-
गगनयान मोहिमेच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे.
-
अंतराळवीर ज्या अवकाश यानातून अंतराळात जाणार आहेत त्या यानाच्या आपत्कालीन सुटकेची चाचणी (crew escape system) आज इस्रोने यशस्वी केली.
-
यामुळे भविष्यात प्रत्यक्ष अतंराळवीर अवकाशात पाठवतांना उड्डाणाच्या वेळी किंवा उड्डाणानंतर काही मिनिटांत तांत्रिक बिघाड झाला तर प्रक्षेपकावर-रॉकेटच्या अग्रभागावर असेलल्या अवकाशान यानातून पुन्हा सुखरुप जमिनीवर आणणे शक्य होणार आहे. याबाबतची पहिली चाचणी त्या अवकाश यानाच्या माध्यमातून आज करण्यात आली.
-
गगनयान मोहिमेच्या आपत्कालीन सुटकेची चाचणी आज नियोजित होती. सकाळी ८ वाजता या चाचणीचं प्रक्षेपण होणार होतं. परंतु, हवामानामुळे ८ वाजताची चाचणी रद्द करण्यात आली. त्यानंतर ८.३० वाजता ही चाचणी होणार असल्याचं सांगण्यात आलं. साडेआठची वेळही ८.४५ वर ढकलण्यात आला. त्यामुळे सुधारित वेळेनुसार ८.४५ काऊंट डाऊन सुरू करण्यात आलं. परंतु, तेव्हाही काही तांत्रिक कारण देत ही चाचणी होऊ शकली नाही.
-
“नेमकं काय झालं त्याचा शोध घेऊ, यान सुरक्षित आहे. आम्ही लवकरच अपडेट सांगू. कॉम्पुटरने काऊट डाऊन थांबवले आहे. प्रत्यक्ष यानाच्या ठिकाणी पोहचल्यावर आम्ही पहाणी करु, विश्लेषण करु आणि टेस्टच्या पुढच्या वेळेची घोषणा करु ” अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी दिली.
-
८.४५ ची चाचणी थांबल्यानंतर बरोबर १० वाजता हे प्रक्षेपण सुरू झालं. आणि अवघ्या काही सेकंदातच हे यान अवकाशात झेपावलं.
-
अपेक्षेप्रमाणे चाचणीसाठी नियोजित केलेले आपातकालीन सुटकेचे सर्व टप्पे हे पूर्ण झाल्याचं यावेळी जाहिर करण्यात आलं आहे. आता गगनयानची आणखी एक चाचणी पुढील काही महिन्यात केली जाणार आहे.
-
गगनयान मोहिमेमधून मानव अवकाशात जाण्याची तसेच भविष्यात अवकाश स्थानक स्थापन होण्याची शक्यता आहे. गगनयान मोहिमेत एकूण दोन मानवरहित उड्डाणे होणार असून नंतर भारतीय व्यक्तींना अवकाशाची सफर करण्याची संधी मिळणार आहे.
-
आत्तापर्यंत भारतासह विविध देशांच्या अंतराळवीरांनी अवकाश वारी केली. रशिया, अमेरिका आणि चीन या तीन देशांनीच स्वबळावर म्हणजेच स्वतःच्या रॉकेटच्या–प्रक्षेपकाच्या साहाय्याने अवकाशात अंतराळवीरांना पाठवलेले आहे. आता चौथा देश म्हणून भारत या पंक्तीत बसेल.
-
म्हणजेच भारत स्वबळावर देशाच्या नागरिकांना अवकाशात पाठवणार असून या मोहिमेला ‘गगनयान’ हे नाव देण्यात आलं.
-
गगनयानमध्ये मानवी मॉड्यूल वापरणार आहे. ४०० किलोमीटर उंचीवर हे यान जाणार आहे. हे यान ५.३ टनांचे (१२,००० पौंड) आहे. या यानातून तीन अंतराळवीर सात दिवसांच्या अवकाश मोहिमेनंतर पृथ्वीवर सुरक्षितपणे परत येणे अपेक्षित आहे.
-
अंतराळ यानामध्ये जीवनप्रणाली आणि वातावरण नियंत्रणप्रणाली असेल. आपत्कालीन अवस्थेत मोहीम थांबवण्याची क्षमता आणि अंतराळवीरांना बाहेर पडण्यासाठी आवश्यक प्रणाली (क्रू एस्केप सिस्टम – सीईएस)ने सुसज्ज असेल. याची चाचणी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या मानवरहित उड्डाणावेळी घेतली जाऊ शकते.
-
या मोहिमेचं महत्त्व म्हणजे मानवी मोहिमा आखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची क्षमता तपासणे, अवकाशामध्ये वैद्यकीय, जैवअवकाशीय आणि अभियांत्रिकीचे प्रयोग करणे, अवकाशातील यानांचे प्रक्षेपण आणि एखाद्या अपेक्षित ठिकाणी यान पोहोचवणे व थांबवणे असे प्रयोग करणे, अवकाश स्थानकाची निर्मिती आणि अन्य ग्रहांवरील मानवी मोहिमांसाठी आंतरराष्ट्रीय अवकाश संस्थांबरोबर सहकार्य वाढविण्यास मदत, भविष्यातील जागतिक अवकाश स्थानकाचा विकास आणि राष्ट्रीय हिताच्या संशोधनामध्ये भारताचे स्थान निर्माण करणे, अवकाश क्षेत्रातील तंत्रज्ञानासाठी संशोधन आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये सहकार्याचे व्यासपीठ तयार करणे असे अनेकांगी आहेत.
-
अवकाश यान हे रॉकेटच्या अग्रभागावर – टोकावर असते. जर उड्डाणाच्या वेळी किंवा उड्डाण झाल्यावर रॉकेटमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला तर रॉकेटचा लगेचच स्फोट होण्याची शक्यता असते. कारण रॉकेटमध्ये कित्येक हजार टन असं अत्यंत ज्वलनशील इंधन असते. अशा वेळी अकाशयानातील अंतराळवीरांची सुरक्षा महत्त्वाची ठरते. तेव्हा हे अवकाश यान लगेचच मुख्य रॉकेटपासून वेगळं होत दूर जात सुखरूप पृथ्वीवर परतणार असं नियोजन असते.
-
चांद्रयान मोहिमेला मिळणारे यश बघून पंतप्रधानांनी मंगळवारी इस्रोसाठी महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे सांगितली. यामध्ये २०३५ मध्ये भारतीय अंतराळ केंद्र स्थापन करणे आणि २०४० पर्यंत चंद्रावर भारतीयांना पाठवता येणे, याचा समावेश आहे. आदित्य एल १, चांद्रयान ३ या मोहिमांना मिळत असणाऱ्या यशाबद्दल त्यांनी कौतुकही केले.

RCB vs GT: विराटला गोलंदाजी करता करता थांबला सिराज, दोघेही झाले भावुक; गिलच्या प्रतिक्रियेने वेधलं लक्ष; VIDEO होतोय व्हायरल