-
ठाकरे गटाचे प्रवक्ता आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत नियमित पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधतात. नियमित विविध विषयांवरून ते सरकारला धारेवर धरतात. इंडिया आघाडीची बैठक आज (३१ ऑगस्ट) मुंबईत होत आहे. या निमित्ताने अनेक राज्यातील नेते मुंबईत दाखल झाले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी गेल्या १० दिवसांत सरकारवर कशी टीका केली आहे, त्याचा आजच्या बैठकीत काय परिणाम पाहायला मिळणार आहेत ते पाहुयात.
-
काही दिवसांपूर्वी शरद पवार आणि अजित पवारांनी पुण्यात यांची बैठक झाली होती. यावरून राज्यात घमासान झाले होते. यावरून संजय राऊत म्हणाले. “अजित पवार यांनी पवारांशी राजकीय नाते तोडले. अजित पवार व त्यांचा गट भाजपाच्या गोटात शिरला आणि त्यामुळे त्यांच्या गटातील आमदारांवर सुरू असलेल्या ‘ईडी’ कारवायांना ब्रेक लागला. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस फुटण्याचे हे मुख्य कारण आहे. अजित पवार हे आज राजकारणातले बलवान नेते आहेत; पण सत्तेची गदा व शरद पवार यांचे नाव त्यांच्या पाठीशी नसेल तर अजित पवार कोण, हा प्रश्न सगळ्यांनाच पडेल,” असं संजय राऊत यांनी म्हटलं.
-
शिवसेनेचे (ठाकरे गट) मुखपत्र सामनाच्या अग्रलेखात भाजपा नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका करण्यात आली. यात भाजपाच्या वरिष्ठांनीच फडणवीसांना मुख्यमंत्रीपदावरून उपमुख्यमंत्री केल्याचा दावा करण्यात आला. तसेच भांग दुपारी जास्त चढते हे लक्षण फडणवीसांमध्ये दिसत असल्याची टीका केली. यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी अग्रलेखाविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला. याला आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे.संजय राऊत म्हणाले, “चंद्रशेखर बावनकुळे न्यायालयात कधी जातात याची मी वाट पाहत आहे. त्यांनी न्यायालयात जायला हवं. बावनकुळेंकडे सामनातील अग्रलेखाविरोधात न्यायालयात जायला चांगला वकिल नसेल, तर मी त्यांना चांगला वकिल देतो. बावनकुळे आणि भाजपाने तो अग्रलेख काळजीपूर्वक वाचायला हवा. वाचाल, तर वाचाल.”
-
दरम्यान, काही दिवसांपूर्वी संजय राऊत ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातून खासदारकीची निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू होती. याबाबतही संजय राऊतांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “पक्षानं आदेश दिला तर मी तुरुंगातही जातो. आम्ही बाळासाहेब ठाकरेंबरोबर काम केलेले लोक आहोत. पक्षाची गरज व पक्षप्रमुखांचा आदेश जो असेल तो मानणाऱ्यांपैकी मी आहे. मला विचारलं इशान्य मुंबईतून तुम्ही निवडणूक लढवणार का. मी म्हटलं पक्षानं आदेश दिला तर मी काहीही करीन”, असं राऊत यावेळी म्हणाले होते.
-
गेले काही दिवस कांद्याच्या दरात सातत्याने वाढ होतेय. यावर दादा भुसे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. परवडत नसेल तर कांदे खाऊ नका, असं ते म्हणाले होते. यावरून संजय राऊतांनी त्यांच्यावर टीका केली होती. “यांच्या घरी कांद्याची पोती आहेत आणि सामान्य माणसाला कांदा आणि भाकरी खायची आहे. कांदा हे गरिबांचं खाणं आहे, हे श्रीमंतांचं खाणं नाहीय. शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळावा हे आमचं म्हणणं आहे. सामान्य घरातील गृहीणी कांद्यापासून वंचित राहू नये हे आमचं म्हणणं आहे. पण सरकार म्हणत असेल की एखादी गोष्टी मिळत नसेल तर खाऊ नका, तर मग सरकार कशाकरता आहे? हे दीडशहाणे मंत्री कालपर्यंत कृषीमंत्री होते या महाराष्ट्राचे. त्यांना या राज्याची स्थिती माहितेय का?” असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला होता.
-
तपास यंत्रणांच्या कारवायांमुळे कोणताही पक्ष इंडिया आघाडीतून बाहेर पडेल असं कुणाला वाटत असेल, तर ते भ्रमात आहेत. महाराष्ट्रातही पोलीस व तपास दल भाजपाच्या इशाऱ्यावर कारवाया करत आहेत. त्यांनी आधी काळजीपूर्वक घटना व कायद्याचं वाचन करावं. मी एक सांगू इच्छितो की, २०२४ मध्ये केंद्रात व महाराष्ट्रात भाजपाचं सरकार राहणार नाही, आमचं सरकार येईल हे या यंत्रणांनी लक्षात ठेवावं. त्यांनी जे कायदेशीर आहे ते करावं. त्यांनी त्यांच्या राजकीय बॉसचे आदेश पाळले तर याद राखा. त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल. हा इशारा नाही, तर सत्य आहे,” असा जाहीर इशारा राऊतांनी दिला होता.
-
“अजित पवार आमच्या पक्षाचे नेते आहेतच. त्यात कोणताही वाद नाही. राष्ट्रीय पातळीवर एक मोठा गट वेगळा झाला तर त्याला पक्षात फूट म्हणता येईल. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तशी परिस्थिती नाही. काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली आहे. परंतु, लोकशाही प्रक्रियेत तो त्यांचा अधिकार आहे, असं शरद पवार म्हणाले होते. शरद पवारांच्या या भूमिकेवरून संजय राऊतांनी वक्तव्य केलं होतं. भाजपाबरोबर गेलेल्यांना, हुकूमशाही प्रवृत्तीबरोबर हातमिळवणी करणाऱ्यांना, अशा कोणत्याही नेत्याला किंवा पक्षाला महाविकास आघाडीत स्थान नाही. ईडीला घाबरून ज्यांना जायचं आहे ते जाऊ शकतात. मग ते आमच्याकडून गेलेले असतील अथवा राष्ट्रवादी काँग्रेसमधून गेलेले असतील, तो निर्णय त्यांचा आहे. जसं शरद पवार म्हणाले, ही लोकशाही आहे, त्यामुळे तो निर्णय त्यांचा असेल. परंतु, आमचेही (महाविकास आघाडी) काही निर्णय आहेत. दोन दगडांवर किंवा तीन दगडांवर पाय असं कोणाचं राजकारण असेल तर त्यासंदर्भात जनता निर्णय घेईल, असं संजय राऊत म्हणाले.
-
२७ ऑगस्ट रोजी संजय राऊतांनी केंद्र आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक मंत्रालयात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला होता. “देशात महागाई, बेरोजगारी आणि कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न गंभीर आहेत. या प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी त्यांच्याकडे एकच रामबाण उपाय आहे, तो म्हणजे दंगली पेटवायच्या. लव्ह जिहाद सारखे नसलेले मुद्दे चर्चेत आणायचे. मोर्चे काढायचे. हे कितीही केलं तरी २०२४ साली भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात आणि देशात सत्तेत येणार नाही, अशी गॅरंटी ‘इंडिया’ आघाडीतर्फे आम्ही देत आहोत,” असंही संजय राऊत म्हणाले होते.
-
शरद पवारांनी बीडमध्ये सभा घेतली होती. या सभेला उत्तर म्हणून अजित पवारांनीही बीडमध्ये उत्तरसभा घेतली. यावरून संजय राऊतांनी टीका केली होती. “अशा उत्तर सभांना कुणी विचारत नाही. मुख्य सभेला महत्त्व असतं. अजित पवारांची उत्तर सभा म्हणजे स्वत:वर अंत्यसंस्कार आणि उत्तर क्रिया करण्यासारखं आहे, अशा शब्दांत संजय राऊतांनी टीका केली आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊतांनी ही टीका केली.
-
प्रसिद्ध दिग्दर्शक नितीन देसाई यांनी कर्ज फेडता न आल्याने आत्महत्या केली. या आत्महत्येवरून संजय राऊतांनी सरकारवर निशाणा साधला होता. “सनी देओल यांनी ६०-७० कोटी रुपये बँकेचे थकवले. त्यामुळे बँकेने त्यांच्या बंगल्याचा लिलाव काढला. पण २४ तासांत दिल्लीतून सूत्र हलली आणि त्यांच्या बंगल्याचा लिलाव रद्द करण्यात आला. त्यांना वाचवलं, त्यांचा बंगला वाचवला. मग हाच न्याय नितीन देसाईंना का नाही मिळाला? असा सवाल संजय राऊतांनी आज विचारला.
-
काही दिवसांपूर्वी अमित शाह गुजरात दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही त्यांच्या भेटीसाठी गुजरातला गेले होते. यावरून संजय राऊतांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता. गुजरातला जाणं हा अपराध आहे का? गुजरात हे गृहमंत्र्यांचं राज्य आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे ते पॉलिटिकल बॉस आहेत. एक काळ असा होता की महाराष्ट्रात सर्व ठरवलं जायचं. महाराष्ट्रत हायकमांड होतं. महाराष्ट्र देशाला दिशा देत असे. आता नव्या सिस्टिमनुसार, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना गुजरातला जावं लागतंय. गुजरातचे मित्र आपले बांधव आहेत” असं संजय राऊत म्हणाले होते.
-
राम मंदिराचे काम पूर्णत्वास आले आहे. जानेवारी २०२४ ला राम मंदिराचे लोकार्पण करण्यात येणार आहे. यावरून संजय राऊतांनी मोठा आरोप केला आहे.“राम मंदिराच्या उद्घाटनावेळी देशभरातून, देशाच्या कानाकोपऱ्यातून ट्रेनने लोकांना बोलावलं जाईल. यातील एखाद-दुसऱ्या ट्रेनवर दगडफेक केली जाईल. पुलवामाप्रमाणे धर्मांधतेचा आगडोंब उसळवणार नाही ना अशी भीती वाटतेय. जर पुलवामा घडवला जाऊ शकतो, गोध्रा घडवलं गेलंय असं म्हटलं जातंय. त्यामुळे, अशा प्रकारची घटना २०२४ च्या निवडणुकीसाठी केली जाईल, अशी भीती देशातील अनेक प्रमुख पक्षांना वाटतेय. इंडियाच्या बैठकीत यावर चर्चा होईल. पण आम्ही अत्यंत सावध आहोत”, असं संजय राऊत म्हणाले होते.
-
कॅगच्या अहवालाद्वारे नितीन गडकरींना अडकवण्याचा कट रचला जातोय, या विरोधी पक्षाच्या आरोपाबाबत संजय राऊतांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, “माझ्याकडे त्याबाबत माहिती नाही. पण नितीन गडकरी हे देशातील महत्त्वाचे नेते आहेत. ते कार्यक्षम मंत्री आहेत. देशभरात त्यांनी केलेलं कामच सध्या दिसतंय. ते भविष्यामधील या देशाचे नेतृत्व आहेत. जे वाटेत आडवे जातात, त्यांना कसं संपवायचं? यासाठी अनेक यंत्रणा राबवल्या जातात, हे सगळ्यांना माहीत आहे. आम्ही त्याचे पीडित आहोत.”
-
संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर काल (३० ऑगस्ट ) जोरदार शाब्दिक हल्ला चढवला होता. “सध्याच्या केंद्र सरकारला मुंबईवर ताबा हवा आहे. त्यांना मुंबईच्या संपत्तीवर ताबा हवा आहे, त्यांना मुंबई गिळायची आहे, मुंबई विकायची आहे, मुंबई लुटायची आहे. मुंबई महाराष्ट्राची राजधानी राहू नये आणि राहिली तरी त्या मुंबईवर महाराष्ट्राचं, मराठी माणसाचं नियंत्रण राहू नये यासाठी मागील १० वर्षे मोदी-शाहांचं सरकार काम करत आहे”, असं राऊत म्हणाले होते.

Hanuman Jayanti 2025 : हनुमानाच्या ‘या’ आहेत चार प्रिय राशी; कमी वयात होतात श्रीमंत, संकटमोचनच्या कृपेने अडचणी होतात दूर