-
गेल्या दहा दिवसांहून अधिक दिवस मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून उपोषणाला बसले आहेत.
-
मराठा समाजाची शिष्टमंडळाची काल (८ सप्टेंबर) बैठकही झाली. या बैठकीतून तोडगा निघेल अशी अपेक्षा होती. परंतु, सरकारने मनोज जरांगे पाटलांचं समाधान केलं नाही. त्यामुळे ते उपोषणावर ठाम आहेत.
-
मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळत नाही तोवर उपोषण सुरूच ठेवणार असल्याची भूमिका मनोज जरांगे पाटलांनी घेतली आहे.
-
सरकारने आतापर्यंत तीनवेळा मनोज जरांगे पाटलांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. नितेश राणे, गिरीश महाजन, अर्जुन खोतकर यांच्याकरवी हे उपोषण थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु, जरांगे पाटील आपल्या निश्चयापासून हटले नाहीत.
-
आतापर्यंत जरांगे पाटलांना भेटायला अनेक नेते मंडळी येऊन गेली. पण, त्यांच्या मागणीचं समाधान अद्यापही झालेलं नाही.
-
सरकारने ७ सप्टेंबर रोजी जीआर काढला होता. त्यानुसार, निजामकाळातील मराठा समाजाला त्यांची वंशावळ पाहून कुणबी जातप्रमाणपत्र द्यावं, असा हा जीआर होता. पण, येथील वंशावळ हा शब्द काढून तेथे सरसकट हा शब्द दुरुस्ती करावा अशी सूचना मनोज जरांगे पाटलांनी केली होती.
-
काल झालेल्या बैठकीनंतर मनोज जरांगे पाटलांसाठी पत्र पाठवण्यात आलं होतं. मात्र, यातही सुधारणा करण्यात आल्या नव्हत्या. त्यामळे सरकार सुधारित जीआर काढत नाही तोवर आमरण उपोषण सुरूच ठेवणार असल्याची ठाम भूमिका मनोज जरांगे पाटलांनी घेतली आहे.
-
“मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र मिळायला पाहिजे ही आमची भूमिका आहे. महाराष्ट्रातील मराठा समाजाला मला न्याय मिळवून द्यायचा आहे, तोवर मी गप्प बसणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १०० टक्के मराठा समाजाला आरक्षण देणार याची मला खात्री आहे. आमचं उपोषण सुरूच राहणार आहे. पण सरकारसोबत चर्चा सुरू ठेवायची की नाही याचा निर्णय घेतला जाईल”, असं जरांगे म्हणाले.
-
आज सरकारला दिलेल्या अल्टिमेटमचा शेवटचा दिवस आहे. उद्यापासून औषध आणि पाणीत्याग आंदोलन सुरू असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला आहे. टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
-
वादविवाद नको, वादविवादाने कामे होत नाहीत. सामंजस्याने एकमेकांना समजून घ्यायचं. ६० वर्षे झाली, लेकरं विषासारखं भयंकर जीवन जगत आहेत. इतक्या भयंकर वेदना आपल्या मराठ्यांची पोरं भोगत आहेत. त्यांना न्याय देण्याचं काम आपलं आहे, असंही जरांगे पाटील म्हणाले.
-
सात सप्टेंबरच्या जीआरमध्ये दुरुस्ती झालेली नाही. शासनाकडून प्रक्रिया सुरू आहे. किरकोळ दुरुस्ती राहिली आहे. ती दुरुस्ती करून परत उद्या येतील. उद्या आल्यावर पुन्हा टाळ्या वाजवा. परत उद्या येथेच बैठक होणार. काय दुरुस्ती करायची आहे ते प्रत्यक्ष कागदावर लिहून देतो. म्हणजे परत शब्द चुकायला नको, फक्त एक दोन शब्दांची दुरुस्ती आहे, ते शब्द आम्ही सरकारला लिहून देणार.या प्रक्रियेसाठी आजचा दिवस जाईल, असं मनोज जरांगे म्हणाले.
-
“आपल्या ठरल्याप्रमाणे सरकारने जीआर आणला तर उद्या सकाळी सूर्य उगवण्याआधी पाणी पिणार”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “हे आमरण उपोषण सुरूच राहिल, महाराष्ट्रातील मराठ्यांसाठी हा लढा आहे. महाराष्ट्रातील मराठ्यांनी शांततेने आंदोलन करावं, माझ्या शब्दाच्या पुढे मराठा समाजाने जाऊ नये. मी तुमच्यापेक्षा मोठा नाही पण मुलगा म्हणून ऐका, कारण आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी आपण खांद्यावर घेतली आहे”, असं आवाहनही जरांगे पाटलांनी केलं.
-
“मराठा समाजातील नागरिकांना मी आवाहन करतो आंदोलने शांततेत करा. वेगळ्या किंवा उग्र स्वरुपाचं आंदोलन करू नका. त्या कल्पनेला या उपोषणाचा आणि या आंदोलनाकडून अजिबात समर्थन नाही. कारण कोणाच्याही जीवितेला धोका निर्माण करायचा नाही. कारण, तुम्ही असाल तरच या आंदोलनाचा उपयोग, तुम्ही नसाल तर या आंदोलनाचा उपयोग काय?” असा सवालही जरांगे पाटलांनी उपस्थित केला.
-
“मनपरिवर्तन करा, मतपरिवर्तन करा. कोणाच्याही विरोधात बोलू नका. आपण शांततेत आंदोलन करायचं, उग्र कोणीही करायचं नाही, ही महाराष्ट्रातील जनतेला कळकळीची विनंती आहे. मी अखंड महाराष्ट्रासाठी आरक्षण द्यावं ही मागणी करतोय. समज-गैरसमज ठेवण्याचं कारण नाही. मराठवाड्याला फायदा द्या, महाराष्ट्रालाही फायदा द्या. सरकसकट महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी जातप्रमाणपत्र द्या किंवा २००४ जीआरमध्ये तातडीने दुरुस्ती करा आणि तातडीने प्रमाणपत्र वाटप झाले पाहिजेत, असा आदेश काढा आणि अंमलबजावणी करा”, असंही ते म्हणाले.
-

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”