-
मराठा आंदोलनाच्या निमित्ताने मनोज जरांगे पाटील प्रचंड चर्चेत आले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोवर उपोषण मागे घेणार नसल्याची ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. मराठा समाजाची बाजू मांडणारे हे मनोज जरांगे पाटील नक्की कोण हे जाणून घेऊयात. (फोटो – लोकसत्ता टीम)
-
जालना जिल्ह्यातून सुरू झालेल्या मराठा आंदोलनातील केंद्रस्थानी असणारे मनोज जरांगे हे मूळचे बीड जिल्ह्यातील. गेवराई तालुक्यातील माथोरी हे त्यांचे मूळ गाव. शहागड ही त्यांची सासुरवाडी. गेल्या १२ -१५ वर्षापासून ते शहागडमध्ये राहतात. माथोरी गावातील हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. (फोटो – मनोज जरांगे पाटील / फेसबुक)
-
मराठा आंदोलने सुरू झाली तेव्हापासून छोट्या- मोठ्या आंदोलनात सहभागी होणारे, प्रसंगी पुढारपण करता आले तर एखादे भाषण करणाऱ्या जरांगे यांच्या मागे माेठे पाठबळ उभे राहील, अशी शक्यता आंतरवलीच्या आंदोनापूर्वी नव्हती. २०१५ पासून गावागावात आंदोलन करण्यासाठी बारावीपर्यंत शिकलेल्या जरांगे यांनी विविध आंदोलने केली. अगदी गेल्या काही महिन्यात अनेक गावात उपोषण केले. त्या- त्या गावातील लोक त्यांच्या आंदोलनात सहभागी होते. (फोटो – मनोज जरांगे पाटील / फेसबुक)
-
मराठवाड्यातील दुष्काळसदृष्य परिस्थितीमध्येही या आंदोलनेचे कारण दडलेले आहे. कापूस, सोयाबीन पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिकांना भाव मिळत नाही. शिकलेली मुले शहरात स्पर्धा परीक्षेत गुंतले आहेत किंवा गावातच शेतीमध्येही प्रयोग करुन पाहत आहेत. पण या प्रयत्नांना प्रतिष्ठाही मिळत नाही आणि फारसे यशही. त्यामुळे गावोगावी विवाह न झालेल्या तरुणांची संख्या मोठी आहे. या सर्व मुलांना आपले प्रश्न फक्त आरक्षणाच्या माध्यमातूनच सुटू शकतात हे खोलवर रुजले आहे. जरांगे यांच्या आंदोलनाला होणारी गर्दी यातून जमा होते. (फोटो – मनोज जरांगे पाटील / फेसबुक)
-
मनोज जरांगे पाटील यांनी शिवबा ही संघटनाही स्थापन केली. जगलो तर तुझा, अन्यथा कपाळावरचे कुंकू पूस असे सांगून आलो आहे, असे वाक्य असणाऱ्या भाषणाचे छायाचित्रण आता समाज माध्यमांवर फिरू लागले आहे. (फोटो – मनोज जरांगे पाटील / फेसबुक)
-
जरांगे हे शहागड आणि अंकुशनगर आणि शहागडच्या मध्ये एका छोट्या घरात राहतात. अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव येथेही त्यांनी उपोषण केले होते. तेव्हाही आंदोलनास गर्दी जमा झाली होती. या आंदोलनाचीही चर्चा झाली होती.तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना चर्चेसाठी मुंबईत बोलवले होते. (फोटो – मनोज जरांगे पाटील / फेसबुक)
-
जरांगे पाटील यांना पत्नी, चार मुलं, तीन भाऊ आणि आई-वडिल असा परिवार आहे. ते पूर्णवेळ मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी काम करतात. त्यांच्यातील समाजसेवेतील आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. मराठा आरक्षणासाठी आर्थिक रसद मिळावी म्हणून त्यांनी स्वतःच्या मालकीची जमिनही विकली आहे. (फोटो – मनोज जरांगे पाटील / फेसबुक)
-
मनोज जरांगे पाटील यांनी हॉटेलमध्येही काम केलं असल्याचं बोललं जातंय. (फोटो – लोकसत्ता टीम)
-
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांचा आजचा उपोषणाचा सातवा दिवस होता. सातव्या दिवशीही सरकारने सकारात्मक निर्णय न घेतल्याने उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय जरांगे पाटील यांनी घेतला आहे. (फोटो – लोकसत्ता टीम)

‘झी मराठी’ची मालिका संपली; आता लोकप्रिय अभिनेत्रीची ‘स्टार प्रवाह’च्या मालिकेत एन्ट्री! पहिल्यांदाच साकारणार खलनायिका