-
सूरीनाम या दक्षिण अमेरिकेतील छोट्याशा देशामध्ये राजकीय क्रांती घडली आहे. मागील १५ वर्षांपासून एकाच नेत्याला निवडून देणाऱ्या या देशातील नागरिकांनी नवीन राष्ट्राध्यक्षही निवडला आहे. विशेष म्हणजे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष चॅन संतोखी (Chan Santokhi) हे भारतीय वंशाचे आहेत. त्यांच्याचबद्दल आपण या गॅलरीमधून जाणून घेणार आहोत. (सर्व फोटो: facebook/chansantokhi.su पेजवरुन)
-
मे महिन्यामध्ये सूरीनाममध्ये पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये चॅन यांनी विजय मिळवला. चॅन त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी देसी बावतास (Desi Bouterse) यांचा पराभव केला.
-
१६ जुलै २०२० रोजी संतोखी यांनी देशाचे नववे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. करोनाच्या पार्श्वभूमीवर अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितमध्ये हा शपथविधी पार पडला.
-
कोण आहेत चॅन संतोखी? चंद्रीकाप्रसाद चॅन संतोखी हे ६१ वर्षांचे असून ते देशातील प्रोग्रेसिव्ह रिफॉर्म पार्टीचे नेतृत्व करतात. त्यांच्या पक्षाला जनतेने भरघोस मतांनी जिंकून दिलं आहे. हा पक्ष सूरीनाममध्ये Vooruitstrevende Hervormings Partij म्हणजेच VHP नावाने लोकप्रिय आहे.
-
पूर्वी डच लोकांची वसाहत असणाऱ्या सूरीनाममध्येच चंद्रीकाप्रसाद यांचा ३ फेब्रुवारी १९५९ रोजी जन्म झाला आहे. त्यानंतर त्यांनी नेदर्लंडमधील पोलीस अकादमीमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले.
-
संतोखी हे नऊ भावंडांपैकी सर्वात लहान आहेत. त्यांचे वडील हे बंदरावर कामगार होते तर आई एका छोट्या दुकानामध्ये काम करायची.
-
मायदेशी म्हणजेच सूरीनाममध्ये परतल्यानंतर संतोखी यांनी वयाच्या २३ व्या वर्षी म्हणजेच १९८२ साली पोलीस खात्यामध्ये पोलीस निरीक्षक म्हणून नोकरी करण्यास सुरुवात केली.
-
संतोखी हे १९८९ साली राष्ट्रीय स्तरावरील गुन्हेगारी तपास विभागाचे प्रमुख झाले. त्यानंतर १९९१ साली संतोखी हे पोलीस दलाचे प्रमुख झाले.
-
२००५ ते २०१० या कालावीमध्ये संतोखी यांनी देशाचे कायदामंत्री म्हणून काम पाहिलं.
-
संतोखी कायदामंत्री असताने अनेक बड्या गुन्हेगारांना अटक करण्यात, देशातील अंमली पदार्थांचे रॅकेट उद्धवस्त करण्यात यंत्रणांना मोठं यश आलं. यामुळेच त्यांना शेरीफ हे टोपणनाव पडलं.
-
२०१० साली संतोखी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये बावतास यांच्याविरोधात लढले. मात्र त्यावेळी त्यांना यश मिळालं नाही.
-
बावतास हे २०१० नंतर २०१५ साली पुन्हा निवडून आले. यावेळेही सलग तिसऱ्यांदाच आपल्याच बाजूने जनमताचा कौल लागणार असा विश्वास बावतास यांना होता. मात्र मे महिन्यात झालेल्या निवडणुकांमध्ये जनतेने संतोखींच्या पारड्यात कौल दिला.
-
संतोखी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढलेल्या प्रोग्रेसिव्ह रिफॉर्म पार्टीने देशातील लोकसभा निवडणुकींमध्ये एकूण ५१ पैकी २० जागांवर विजय मिळवला. २६ मे रोजी या निवडणुकीचे निकाल लागले.
-
त्यानंतर संतोखीच राष्ट्राध्यक्ष होणार हे स्पष्ट झालं. २९ मे रोजी पक्षाने संतोखी यांच्या नावाची राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील उमेदवार म्हणून घोषणा केली. संतोखी यांनी ३० मे रोजी आपण राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले.
-
७ जुलै रोजी जनरल लिब्रेशन अॅण्ड डेव्हलपेंट पार्टीसोबत एकत्र येऊन प्रोग्रेसिव्ह रिफॉर्म पार्टीने देशात सत्ता स्थापन केली आहे.
-
संतोखी हे देशाचे राष्ट्राध्यक्ष असतील तर जनरल लिब्रेशन अॅण्ड डेव्हलपेंट पार्टीचे प्रमुख रुनी ब्रन्सविजक (Ronnie Brunswijk) हे व्हाइस प्रेसिडंट म्हणून काम पाहतील असं दोन्ही मित्र पक्षांनी ठरवलं.
-
८ जुलै या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत संतोखींच्या पक्षाला मिळालेले मताधिक्य पाहता इतर कोणत्याच नेत्याने राष्ट्राध्यक्ष पदासाठी अर्ज केला नाही. त्यामुळे संतोखी यांची राष्ट्राध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.
-
संतोखी हे देशभरामध्ये चॅन नावाने लोकप्रिय आहेत. सहा लाख लोकसंख्या असणाऱ्या सूरीनामच्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचे सर्वात मोठे आवाहन संतोखी यांच्यासमोर असणार आहे.
-
राष्ट्रीय नाणेनिधीच्या मदतीने देशातील आर्थिक घडी नीट बसवण्यासाठी संतोखी यांना काही कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत. यामध्ये इंधन, पाणी आणि विजेवरील सबसिडी कमी करण्यासारख्या जनतेचा विरोध होण्याची शक्यता असणाऱ्या निर्णयांचाही समावेश आहे.
-
आता या सर्व प्रश्नाना संतोखी सरकार कसं तोंड देत हे येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होईल. संतोखी यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा…
![Navagraha Fame Actor Giri Dinesh Passes Away](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Navagraha-Fame-Actor-Giri-Dinesh-Passes-Away.jpg?w=300&h=200&crop=1)
पूजा करताना आला हृदयविकाराचा झटका, ४५ वर्षीय अभिनेत्याचे निधन