आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यात कांचनजंगा एक्सप्रेस रेल्वेला मालगाडीने धडक दिली आहे.या भयंकर रेल्वे अपघातात आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.६० जण जखमी झाले आहेत. मृत आणि जखमींची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य राबवले जात आहे. न्यू जलपाईगुडी रेल्वे स्थानकानजीक हा अपघात झाला आहे.मालगाडीने एक्स्प्रेसला पाठीमागून धडक दिली आहे. तीन डबे रुळावरून घसरले असून यात रेल्वे मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.परिस्थिती सध्या गंभीर असल्याचे, दार्जिलिंग पोलिस दलाचे अतिरिक्त एसपी अभिषेक रॉय यांनी सांगितले आहे.“आम्ही सुदैवाने बचावलो” अशी भावना प्रवाशांनी व्यक्त करत, घडलेला सर्व थरार एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितला आहे.पश्चिम बंगालमधील रेल्वे अपघात दुर्दैवी आहे, असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे.“युद्धपातळीवर मदतकार्य सुरु करण्यात आले आहेत. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ एकमेकांच्या समन्वयाने घटनास्थळावर काम करत आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आहेत”, असे वैष्णव यांनी सांगितले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून झालेला अपघात हा दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. तसेच मृत प्रवाशांप्रती शोक व्यक्त करत जखमींसाठी सर्वोतपरी तत्काळ मदत करण्याचे आवाहन रेल्वे विभाग आणि बचावकार्य करणाऱ्या संस्थाना केले आहे.(सर्व फोटो एएनआय वरून साभार) हेही पहा – PHOTOS : सिक्कीममध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड मुसळधार पाऊस; भूस्खलन होऊन ९ जण दगावले! पहा विदारक फोटो