-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्याने दोन गट निर्माण झाले आहेत. अजित पवार आणि शरद पवार अशा दोन गटांत आता शाब्दिक युद्ध सुरू झालं आहे. दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवारांनी काल (८ जुलै) नाशिक दौरा केला. यावेळी त्यांनी येवल्यात घेतलेल्या जाहीर सभेत छगन भुजबळांवर निशाणा साधला. शरद पवारांच्या आरोपांवर प्रत्युत्तर म्हणून छगन भुजबळांनीही आज नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधून राष्ट्रावादीतील अंतर्गत बाबी माध्यमांसमोर ठेवल्या आहेत.
-
“हे (बंडखोरी) झालं कुठून. साहेब तुमच्या घरातून झालं. ६१-६२ वर्षे तुम्ही ज्यांना सांभाळलंत ते अजित पवार का गेले? ही सगळी मंडळी का गेली याचा विचार करा ना. दिल्लीत अनेक वर्षांपासून असलेले खासदार, मंत्री प्रफुल्ल पटेल का जातात? या अगोदर सोनिया गांधी, मोदींसोबत चर्चा करण्याकरता पवारसाहेब प्रफुल्ल पटेलांना पाठवत होते. ते पटेलसुद्धा गेले. पण का गेले? याचा विचार करायला पाहिजे. पवारसाहेबांना वाटतंय, हे सगळं छगन भुजबळने घडवून आणलंय. ही चुकीची कल्पना आहे, हे पवार साहेबांनाही माहितेय”, असं छगन भुजबळ म्हणाले.
-
“२०१४ साली भाजपाने निवडणुकीच्या वेळेला शिवसेनेला सोडलं. तेव्हाच पवारसाहेब कबूल झाले होते की तुम्ही (भाजपाने) शिवसेनेला सोडलं की आम्ही काँग्रेसला सोडू. निवडणुकीनंतर काही महिन्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा सरकारमध्ये प्रवेश होईल. त्याप्रमाणे आपण पाहिलं की आम्ही काँग्रेसपासून दूर झालो आणि शिवसेनेला भाजपासोबत दूर केलं. आणि सर्व स्वतंत्र लढलो. भाजपाला कमी संख्या होती आमदारांची. तेव्हा आम्ही बाहेरून पाठिंबा दिला. अचानक त्यांनी (शरद पवारांनी) सांगितलं की आमचा पाठिंबा ग्राह्य धरू नका. त्यानंतर फडणवीसांनी शिवसेनेचे काही मंत्री घेतले. पण या सर्व चर्चेत मी नव्हतो. पहिल्यापासून या चर्चा प्रफुल्ल पटेल, अजित पवार, पवारसाहेब हीच मंडळी करत होते”, असंही छगन भुजबळ म्हणाले.
-
“२०१७ मध्ये अजित दादांनी सांगितलं की उद्योगपतीच्या घरी पाच दिवस बैठक झाल्या. खाती वगैरेही ठरली. त्यावेळी त्यांनी सांगितलं की आम्ही भाजपासोबत राहू पण शिवेसनेला बाहेर काढा. तेव्हाही पुन्हा शिवसेनेला बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला. भाजपाने सांगितलं की आपण तिघांनीही सरकार स्थापन करू कारण, आम्ही २५ वर्षांचा मित्र (शिवसेना) नाही सोडू शकत, अशी भूमिका भाजपाने घेतली. २०१४, २०१७ नंतर २०१९ लाही मोदींसोबत ठरवून आले की निवडणुकीनंतर समझौता करायचा आणि सरकार भाजपा राष्ट्रवादीचं करायचं”, असा गौप्यस्फोट छगन भुजबळांनी केला.
-
“अडीच अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदाच्या वादावरून भाजपाने शिवसेनेला सोडलं. फडणवीसांनी सांगितलं आम्ही सोडतोय यांना, तुम्ही आमच्यासोबत येणार ना? या कुठल्याच चर्चेत मी नव्हतो. अलिकडच्या सर्व चर्चेत पवार साहेबांच्या सांगण्यावरून प्रफुल्ल पटेल, अजित दादा आणि जयंतराव पाटील यांच्यातच चर्चा होत होती. मला कधीच पाठवले नाही, मी कधी गेलोच नाही दिल्लीत चर्चा करायला. तुम्ही मलाच दोष का देताय”, असा सवालही छगन भुजबळांनी उपस्थित केला.
