-
गेल्या १२-१३ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला आहे. हा महामार्ग पूर्ण होऊन कोकणवासियांना सुलभ प्रवास करता यावा याकरता आज पनवेलमध्ये निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं.
-
“आज मी मोठं भाषण करायला आलो नाही. आज मी फक्त या आंदोलनाला हिरवा झेंडा दाखवायला आलो आहे. मला अजून कळलं नाही चांद्रयान जे गेलंय चंद्रावर काय उपयोग आहे आपल्याला? तिथे जाऊन खड्डेच बघायचे आहेत. ते महाराष्ट्रात सोडलं असतं तर खर्चही वाचला असता”, असा मिश्किल टोमणा राज ठाकरेंनी लगावला आहे.
-
“हा महाराष्ट्रातील कोकणाचा भाग नाहीय, मुंबई नाशिकचीही तीच अवस्था आहे. महाराष्ट्रातील रस्त्यांची तीच अवस्था आहे. मला राज्यातील लोकांचे कौतुक वाटतं. हे खड्डे आज नाही पडले, २००७ – ०८ साली या रस्त्याचं काम सुरू झालं. काँग्रेसचं सरकार, शिवेसना भाजपा सरकार आलं, मग कोणकोणाचं सरकार आलं. त्याला ना आकार ना उकार. पण एवढी सर्व सरकारं आल्यानंतरही त्याच खड्ड्यातून जात असताना त्याच त्याच लोकांना मतदान कसे करता याचंचं आश्चर्य वाटतं, असंही राज ठाकरे म्हणाले.
-
“खड्ड्यातून गेलो काय आणि खड्यात गेलो काय? महाराष्ट्रातील लोकांना कधीच वाटत नाही का या लोकांना एकदा धडा शिकवावा घरी बसवावं. निवडणुकीच्या तोंडावर वारेमाप आश्वासन देतात, गोष्टी सांगतात, हातात सत्ता येते, पुढे बघू करू म्हणतात”, असंही राज ठाकरे म्हणाले.
-
समृद्धी महामार्गासाठी चार वर्षे लागतात पण १३ वर्षांत मुंबई गोवा महामार्ग होत नाही. कोकणातील आमदार आणि खासदार काय करताहेत, असा प्रश्नही राज ठाकरेंनी विचारला.
-
आपल्याला लोकांना त्रास द्यायचा नाहीय, हे लक्षात ठेवा. पण आंदोलन अशा प्रकारचं झालं पाहिजे की सरकराकडून तत्काळ पावलं उचलली गेली पाहिजेत. आणि लोकांना चांगला, उत्तम रस्ता मिळाला पाहिजे”, असं राज ठाकरे म्हणाले.
-
“माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांना माझ सांगणं आहे संपूर्ण कोकणावर तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. कोण जमिनी पळवतोय. आज जसं बाकीच्या ठिकाणी सुरू झालंय की लोक हिंदी बोलायला लागले आहेत. सर्व कोकणाचं रुपडं घाण करून टाकतील”, असं सतापही राज ठाकरेंनी व्यक्त केला.
-
“असं आंदोलन करा की यापुढे रस्ते करताना कोणालाही अशा प्रकारचं आंदोलन झालं होतं अशी भीती असावी, दहशत असावी. मी तुमच्यासोबत आहेच आहे, जिथे माझी गरज लागेल, तिथे तुम्ही मला हक्काने बोलवा”, अशी सादही राज ठाकरेंनी यावेळी घातली.
-
“मला अजून नाही कळलं, आपलं यान चंद्रावर जाऊ शकतं पण रस्ते चांगले होऊ शकत नाहीत. मुंबई नाशिकहून येताना ८-८ तास लागतात. स्त्रीयांचे तर सर्वांत मोठे हाल होतात. पण काही नाही, चिंता नाही. हाल झाले तर झाले पण आम्ही तुम्हालाच मतदान करू”, असा संतापही त्यांनी व्यक्त केला आहे.
-
पुण्यात मी अनेकदा सभा घेऊन सांगतिलं आहे. मुंबई बरबाद व्हायला एक मोठा काळ गेला आहे. मात्र पुणे बरबाद व्हायचं असेल तर फार वेळ लागणार नाही. मी मागच्या २५ वर्षांपासून हे सांगतो आहे असंही राज ठाकरे म्हणाले. कारण कुठलीही आखणी केलेली नाही. आमच्याकडे टाऊन प्लानिंग नावाची गोष्टच नाही फक्त डेव्हलपमेंट प्लान येतो. पुण्याचा अंदाज घ्या, तुम्हाला लक्षात येईल तिथे गुदमरलेला मराठी माणूस आहे. कोकणातही कुणीही येतंय जमिनी घेतं आहे.
