-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बरोब्बर वर्षभरापूर्वी म्हणजेच ३० जून २०२२ रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आणि कधीकाळी मुख्यमंत्री पद मिरवणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीला यश आल्याने राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर येऊ शकले. त्या सत्तास्थापनेला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. भाजपा महाराष्ट्राचा महत्त्वाचा चेहरा असलेले, पक्षाच्या राष्ट्रीय पातळीवर विश्वास निर्माण करणारे, अभ्यासू आणि हुशार अशी ख्याती असलेले देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाले तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी हे पद का स्वीकारलं आणि त्या सायंकाळी नेमकं काय घडलं ते वाचा.
-
राज्यात एकनाथ शिंदेंचं बंड यशस्वी ठरल्यानंतर उद्धव ठाकरेंना पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर अपेक्षेप्रमाणे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असल्याचीच चर्चा सगळीकडे ऐकायला मिळत होती. यासंदर्भात फडणवीसांनीच राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावाही केला होता.
-
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी याबाबत माहिती देण्यासाठी जाहीर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी तर एकनाथ शिंदेंची उपमुख्यमंत्रीपदी घोषणा होणार असल्याचंही ठामपणे सांगितलं जात होतं. मात्र, देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेत वेगळीच घोषणा केली आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला.
-
स्वत: मुख्यमंत्रीपदी बसण्याऐवजी देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंचीच मुख्यमंत्री म्हणून घोषणा केली, तसेच आपण कोणतंही सत्तेचं पद घेणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलं. यामुळे तर्क-वितर्कांना अजूनच उधाण आलं.
-
फडणवीसांवर प्रचंड दबाव असल्याचं बोललं जात होतं. काही वेळातच फडणवीसांनी दुसरी घोषणा केली. यानुसार, ते स्वत: राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी बसणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. त्यामुळे पुन्हा चर्चेला सुरुवात झाली. या सर्व प्रकरणावर रिपब्लिक टीव्हीवर बोलताना फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
-
“मी उपमुख्यमंत्री का झालो? भाजपानं बनवलं म्हणून. माझं अस्तित्वच भाजपामुळे आहे. भाजपा हटली, तर माझं काहीच अस्तित्व नाहीये. त्यामुळे माझा पक्ष मला जे सांगेल, ते मी करेन. माझ्या पक्षानं तर उपमुख्यमंत्री करून माझा सन्मान केला. त्यांनी मला चपराशी बनायला सांगितलं असतं तरी मी झालो असतो”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.
-
“मी म्हणालो होतो की मला सरकारमध्ये कोणतंही पद नकोय. मी पक्षाला सांगितलं होतं, यानं असा संदेश जाईल की मी पदासाठी इतका लोभी झालोय की मुख्यमंत्री होतो, उपमुख्यमंत्री झालो. त्यामुळे मला पक्षसंघटनेतलं काम द्या. तसंच ठरलं होतं”, असं फडणवीस म्हणाले.
-
“पण नंतर आमच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाली. त्यांना असं वाटलं की आघाडी सरकार आहे. याला चालवायला हवं. त्यासाठी कुणीतरी अनुभवी तिथे असायला हवं. त्यामुळे त्यांनी मला आदेश दिला. पण उपमुख्यमंत्रीपदी बसायचंय हा माझ्यासाठी धक्का होता”, असंही फडणवीसांनी सांगितलं.
-
उपमुख्यमंत्रीपदाचा निर्णय धक्कादायक का होता, यावर फडणवीसांनी यावेळी भाष्य केलं आहे. “त्यावेळी माझी मनस्थिती पक्ष चालवण्याची झाली होती. मग अचानक मला उपमुख्यमंत्री बनायला सांगितलं गेलं. आज जर तुम्ही मला विचाराल, तर मी म्हणेन आमच्या नेत्यांचा निर्णय योग्यच होता.”
-
“कारण आज मी तिथे आहे, म्हणून आमच्या पक्षाचा अजेंडा व्यवस्थित चालवतोय. आमच्या पक्षाला सांभाळतोय. आमच्या सरकारला माझ्या अनुभवाचा फायदा मिळतो. त्यामुळे त्या वेळी घेतलेला निर्णय योग्यच होता”, असंही फडणवीसांनी यावेळी नमूद केलं.
-
तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सत्तास्थापनेचा दावा करून आल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत ते काय म्हणाले ते पुढच्या फोटो कॅप्शनमध्ये वाचा.
-
देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, “२०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या ५६ जागांसह भाजपा-शिवसेना युतीने १६१ जागा जिंकल्या. अपक्ष मिळून १७० लोक निवडून आले होते.”
