-
तरुण भारतीय खेळाडू सध्या इंडियन प्रिमियर लीगचे पर्व गाजवताना दिसत आहेत. वेगवेगळ्या संघांसाठी खेळणाऱ्या अनेक भारतीय खेळाडूंनी स्पर्धेच्या सुरुवातीलाच आपल्या कमागिरीने चाहत्यांबरोबर क्रिकेट समिक्षकांवरही छाप पाडली आहे. अगदी ऋषभ पंत, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, मयंक अग्रवाल, देवदत्त पड्डीकल, शुभमन गील, नवदीप सियानी, कमलेश नागरकोट्टी आणि इशान किशन ही अशाच काही तरुण खेळाडूंची नाव आहेत ज्यांनी आतापर्यंतचा आयपीएलचा हंगाम गाजवला आहे. (फोटो: Twitter/iDarshanKumar वरुन साभार)
-
मात्र दमदाज कामगिरीबरोबरच या सर्व खेळाडूंमध्ये एक समान धागा आहे असं तुम्हाला सांगितल्यास नक्कीच आश्चर्य वाटेल. हा समान धागा म्हणजे हे सर्व खेळाडू भारताचा माजी क्रिकेटपटू असणाऱ्या राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली तयार झाले आहेत.
-
होय आयपीएलमध्ये अगदी परदेशी खेळाडूंवरही आपल्या कामगिरीचा प्रभाव टाकणारी ही टीम इंडियाची भावी पिढी १९ वर्षाखालील क्रिकेट संघातील आहे.
-
आज आयपीएलमध्ये चमकणारे अनेक खेळाडू हे राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली घडले आहेत.
-
हा संघ राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली तयार झालेला आहे अशी आठवण ट्विटरवरील सोशल इन्फ्ल्युएन्सर असणाऱ्या ट्रेंडुलकरने करुन दिली आहे. सध्या ट्रेंडुलकरचे हे ट्विट चांगलेच चर्चेत आहे.
-
अर्थात या प्रत्येक खेळाडूची अशी काही खास गुणवैशिष्ट्ये आहेत त्यांनी स्वत:च्या खेळावर मेहनत घेतली आहे. मात्र त्याचबरोबर त्यांना द्रविडने मार्गदर्शन केलं आहे हेही विसरता येणार नाही.
-
द्रविड राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख असून त्याने भारत अ आणि १९ वर्षाखालील क्रिकेट संघाचे प्रशिक्षक पद भुषवले आहे.
-
द्रविडने दिल्लीचा प्रशिक्षक म्हणून पंत आणि सॅमसनलाही २०१७ च्या आयपीएलमध्ये खेळासंदर्भातील धडे दिले आहेत.
-
भारताच्या १९ वर्षाखालील संघाने २०१८ च्या १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दणक्यात प्रवेश केला. पाकिस्तानचा पराभव करत भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला तेव्हाही #RahulDravid हा टॉप ट्रेण्ड होता. २०१८ साली १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेतील द्रविड सरांचा हा संघ खूपच शिस्तप्रिय असल्याचे अनेक सामन्यामध्ये दिसून आलं होतं.
-
द्रविड वेळोवेळी या तरुण खेळाडूंना मोलाचे सल्ले देत आला आहे. आयपीएल लिलावाकडे लक्ष न देता विश्वचषक स्पर्धेवर लक्ष देण्याचा सल्ला त्याने खेळाडूंना दिलेला.
-
केवळ आणि केवळ खेळावर या मुलांचे लक्ष केंद्रित रहावे म्हणून द्रविडने आणखीन एक नियम आपल्या संघासाठी घालून दिला होता. एकाग्र चित्ताने केवळ खेळातील बारकाव्यांवर लक्ष्य देऊन खेळात सुधारणा करता यावी या उद्देशाने द्रविडने या संघातील खेळाडूंवर मोबाईल बंद ठेवण्याचा आदेशच दिला होता. विश्वचषकाचा अंतीम सामना होईपर्यंत या संघातील कोणताही खेळाडू आपला मोबाईल वापरणार नाही असा नियमच द्रविडने बनवला होता. अर्थात द्रविड सरांनी बनवलेला हा नियम सर्वांनी पाळला होता हे वेगळं सांगण्याची गरज नाही.
-
भारतीय संघाने संपूर्ण १९ वर्षाखालील विश्वचषक मालिकेतील एकही सामना न गमावता जेतेपदावर नाव कोरल्यानंतर सर्वच स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. संघाचे मुख्य प्रशिक्षक असणाऱ्या राहुल द्रविडनेही अंतिम सामना संपल्यानंतर पहिली प्रतिक्रिया देताना विजयाबद्दल समाधान व्यक्त केले होते. भारतीय संघाच्या या क्लिन परफॉर्मन्सचे श्रेय अनेकांनी भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडला दिले होते. मात्र द्रविडने खेळाडूंने दमदार खेळ केल्याने विजय मिळाल्याचे सांगतानाच त्यांचा खूप अभिमान वाटत असल्याचे विजयानंतर पहिली प्रतिक्रिया देताना सांगितले होते.
-
आयसीसी युवा (१९ वर्षांखालील) विश्वचषक क्रिकेट स्पध्रेचे विजेतेपद पटकावल्यानंतरही द्रविडने हे दूरगामी नियोजनाचे फळ असल्याचे मत व्यक्त केलं होतं.