-
२०२०-२०२१ ला कलम ३७० कलम हटवलं, या कलमानंतर काश्मीरमध्ये जमीन घेता येते. जा जमीन घ्या. मात्र अंबानी, अदाणी यांनीही अजून तिथे जामीन घेतलेली नाही. मणिपूर किंवा ईशान्यकडच्या राज्यांमध्ये जमीन घेता येत नाही. या सगळ्याचा परिणाम महाराष्ट्राला भोगावा लागतो आहे असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. कारण महाराष्ट्रात सगळे येऊ शकतात. इथे कुठलाही तसा कायदा नाही. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगळे कायदे आहेत. त्याचे दुष्परिणाम आपण सहन करतो आहोत असंही राज ठाकरे म्हणाले.
-
राज ठाकरे म्हणाले, “त्या दिवशी आमचा अमित कुठेतरी जात होता. त्यावेळी टोलनाका फुटला. त्यावर लगेच भाजपाने टीका सुरू केली. भाजपाने म्हटलं की, रस्ते बांधायलाही शिका आणि टोल उभे करायलाही शिका. मला असं वाटतं की, भाजपाने दुसऱ्यांचे आमदार न फोडता स्वतःचा पक्ष उभा करायलाही शिकावं.”
-
नाशिकमधील पत्रकारांना विचारा, दरवेळेला पावसाळा आला की टेलिव्हिजनची माणसं कुठे कुठे खड्डे पडले ते दाखवत बसतात. टेलिव्हिजनचे हेड नाशिकच्या पत्रकारांना सांगायचे की नाशिकच्या रस्त्याचे फुटेज दाखवा, पण नाहीच आहेत तर दाखवणार कुठे? रस्तेच असे बांधले होते, रस्ते चांगले बांधले जाऊ शकतात. या गोष्टी होऊ शकतात. मला अजून नाही कळलं, आपलं यान चंद्रावर जाऊ शकतं पण रस्ते चांगले होऊ शकत नाहीत.
-
“लोकांच्या डोक्यावर बंदुका ठेवायच्या आणि त्यांना पक्षात आणायचं. त्यानंतर ती लोक गाडीत झोपून जाणार. यानंतर म्हणणार, ‘मी तुला गाडीत दिसलो का, मी झोपलो होतो का, मी होतो का.’ म्हणजे महाराष्ट्रात निर्लज्जपणाचा कळस सुरू आहे,” असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं.
-
या सगळ्या गोष्टी घडत असताना तुम्हाला ज्याप्रकारचा त्रास होतोय तरीही त्याच त्याच लोकांना मतदान केलं जातंय. मला कळेना जनतेला हवंय काय? तीच माणसं हवी असतील तर तुमचं तुम्हाला लखलाभो. पण या सर्व गोष्टी सुधारायचं असेल तर माझ्या हातात देऊन बघा.
-
“रस्ते आस्थापनाच्या अध्यक्षांसह अनेक लोक आहेत, पण पक्ष म्हणून तुम्हाला यात उतरावं लागेल. पनवेलपासून सावंतवाडीपर्यंत सर्वांना उतरावं लागेल. जिथे गरज असेल तिथे एकमेकांना सहकार्य करावं लागेल. आपल्याला लोकांना त्रास द्यायचा नाहीय, हे लक्षात ठेवा. पण आंदोलन अशा प्रकारचं झालं पाहिजे की सरकराकडून तत्काळ पावलं उचलली गेली पाहिजेत. आणि लोकांना चांगला, उत्तम रस्ता मिळाला पाहिजे”, असं राज ठाकरे म्हणाले.
-
अमेरिकेतील एम्पायर स्टेट बिल्डिंग, त्यावर एकदा छोटं विमान आदळलं, त्याच्याखाली एकदा बॉंम्बस्फोट झाला होता तरीही बिल्डिंग दणकट आहे. ती बिल्डिंग १४ महिन्यांत झाली होती. आणि आपल्याकडे वरळी-वांद्रे सीलिंकला १२ वर्ष लागतात आणि मुंबई गोवा महामार्गाला १६ वर्ष लागली. काय बोलायचं? अमेरिकेत १९२७ च्या महामंदीच्या काळात सरकारने लोकांना पैसा देता यावं म्हणून अमेरिकेत रस्त्यांचं जाळं उभारलं, त्याच्यावर आजची अमेरिका उभी राहिली.
-
आपण महाराष्ट्रातली जमीन विकतोय, तिकडे प्रकल्प येत आहेत किंवा येतील पण… पण तिथल्या जमिनी ह्या परप्रांतीयांनी घेतला आहे आणि तिकडे फायदे कोणाचा होणार तर परप्रांतीयांचा आणि आपला मराठी माणूस त्यांच्याकडे नोकऱ्या करणार. मी पिढ्यानपिढ्या महाराष्ट्रात राहणाऱ्या अमराठी माणसांच्या विरोधात नाही. माझ्या पक्षात अनेक अमराठी आहेत. माझा मंडणगडचा अध्यक्ष तर एक पंजाबी आहे, असंही राज ठाकरे म्हणाले.

महिलांनो आता मेथीची भाजी निवडायचं टेन्शन कायमचं गेलं; या भन्नाट ट्रीकनं ५ मिनिटांत मेथी साफ, VIDEO पाहून अवाक् व्हाल