-
“यावेळी ही अपेक्षा होती की भाजपा आणि शिवसेना युतीचं सरकार तयार होईल. तेव्हा मोदींनी सर्वांच्या उपस्थितीने भाजपाचा मुख्यमंत्री बनेल अशी घोषणाही केली होती. निकाल आल्यानंतर तेव्हाचे आमचे मित्र आणि शिवसेनेच्या नेत्यांनी वेगळा निर्णय घेतला”, असंही फडणवीस म्हणाले.
-
“बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांचा आजन्म विरोध केला, हिंदुत्वाचा विरोध केला, सावरकरांचा विरोध केला अशा काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती करुन भाजपाला बाहेर ठेवले. हा जनमताचा अपमान होता”, असं फडणवीस म्हणाले होते.
-
“जनतेनं महाविकास आघाडीला मते दिली नव्हती. मतं युतीला दिली होती. जनमताचा अपमान करून महाविकास आघाडी जन्माला आली. चालू कामांना स्थगिती, नवी विकास योजना नाही, प्रचंड भ्रष्टाचार आपल्याला पहायला मिळाला,” असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं होतं.
-
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, “आज एकनाथ शिंदे यांच्या नेृत्वाखाली शिवसेनेचा विधीमंडळ गट, आम्ही भाजप आणि १६ अपक्ष-छोटे आमदार सोबत आलो आहोत. आणखी काही सोबत येत आहे.”
-
“भाजपाने एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होतील. आज साडेसात वाजता एकनाथ शिंदे यांचा एकट्याचाच शपधविधी होईल”, असं फडणवीसांनी स्पष्ट केलं होतं.
-
“लवकरच आम्ही मंत्रिमंडळ विस्तार करू. या विस्तारात शिंदे यांच्यासोबत असलेले, अपक्ष आणि भाजपाचे सर्व लोक मंत्रिमंडळात येतील.”
-
“मी स्वत: बाहेर असेन. पण हे सरकार पूर्ण, व्यवस्थित चालले पाहिजे ही जबाबदारी माझीदेखील असेल. त्यासाठी पूर्ण साथ आणि समर्थन मी या सरकारला देणार आहे,” अशी माहितीही फडणवीस यांनी दिली.
-
“मी मंत्रीमंडळातून बाहेर असेन”, अशी घोषणा करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी पुढच्या काही मिनिटांतच निर्णय बदलला. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्याने देवेंद्र फडणवीस नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या रंगल्या होत्या.
-
त्यांची नाराजी दूर करण्याकरता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मध्यस्ती केल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात होतं. त्यानंतर, अमित शाहांनी ट्वीट करत महराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची धुरा देवेंद्र फडणवीस सांभाळणार असल्याचं जाहीर केलं.
-
याच पत्रकार परिषदेत त्यांना कार्यकर्त्यांची माफीही मागितली होती. देवेंद्र फडणवीस म्हणाले,
-
“मी आमच्या तमाम कार्यकर्त्यांना विनंती करणार आहे. पाऊस खूप आहे, मांडव टाकलेला नाही. कुणालाही निमंत्रण जाऊ शकत नाही. छोटा शपथविधी सोहळ होत आहे. म्हणून मी सर्व कार्यकर्त्यांची माफी मागतो.”
-
“भाजपाचे कार्यकर्ते असतील, एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे कार्यकर्ते असतील कुणालाही या ठिकाणी प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे कुणीही येथे येण्याचा प्रयत्न करू नये”, असं फडणवीस म्हणाले होते.
-
एकनाथ शिंदे शपथ घेण्यासाठी राजभवन सभागृहाच्या मंचावर आले तेव्हा शिंदे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्या नावाच्या घोषणा देण्यात आल्या. एकनाथ शिंदे यांनी देखील मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना सुरुवातीला बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांच्या नावाचा उल्लेख केला. यावेळी शिंदे समर्थकांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळाला. स्वतः एकनाथ शिंदे यांना शपथ घेताना समर्थकांना शांत बसण्यास सांगावं लागलं.
-
३० जून सायंकाळी घडलेल्या या नाट्यमय घडामोडींनंतर राज्यात शिंदेशाही सरकार सत्तेवर आलं.
-
कधीकाळी मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस चक्क उपमुख्यमंत्री झाले यावरून त्यांच्यावर अनेकांनी टीकाही केली. शरद पवारांनीही उपमुख्यमंत्री झालेला पहिला मुख्यमंत्री पाहिला अशी मिश्किल टीप्पणी केली होती.
-
दरम्यान, इंडियन एक्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत बोलताना एकनाथ शिंदे माझे बॉस आहेत, असं फडणवीस म्हणालेत.
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”