-
मुंबईत दाखल झालेल्या मान्सूनने जोशात सलामी दिली. मुंबईत गेल्या काही तासांपासून पावसाचं धुमशान सुरू आहे. मुंबईसह उपनगरांतही मुसळधार पाऊस कोसळत असून, मान्सूनच्या पहिल्याच पावसाने मुंबईकरांची त्रेधातिरिपीट उडवली. पावसाने लोकल सेवेलाही ब्रेक लावला. पावसाची संततधार दिवसभर कायम आहे. (छायाचित्र > एएनआय)
-
हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजाच्या एक दिवस आधीच मान्सूननं मुंबईत पाऊल ठेवलं. सोमवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला. त्यानंतर मंगळवारी सकाळी पावसाचा जोर अधिकच वाढला. (छायाचित्र > एएनआय)
-
१४० ते १६० मिमी पावसाची नोंद झाली. मात्र, या पावसाने मुंबईची घडीच विस्कटून टाकली. मुंबईतील अनेक भागांत पाणी भरलं. तर मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर काही ठिकाणी रुळावर पाणी आल्यानं वाहतूक रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. (छायाचित्र > एएनआय)
-
मुसळधार पावसाने मुंबईसह उपनगरांत पाणीच पाणी झाले. रस्त्यांवर गुडघ्या इतकं पाणी साचलं, तर काही ठिकाणच्या 'सबवे'ला कालव्याचंच स्वरूप आलं होतं. मुंबई पाणी साचत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भर पावसात बाहेर पडले. (छायाचित्र > सीएमओ महाराष्ट्र ट्विटर)
-
हवामान विभागाने दिलेल्या सूचनेप्रमाणे मुंबई तसेच किनारपट्टीच्या जिल्ह्यांत काल रात्रीपासूनच पाऊस सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडून परिस्थिती जाणून घेतली. (छायाचित्र > सीएमओ महाराष्ट्र ट्विटर)
-
अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन परवाच मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक घेऊन सर्व यंत्रणांना सज्ज आणि सतर्क राहण्याचे निर्देश दिले होते त्याप्रमाणे आज मुख्यमंत्र्यांनी सकाळी संबंधित विभागाकडून माहिती घेतली. (छायाचित्र > सीएमओ महाराष्ट्र ट्विटर)
-
मुंबई तसेच किनारपट्टीवरील जिल्ह्यातील नागरिकांना असुविधा होणार नाही, यासाठी प्रशासनाने तातडीने पाऊले उचलावीत व जेथे आवश्यकता आहे तिथे मदत कार्य व्यवस्थित सुरू राहील याकडे लक्ष देण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. कोविडसह इतर कोणत्याही स्वरूपाच्या रुग्णसेवेत अडथळा निर्माण होणार नाही हे पाहण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. (छायाचित्र > सीएमओ महाराष्ट्र ट्विटर)
-
मुंबईत पंपिंग स्टेशन्स कार्यरत राहतील व साचलेले पाणी लगेच उपसा कसा होईल ते तातडीने पाहण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिले. (छायाचित्र > बृहन्मुंबई महापालिका)
-
जोरदार पावसामुळे काही ठिकाणी वाहतूक मंद किंवा थांबलेली असेल तिथे पोलीस व इतर यंत्रणांनी त्वरित कार्यवाही करून अडथळे दूर करावेत अशा सूचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. (छायाचित्र > मुंबई पोलीस)
-
सध्या पावसाची संततधार कायम असून, पुढील चार दिवसात पावसाचा जोर वाढणार आहे. तसा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला असून, मुंबईसह कोकण किनारपट्टी भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. (छायाचित्र > एएनआय)

मासिक पाळी आलेल्या विद्यार्थीनीबरोबर शाळेचं क्रूर कृत्य, आईने व्हिडिओ रेकॉर्ड केल्यामुळे सत्य आलं समोर; चौकशीचे आदेश