेशपालने लिहिली होती.
-
“मी खोलीमध्ये जाऊन खूप रडलो. कारण अजून ३ सेकंद मला वेळ झाला असता तर मला सर्वांना सांगावं लागलं असतं की तिचा खून कसा झाला? आणि असं झालं असतं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो”, असंही लेशपालने सांगितलं.
-
पोलिसांनी हल्लेखोराला अटक करून विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. शंतनु लक्ष्मण जाधव (वय २२) असं आरोपीचं नाव असून तो मुळशी तालुक्यातील डोंगरगाव येथील रहिवाशी आहे.
-
“पीडित विद्यार्थिनी आणि आरोपी तरुण दोघंही एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत होते. दोघांमध्ये चांगली मैत्री होती, पण कालांतराने त्यांच्यात काही मतभेद झाले. दोघांमधील मैत्री पुढेही कायम ठेवण्याची मागणी आरोपीनं पीडित मुलीकडे केली. पण मुलीने आरोपीच्या मागणीला नकार दिला. यामुळे आरोपीला पीडितेचा राग आला. दरम्यानच्या काळात पीडित मुलगी पुण्याला राहायला आली आणि ती ‘इंटेरिअर डिझाइन’चा कोर्स करू लागली. त्यानंतर आरोपीही पुण्यात आला आणि त्याने तिचा पाठलाग सुरू केला. त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण पीडितेनं आरोपीशी बोलण्यास नकार दिला. याच रागातून आरोपीनं तिच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला,” असा घटनाक्रम डीसीपी संदीप गिल यांनी सांगितला.
-
“काल पुण्यात एका तरुणीवर हल्ल्याची दुर्दैवी घटना घडली. भररस्त्यात बाकीचे लोकं बघत असताना लेशपाल जवळगे नावाचा तरुण तिथे होता म्हणून ती तरुणी बचावली. लेशपालने जे धाडस दाखवलं त्याबद्दल त्याचं मनापासून कौतुक, पण आसपास इतकी लोकं बघ्याच्या भूमिकेत का गेली किंवा जातात ह्याचं आश्चर्य वाटतं. अर्थात पुढे कशाला चौकशीचा ससेमिरा असा विचार लोकांच्या मनात येत असेलही कदाचित पण ह्यासाठी पोलिसांनी लोकांना आश्वस्त करायला हवं”, असं ट्वीट राज ठाकरेंनी केलं होतं. यावेळी त्यांनी लेशपालचं कौतुकही केलं.
-
तसंच, राष्ट्रावादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ५१ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
-
“ही सामाजिक विकृती आहे की तो कोयता घेऊन मागून पळतोय आणि पोरगी ओरडत वाचवा म्हणून पळतेय, तरी लोक बघत बसलेत. तिला वाचवायचं सोडून लोक आजूबाजूला सरकले”, असा संतापही लेशपालने एका मुलाखतीत व्यक्त केला होता.
-
हा प्रकार घडल्यानंतर त्याला अनेकांनी अनेक प्रश्न विचारले. यावर त्याने इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट केली आहे. “त्या मुलीची आणि मुलाची जात कुठली होती असं मला DM करून विचारणाऱ्या सडक्या बुद्धीजीवांनो विनंती आहे की ते मेसेज डिलिट करा. ना तुम्ही तुमच्या जातीचे होऊ शकता. ना ही समाजाचे. कीड लागली आहे तुमच्या वरचा थोड्याफार असलेल्या भागाला”, असं तो पोस्टमध्ये उद्विग्नपणे म्हणाला.
४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी