-
दडी मारून बसलेल्या पावसाने गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार कोसळायला सुरुवात केली आहे. काल (१९ जुलै) मुंबई ठाण्यासह सर्वत्र तुफान पाऊस झाला. त्यामुळे रेल्वे वाहतुकीसह रस्ते वाहतूक विस्कळीत झाली. यामुळे नोकरदार वर्गाची तारांबळ उडाली. (सर्व फोटो – एकनाथ शिंदे/ट्विटर)
-
रात्री उशिरापर्यंत वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत असल्याने नागरिक निश्चिंत झाले. एका बाजूला अशी परिस्थिती असताना कोकणातही पावसाने जोर धरला होता.
-
नदी नाले ओसंडून वाहत होते. त्यामुळे प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. परंतु, घरात बसलेल्या लोकांवरच काळाने दरडरुपाने घाला घातला आणि जवळपास १२ जणांचा मृत्यू झाला. रायगडच्या खालापूर येथे असलेल्या इर्शाळवाडी गावात इर्शाळगडावरील दरड कोसळली आणि लोक जीव मुठीत घेऊन सैरावैरा धावू लागली.
-
दिवसभराची आवराआवर संपून झोपण्याच्या तयारीत असताना अचानक इर्शाळगडावर भूस्खलन झालं. या भूस्खलनामुळे खालच्या गावावर दरड कोसळली. काही समजायच्या आतच हे गाव जमिनीखाली गाडले गेले. इर्शाळगडाच्या पायथ्याशी तीन-तीन किलोमीटरच्या अंतरावर तीन गावे आहेत. त्यापैकी सर्वांत वर इर्शाळवाडीत ठाकूरवाडी आहे. या ठाकूरवाडीत २१८ नागरिकांची वस्ती आहे. त्यापैकी १०३ लोकांना बाहेर काढण्यात आलंय. यापैकी १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, काहीजण कामानिमित्ताने बाहेर असल्याने ते वाचले आहेत. अद्यापही अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. भर पावसात त्यांच्यासाठी बचावकार्य सुरू आहे.
-
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सरकार सक्रिय झाले. स्थानिक आमदार रात्रीच घटनास्थळी दाखल झाले. तसंच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी सात वाजताच रायगडावर पोहोचले.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गडाच्या पायथ्याशी येऊन थांबले नाहीत तर, उद्ध्वस्त झालेल्या वस्तीवर येऊन त्यांनी बचाव कार्याचे नियंत्रण केले भर पावसात विश्रांती न घेता, रेनकोट घालून स्वत: बचाव कार्यात उतरलेले मुख्यमंत्री पाहून बरोबरचे अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा अवाक झाले.
-
विशेष म्हणजे आज विधिमंडळ अधिवेशनाचा चौथा दिवस होता. मात्र या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांवर कामकाजाची जबाबदारी टाकली आणि स्वत: बचाव कार्यात सामील झाले.
-
सुरुवातीला गडाच्या पायथ्याशी राहून त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. अधिकाऱ्यांना आणि संबंधित यंत्रणांना सूचना केल्या. वस्तीवर जाण्यासाठी रस्ता नसल्याने तिथून गाडी जाणे शक्य नव्हते. हेलिकॉप्टरने जाण्यासाठी हवामान अनुकूल नव्हते. त्यामुळे घटनास्थळी दाखल होण्याकरता पायी चालत जाण्याशिवाय पर्याय नव्हता. पावसाची रिपरिप सुरूच होती, तरीही घटनास्थळी दाखल होण्याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला
-
इर्शाळगडाच्या पायथ्याला असलेल्या गावाला बेस कॅम्प करून मुख्यमंत्री केवळ निर्देश, सुचना देऊन तेथून निघाले नाही. त्यांनी परिसरातील औद्योगिक वसाहतींमधील कामगारांना मदतीचे आवाहन केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. दुपारी एकच्या सुमारास भर पावसात मुख्यमंत्री इर्शालगडावर पायी चालत निघाले. पायथा ते दुर्घटनास्थळ हे सुमारे दीडतासाचे अंतर त्यांनी चालत जाऊन गाठायचे ठरवले.
-
प्रतिकुल हवामान, अवघड चढण यावर मात करीत मुख्यमंत्री शिंदे ग्रामस्थांशी चर्चा करीत मजल दरमजल करीत चढण चढत होते.
-
केंद्रिय गृहमंत्री, वायुसेनेचे अधिकारी, परिसारीतल सामाजिक आणि दुर्गप्रेमी संस्था, गिर्यारोहक संस्था यांच्याशी ते सतत बोलत होते आणि त्यांच्याकडून बचावासाठी आणखी काय काय करता येईल ते पहात होते.
-
आतापर्यंत 103 लोकांची ओळख पटवण्यात प्रशासनाला यश आले असून 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी सांगितली. काही नागरिक भातशेतीच्या कामासाठी इतरत्र गेले असून काही मुले आश्रमशाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यांचाही शोध घेऊन घेतला जात असल्याचे सांगितले. दरम्यान या ग्रामस्थांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यासाठी पायथ्याशी ५० कंटेंनरची व्यवस्था करण्यात येणार असून त्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन देखील करण्यात येईल असे स्पष्ट केले.
-
अत्यंत दुर्गम अशा ठिकाणी ही वाडी वसलेली असल्याने आणि मदतीसाठी कोणीतेही साधने आणता येणे शक्य नसल्याने फक्त माणसांच्या मदतीने इथे मदत पोहोचवता येणे शक्य होत आहे.
-
निक नागरिक, एनडीआरएफ, एसडीआरएफ, टीडीआरएफ यांच्या पथकांच्या माध्यमातून याठिकाणी प्रत्यक्ष मदतकार्य सुरू असून इतर सामाजिक संस्थांनी मदतीचा हात पुढे केला आहे.
-
प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती आणि सततचा पाऊस असूनही लवकरात लवकर मदतकार्य पूर्ण करावे यासाठी शक्य ते सारे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. तसेच मदतकार्य केलेल्या संस्थांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले.
-
-
-
यावेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, स्थनिक आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार अनिकेत तटकरे तसेच रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे हेदेखील उपस्थित होते.

पिंपरी- चिंचवड: कुख्यात गुंडाकडून ईदच्या शुभेच्छा; महानगर पालिका, पोलिसांनी केली अशी कारवाई