-
दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने ट्विटरद्वारे दिलेल्या प्रतिक्रियेवर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
-
पॉप स्टार रिहानाने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी शेतकऱ्यांचं समर्थन केलं आणि भारत सरकारवर टीका केली. त्यांना केंद्र सरकारकडून अंतर्गत प्रश्नात हस्तक्षेप नको असं उत्तर देण्यात आलं. हे उत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या पत्रकात #IndiaTogether आणि #IndiaAgainstPropaganda या हॅशटॅग्सचा उल्लेख केला होता.
-
त्यानंतर, शेतकरी आंदोलनावरुन टीका करणाऱ्या आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींना प्रत्युत्तर म्हणून अनेक भारतीय सेलिब्रिटींनीही ट्विट करण्यास सुरूवात केली. यात टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंचाही समावेश होता.
-
पण, ट्विट करणाऱ्या भारतीय सेलिब्रिटी आणि खेळाडूंनी केंद्र सरकारने वापरलेल्या #IndiaTogether आणि #IndiaAgainstPropaganda या दोन हॅशटॅगचा वापर केला. सचिन तेंडुलकरनेही याच हॅशटॅगचा वापर केला होता.
-
सचिनच्या या ट्विटनंतर ज्या सचिनच्या खेळावर समस्त देशवासियांनी भरभरुन प्रेम केलं त्याच सचिनने शेतकऱ्यांविरोधात उद्गार काढले, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटायला सुरूवात झाली.
-
“भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड मान्य नाही. बाह्यशक्ती बघ्याच्या भूमिकेत राहू शकतात, पण हस्तक्षेप करु शकत नाहीत. भारतीयांना देशाबद्दल माहित आहे आणि देशवासीयांनी निर्णय घ्यायला हवा. देश म्हणून आपण सर्व एकत्र राहूया” अशी प्रतिक्रिया सचिनने दिली होती. सचिनच्या या ट्विटनंतर आनंदी गोपाळ आणि धुरळा यांसारख्या मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक समीर विध्वंस यांनीही परखड प्रतिक्रिया दिली आहे.
-
सचिनची बॅटिंग बघत लहानाचा मोठा झालो! तो माझ्यासाठी क्रिकेटचा देव होता! पण आता मात्र इथून पुढे सगळं वेगळं असेल, अशी प्रतिक्रिया समीर विध्वंस यांनी ट्विटरद्वारे दिली.
-
"सचिनची बॅटींग बघत लहानाचा मोठा झालो! तो माझ्यासाठी क्रिकेटचा देव होता! आयुष्यात अनेक निराश क्षणी मी त्याच्या इनिंग्ज बघायचो, खूप बरं वाटायचं. त्याच्या अनेक गोष्टी मनाला पटल्या नाहीत पण हे कधी बदललं नव्हतं. पण आता मात्र इथून पुढे सगळं वेगळं असेल. राग येतोचे पण वाईट जास्त वाटतंय!" असं ट्विट समीर विध्वंस यांनी केलं आहे. त्यांनी हे ट्विट करताना कुठेही सचिनला टॅग वगैरे केलेलं नाही, पण आपला राग त्यांनी व्यक्त केला आहे.
-
सचिनबाबत केलेल्या या ट्विटनंतर समीर विध्वंस यांना काही तिखट प्रतिक्रियांचाही सामना करावा लागला. त्यामुळे त्यांनी या ट्विटवरील रिप्लायचा पर्याय बंद केला आणि "मी सभ्य भाषेत माझी मतं मांडतो. सभ्य भाषेतच मांडत राहणार! तरीही त्यावर अर्वाच्य भाषेत अंगावर धाऊन येतात लोक. म्हणून रिप्लाय बंद करावे लागतात. माझ्या मतांशी सहमत नका होऊ, आग्रह नाहीचे. पण सभ्यता का सोडता?! मग अश्यांना ब्लॉक करावं लागतं. आणि ते मी करणार! सभ्यपणे मतमतांतरं असूदेत की!" असं दुसरं ट्विट केलं.
-
यासोबतच, शेतकरी आंदोलनाला रोखण्यासाठी अश्रूधूर, लाठ्या, आणि ठोकलेले खिळे तुम्हाला पटतात का? अंतर्गत प्रश्न सोडवण्यासाठी भारत अशाप्रकारे समर्थ आहे का ? असा सवालही त्यांनी अन्य एका ट्विटद्वारे विचारला. "भारताबाहेरच्या लोकांनी ‘आपल्या’ अंतर्गत मामल्यात बोलायची गरज नाही, तुमचं मत. चला ठीक! तुम्हाला सरकारची बाजू पटत्ये. ओके! तरीही ‘आपल्याच’ शेतकऱ्यांना आंदोलनापासून रोखण्यासाठी अश्रूधूर, लाठ्या,बांधलेल्या भिंती आणि ठोकलेले खिळे तुम्हाला पटतात का?! ‘भारत समर्थ आहे’ असा??!! असा सवाल त्यांनी विचारला आहे.

बापरे! मुंबई लोकलच्या महिला डब्यात धक्कादायक प्रकार; पोलीस असूनही घडलं भयंकर, VIDEO पाहून धडकी भरेल