-
किम हे नाव पुन्हा चर्चेत आलं आहे. नाही मात्र यामागे आता उत्तर कोरियामधील हुकूमशाह किम यांचा काहीही संबंध नसून सध्या चर्चेत असणारा किम म्हणजे एक कबुतर आहे. कबुतरांच्या शर्यतीमध्ये सहभागी होणाऱ्या किमचे वय अवघे दोन वर्ष आहे. (सर्व फोटो : एपी आणि रॉयटर्सवरुन साभार)
-
पाच दिवसांच्या कालावधीमध्ये या कबुतराने जगातील सर्वात महागडे कबुतर होण्याचा विक्रम दोनदा मोडला आहे.
-
न्यू किम नावाच्या या मादी कबुतराला चीनमधील एका अज्ञात व्यक्तीने १.६ मिलियन युरो म्हणजेच जवळजवळ १४ कोटींची बोली लावत विकत घेतलं.
-
आतापर्यंत कोणत्याही कबुतराला मिळालेली ही सर्वाधिक किंमत आहे. कबुतरांचा ऑनलाइन लिलाव करणाऱ्या पिजन पॅरडाइजने (पीआयपीए) यासंदर्भातील माहिती दिली आहे.
-
पीआयपीएच्या माहितीनुसार, किमसाठी लावण्यात आलेल्या बोलीने अर्मांडो नावाच्या बेल्जियन कबुतराच्या नावे असणारा विक्रम मोडीत काढला आहे. २०१९ साली एका चिनी व्यक्तीने अर्मांडोला १.३ मिलियन युरो म्हणजेच ११ कोटी ९० लाखांना विकत घेतलं होतं.
-
विशेष म्हणजे १४ कोटींना लिलाव झालेल्या किमसाठी अवघ्या २०० युरोपासून म्हणजेच १७ हजारांपासून बोली लावण्यास सुरुवात करण्यात आली होती.
-
कबुतरांची विक्री करणाऱ्या बेल्जियममधील एंटवर्प येथील होक वान डे वूवर नावाच्या कंपनीने त्यांच्याकडील सर्व शर्यतीच्या कबुतरांची या आठवड्यामध्ये निलामीच्या माध्यमातून विक्री केली. कबुतर पालनाच्या क्षेत्रामध्ये होक कंपनीचे मालक असणारी पिता-पुत्राची जोडी म्हणजेच गॅस्टन आणि कर्ट वान डे वूवर हे लोकप्रिय आहेत.
-
कबुतर पालनासंदर्भातील अनेक राष्ट्रीय पुरस्कारांवर त्यांनी आपलं नाव कोरलं आहे. अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी पहिला क्रमांक पटकावला आहे. त्यामुळेच त्यांच्या कंपनीमधील कबुतरांसाठी एवढी मोठी रक्कम मोजली जाते. मात्र किमसाठी एवढी मोठी बोली लावली जाईल असा विचार कोणी केली नव्हता असंही सांगितलं जात आहे.
-
पीआयपीएचे अध्यक्ष निकोलस गिसेलब्रेच यांनी एएफपीशी बोलताना, "मला विश्वास आहे की हा विश्व विक्रम आहे. एवढ्या किंमतीमध्ये कधीच कोणत्या कबुतराची अधिकृतपणे विक्री झाल्याची नोंद नाही," असं म्हटलं आहे.
-
एवढी रक्कम पुन्हा कोणत्याही कबुतराला मिळेल असं वाटतं नाही असंही गिसेलब्रेच यांनी म्हटलं आहे. या मादीच्या मदतीने कबुतरांची पैदास करण्याचा विचार हे कबुतर विकत घेणाऱ्या व्यक्तीने केला असावा असा अंदाजही गिसेलब्रेच यांनी व्यक्त केला आहे.
-
करोनामुळे जगभरातील आर्थिक मंदी आणि इतर कारणांमुळे यंदाच्या हंगामामध्ये कबुतरांच्या शर्यतीवर कमी पैसा लावला जाईल असं म्हटलं जात होतं. मात्र सर्व अंदाज चुकीचे ठरवत कबुतरांसाठी विक्रमी बोली लावल्या जात आहेत.
-
बेल्जियममध्येही कबुतरांची शर्यत हा आवडता खेळ आहे. या देशामध्येच वीस हजारांहून अधिक कबुतरं शर्यतीमध्ये सहभागी होतात. याच कबुतरांच्या शर्यतीमध्ये किमने यापूर्वी विक्रमी कामगिरी केली आहे.
-
मात्र अशी किमसारखी चांगली कबुतरं ही शर्यतीसाठी नाही तर प्रजननाच्या उद्देशाने दक्षिण आफ्रिकेमधील बडे व्यापारी विकत घेत असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. शर्यतीमध्ये पक्षाचा जीव जाण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळेच चांगली कामगिरी करणाऱ्या पक्षांचा प्रजननासाठी वापर करुन त्यांची पिल्लं विकने अधिक फायद्याचे असते.
-
किमला मिळालेल्या करोडो रुपयांच्या बोलीमुळे त्याची सुरक्षा करण्यासाठी विशेष नियुक्ती करण्यात आली आहे.
-
एका कंपनीला या कबुतराच्या सुरक्षेचे कंत्राट देण्यात आलं असून जोपर्यंत हे कबुतर त्याच्या नवीन मालकाच्या ताब्यात दिलं जात नाही तोपर्यंत त्याला काहीही होणार नाही यासाठी विशेष सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.

विरार ट्रेनमधली दादागिरी कधी थांबणार? भर गर्दीत अक्षरश: एकमेकांच्या जीवावर उठले; VIDEO पाहून तुम्हीच सांगा नेमकी चूक कुणाची?