-
“उलट मला जेव्हा कळलं हे (शरद पवारांचं राजीनामा प्रकरण) सगळं चाललंय. ५४ आमदारांच्या सह्या घेऊन मी शरद पवारांकडे गेलो. यात जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, रोहित पवारांच्या सह्या आहेत. मला सांगितलं की तुम्ही साहेबांशी बोला. इनेशिएटीव्ह माझा नव्हता. मी गेलो. काहीतरी ठरलं. अजितदादा, पवारसाहेब आणि सुप्रियाताई यांच्यात हे ठरत गेलं. ठरल्यानंतर १५ दिवसांचा वेळ घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी राजीनामा देणार. त्यांनी राजीनामा दिला, पुस्तकाच्या लॉन्चिगच्या वेळेला म्हणाले की आता थांबतोय आणि संस्था बघतोय. हे १५ दिवसांपासून चर्चेत ठरतंय, असंही छगन भुजबळांनी यावेळी सांगितलं.
-
हे सगळं मला सुप्रियाताईंनी सांगितलं. दुसऱ्या दिवशी मी बोललो की काही भांडण असेल तर मिटवा. दिल्लीत सुप्रिया सुळेंनी पाहावं आणि महाराष्ट्रात अजित पवारांनी पहावं आणि मिटवून टाकावं सगळं. त्याप्रमाणे ठरलंही सगळं. त्याप्रमाणे झालं. तीन दिवसांनी पवारांनी माघार घेतली. अजित दादांनीही विचारलं की माघार घ्यायची होती तर राजीनामा दिलाच कशाला? सुप्रियांना १० तारखेला कार्याध्यक्ष म्हणून नियुक्त करायचं ठरवलं. तटकरेंना सांगितलं की अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांना बोलवा. यांना सांगायला गेलो, तर प्रफुल्ल पटेल म्हणाले मी तर उपाध्यक्ष आहे. मी दोन नंबर आहे, मी तीन नंबरला का जाऊ. नाहीतर मी राजीनामा देतो. मग परत त्यांची मी समजूत काढली. दोघेही कार्याध्यक्ष व्हा,अशी मध्यस्थी छगन भुजबळांनी केल्याचं ते म्हणाले.
-
“त्याअगोदर शिंदे मंत्रिमंडळात बसायच्या आधी जयंत, प्रफुल्ल आणि अजित दादांना सांगितलं की एवढे मंत्री आमदार खासदार पाहिजेत. त्यानुसार बडोद्याला मिटिंग ठरली. मी नाही तिथे. विमान ठरल्यावर जयंत पाटील निरोप घ्यायला गेले तेव्हा पवारांनी सांगितलं की नका जाऊ”, अशी माहितीही भुजबळांनी दिली.
-
२०१९ लाही सांगितलं की तुम्ही सांगितलं भाजपासोबत सरकार करायचं. अजित दादांसोबत ठरलं. अजित दांदानी तो सकाळचा शपथविधी पार पाडला. मी सुद्धा गेलेल्या आमदारांना गोळा करत होतो. अनेक गोष्टी मला माहितच नाही. मग येवल्याचा राग माझ्यावर राग काढायचं काय कारण? त्यांना वाटतंय की हे भुजबळांनी ठरवलंय. भुजबळच प्रत्येकवेळी लढत होता. विरोधी पक्षनेता म्हणून शिवसेनेविरोधात लढत होता. आताही राष्ट्रवादीसाठी सगळ्यांसोबत लढत होतो, असंही भुजबळ म्हणाले.
-
“शरद पवारांनी माफी का मागितली हे मला कळलंच नाही. त्यांनी सगळ्या सभा रद्द केल्या. पण येवल्यातील सभा रद्द केली नाही. ओबीसीचा नेता आहे, म्हणून ते इथे पहिल्यांदा आले. मला वाईट वाटलं की तुम्ही माफी मागता. किती ठिकाणी माफी मागणार आहात? गोंदियापासून कोल्हापूरपर्यंत, पुण्यापासून बीडपर्यंत आणि खाली लातूरपर्यंत माफी मागणार आहात का? काय केलं मी?”, असा सवाल छगन भुजबळांनी शरद पवारांना विचारला आहे.