-
इंडियन प्रिमीअर लीग म्हणजेच ची भारतीय क्रिकेटपटूंमध्ये असणारी क्रेझ ही सर्वश्रुत आहे. त्यामुळेच २०१८ च्या आयपीएल लिलावाच्या कालावधीमध्ये भारताचा १९ वर्षांखालील संघ न्यूझीलंडमध्ये विश्वचषक स्पर्धेत खेळत असताना द्रविडने तरुण खेळांडूंना एक मोलाचा सल्ला दिला होता. आयपीएलच्या अकराव्या हंगामाचा लिलाव २७ आणि २८ जानेवारीरोजी बंगळुरुत रंगणार होता. भारताच्या १९ वर्षांखालील संघातील काही खेळाडूंना लिलावात चांगल्या रकमेची बोली मिळण्याची शक्यता होती. मात्र भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी आपल्या खेळाडूंना आयपीएल लिलावाऐवजी विश्वचषक स्पर्धेवर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिलेला.
-
“होय, विश्वचषकाची स्पर्धा सुरु असली तरीही सध्या खेळाडूंमध्ये आयपीएलच्या लिलावाची चर्चा सुरु आहे. मात्र सध्या खेळाडूंचं लक्ष हे विश्वचषक स्पर्धेवर असणं गरजेचं आहे. आयपीएलचा लिलाव प्रत्येक वर्षी होणार आहे. विश्वचषकाची संधी ४ वर्षांत पुन्हा येणार नाही”, असं म्हणत मी खेळाडूंना बांगलादेशविरुद्धच्या सामन्यावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला आहे असं राहुल ईएसपीएन क्रीकइन्फोला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाला होता. त्याचा हाच सल्ला ऐकणारे त्या वेळी संघात असणारे पृथ्वी शॉ, शुभमन गिल, हिमांशु राणा, अभिषेक शर्मा, रियान पराग, कमलेश नागरकोटी, शिवम मवी, अर्शदीप सिंह सारखे खेळाडू आज आयपीएल गाजवताना दिसत आहेत.
-
२०१८ चा अंडर १९ वर्ल्डकप पटकावणाऱ्या भारतीय संघाबरोबरच प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बक्षिसाची उधळण केली होती. मात्र संघाचा प्रशिक्षक असणाऱ्या राहुल द्रविड मात्र बीसीसीआयवर नाराज आहे. विशेष म्हणजे स्वतःला ५० लाख रुपये मिळाले असतानाच सपोर्ट स्टाफला मात्र फक्त २० लाख रुपये दिल्याने द्रविड नाराज असल्याचे समजते. मात्र, यावरुन द्रविडचे कौतुक होत असून द्रविडमधील प्रामाणिकपणा आणि खेळाप्रती असलेली भावना याची प्रचिती पुन्हा एकदा आली.
-
अंडर- १९ वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघातील खेळाडूंना बीसीसीआयने प्रत्येकी ३० लाख रुपये, सपोर्ट स्टाफला प्रत्येकी २० लाख रुपये आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला ५० लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर केले. मात्र यावरच द्रविड नाराज आहे. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफपेक्षा मुख्य प्रशिक्षकाला जास्त रकमेचे पारितोषिक जाहीर केल्याबद्दल द्रविडने नाराजी दर्शवली. सपोर्ट स्टाफमधील सर्वांना समान पारितोषिक दिले पाहिजे, असे द्रविडचे म्हणणे असून दुजाभाव होऊ नये यावर द्रविडने भर दिला आहे. द्रविडने त्याचे मत बीसीसीआयपर्यंत पोहोचवल्याचे समजते. सपोर्ट स्टाफमधील प्रत्येक सदस्याने एक टीम म्हणून काम केले आणि भारताला वर्ल्ड कपच्या विजेतेपदापर्यंत पोहोचवण्यात योगदान दिले. त्यामुळे सर्वांना समान पारितोषिकच मिळाले पाहिजे, अशी द्रविडची भूमिका होती.
-
सपोर्ट स्टाफमध्ये गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक अभय शर्मा, फिजिओथेरेपिस्ट योगेश परमार, ट्रेनर अनंत दाते, मंगेश गायकवाड आणि व्हिडिओ अॅनेलिस्ट देवराज राऊत यांचा समावेश आहे. द्रविडने यापूर्वीही सपोर्ट स्टाफच्या कामाचे कौतुक केले होते. ‘कधी कधी मलाच जास्त प्रसिद्धी मिळते. माझ्याकडे सर्वांचे लक्ष असते. पण सपोर्ट स्टाफमधील प्रत्येकजण माझ्या इतकीच मेहनत घेत असतो’, असे द्रविडने म्हटले होते. द्रविड अंडर १९ संघ आणि भारतीय अ संघाचा प्रशिक्षक असून त्याला बीसीसीआयकडून वर्षाला ३ कोटी रुपयांचे मानधन दिले जाते. वर्ल्डकपसाठी गेले महिनाभर सर्वांनीच अथक मेहनत घेतल्याचे द्रविडने म्हटले होते.
-
आयपीएलमधील तरुण खेळाडूंच्या कामगिरीमुळे द्रविड पुन्हा चर्चेत आला आहे.
-
ट्विटरवरही सध्याच्या आयपीएलमधील तरुण खेळाडूंचा खेळ पाहून द्रविडचं कौतुक होताना दिसत आहे.
-
सर्वोत्तम खेळाडू
-
त्याच्या काळातील सर्वोत्तम खेळाडू
-
निस्वार्थी माणूस
-
एक दिवस असाही येवो…
-
खरा द्रोणाचार्य
-
संपूर्ण पिढी घडवली त्याने
-
भारताचं हे नशीब आहे
-
तो काहीही करु शकतो
-
अनेकांनी अशाप्रकारेच द्रविडचं कौतुक केल्याचं चित्र सध्या सोशल नेटवर्किंगवर दिसत आहे.
-
तुम्हालाही द्रविडचे हे किस्से आणि त्यानी घेतलेली मेहनत पाहून सध्याच्या तरुण खेळाडूंचा नक्कीच अभिमान वाटत असेल यात शंका नाही.

‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स