-
“येवल्याशी माझा खास संबंध नव्हता. एकदा शिवसेनेच्या शाखेच्या उद्घाटनाला गेलो होतो. त्यानंतर राष्ट्रवादी उमेदवाराच्या प्रचाराला गेलो होतो. परंतु, येवलावासियांनी एक मुद्दा मांडला. आमच्या तालुक्यात दुष्काळ आहेच, पण विकासही झालेला नाही. आम्हाला विकासासाठी तुम्ही पाहिजे आहात. येवलावासियांचं म्हणणं ऐकल्यानंतर मी पवारांना सांगितलं की जुन्नरचा चांगला विकास झाला आहे.
-
मला काम करण्याची संधी येवल्यात आहे. मी येवल्याची निवड केली आहे. त्यामुळे येवला मी स्वतःहून मागून घेतला, मला देण्यात आला नव्हता. येवल्यात शिवसेनेचे उमेदवार होते. तेथे रिस्क होतीच. परंतु, संघर्ष केला, तिथल्या लोकांनी प्रेम दिलं आणि निवडून दिलं”, असा संपूर्ण घटनाक्रम छगन भुजबळांनी नाशिकमध्ये आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत कथन केला. शरद पवारांनी काल (८ जुलै)येवला येथे जाहीर सभा घेतली होती. या सभेतून त्यांनी छगन भुजबळांवर निशाणा साधला होता. शरद पवारांचे सर्व आरोप आज छगन भुजबळांनी खोडून काढले.
-
“येवल्यातील लोकांनी एकदा नाही, चार वेळा निवडून दिलं. एखाद्याला आपण एकदा निवडून येतो. पण काहीतरी प्रेम असेल तरच चार वेळा निवडून येतो. पण शरद पवार म्हणाले की २० वर्षांपूर्वी चुकीचा उमेदवार दिला. प्रशासकीय संकुलातील उद्घाटनात म्हणाले की बारामतीनंतर कोणाचा विकास झाला असेल तर येवल्याचा झाला. पण आता त्यांनीच माफी मागितली”, असंही छगन भुजबळ म्हणाले.
-
“येवल्याचे लोक आभार मानताहेत की आलात तर जाऊ नका. त्यामुळे साहबेांनी माफी मागायचं कारण नाही. तुमचं नाव खराब होईल, माफी मागण्याची परिस्थिनी निर्माण होईल असं कोणतंही काम भुजबळांनी केलेलं नाही”, असंही स्पष्टीकरण भुजबळांनी दिलं.
-
कालच्या (शरद पवारांच्या) सभेचं नियोजन माणिकरावशिंदे या व्यक्तीने केलं होतं. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून २ जानेवारी २०२० ला पक्षाने पक्षातून बाहेर काढलं आहे. शिस्तभंग म्हणून हकालपट्टी केली आहे. ते एका दिवसांत होत नाही. महिना दोन महिने चौकशी करून पक्षातून काढलं जातं. त्याप्रमाणे त्यांना काढण्यात आलेलं आहे. ज्यांना काढलं त्यांचं पक्षासाठी योगदान नाही, मग येवल्यासाठी काय योगदान हे मला माहित नाही. त्यांना दुसरं कोणी भेटले नाही म्हणून त्यांचं सहाकार्य घेतलं,असाही आरोप छगन भुजबळांनी यावेळी केला.
-
जे सतत राष्ट्रवादीविरोधात भूमिका घेतात, त्या दराडे बंधूंनीही ताकद लावली. काल ती मंडळी स्टेजवर होते. विशेषतः ज्येष्ठ मंडळी होती. सर्व तरुण मुलं आणि कार्यकर्ते माझ्या स्वागतासाठी आले होते. आणि अनेक मंडळी असे होते जे पक्षाला त्रास देणारे त्यांचं काम संपलेलं, काही काम करत नाही, अशी मंडळी त्यांच्याकडे होती. काल झालेल्या स्वागत समारंभाला त्याच्यानंतर मलाही असं वाटलं की नाशिकची जनता माझ्यासोबत आहे. २००४ ला पवारांनी सांगितलं की तुम्हाला निवडणुकीला उभं राहावं लागेल. त्याअगोदर मुंबईतून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आलो होतो. शिवसेनेच्या तिकिटावरून. शिवसेनेचा आमदार आणि नेता १९९५ सालात झालो. अचानक राष्ट्रवादीत नेता झालो नाही. शिवेसनेत माझं मोठं स्थान होतं, असंही छगन भुजबळांनी स्पष्ट केलं.

होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती