-
गुंतवणूक क्षेत्रातील मोठे प्रस्थ आणि दलाल स्ट्रीटचे तसेच भारताचे ‘वॉरेन बफेट’ म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचा आज ६१ वा वाढदिवस. राकेश झुनझुनवाला यांचा जन्म एका आयकर अधिकाऱ्याच्या सर्वसामान्य मध्यम वर्गीय घरामध्ये झाला.
-
१९८५ साली राकेश झुनझुनवालायांनी कॉलेजमध्ये असल्यापासूनच शेअर ट्रेडींगला सुरुवात केली. त्यावेळेस बीएससीचा सेन्सेक्स केवळ १५० अंकांवर होता. पहिल्यांदा त्यांनी पाच हजारांची गुंतवणूक करत ट्रेडिंगला सुरुवात केली. सध्या फोर्बर्सच्या आकडेवारीनुसार ३ जुलै २०२१ च्या माहितीनुसार झुनझुनवाला यांची संपत्ती ४.६ बिलियन डॉलर्स म्हणजेच ३४ हजार ३८७ कोटी रुपये इतकी आहे.
-
राकेश झुनझुनवाला यांनी सर्वात आधी टाटा टीसंदर्भात व्यक्त केलेला अंदाज बरोबर ठरला आणि १९८६ साली त्यांना पाच लाखांचा नफा झालेला. त्यांनी ४३ रुपयांना टाटा टीचे पाच हजार शेअर्स विकत घेतले होते. त्यानंतर अवघ्या तीन महिन्यांमध्ये या शेअर्सची किंमत १४३ पर्यंत वाढली त्यामुळेच त्यांनी गुंतवणूक केलेल्या रक्कमेच्या तिपटीहून अधिक पैसा त्यांना मिळाला.
-
सध्या शेअर बाजारामध्ये बिग बुल म्हणजेच सर्वाधिक नफा कमावणाऱ्यांपैकी एक असणाऱ्या राकेश झुनझुनवाला यांना हर्षद मेहताच्या कालावधीमध्ये मोठा नफा झाला होता. १९९२ च्या शेअर बाजार घोटाळ्याचा त्यांना मोठा फटका बसलेला. एका मुलाखतीमध्ये राकेश झुनझुनवाला यांनीच आपण शॉर्ट सेलिंगच्या माध्यमातून भरपूर पैसा कमवल्याचं कबूल केलं होतं.
-
१९९० च्या दशकामध्ये भारतीय शेअर बाजारामध्ये कार्टेलच्या माध्यमातून सौदे केले जात. मनु माणेक असंच एका मोठ्या शेअर बाजार गुंतवणुकदाराचं नाव होतं जो ब्लॅक कोब्रा नावाने ओळखला जाईल. याचबरोबर राधाकृष्ण दमानी (डी मार्टचे सर्वेसर्वा) आणि राकेश झुनझुनवाला यांच्या नावाचीही त्या काळात चर्चा होती. १९९२ साली पत्रकार सुचेता दलाल यांनी शेअर बाजारातील घोटाळा उघडीस आणला आणि शेअर बाजार कोसळला होता.
-
१९८७ मध्ये राकेश राधेशाम झुनझुनवाला यांनी रेखा झुनझुनवाला यांच्याशी लग्न केलं. अंधेरीत राहणाऱ्या रेखा हा स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदार होत्या. २००३ साली झुनझुनवाला यांनी त्यांची स्वत:ची स्टॉक ट्रेडींग फर्म रेअर एन्टरप्रायझेसची स्थापना केली. हे नाव त्यांनी पत्नीच्या आणि स्वत:च्या नावाच्या सुरुवातीच्या अक्षरांपासून ठेवलं आहे.
-
मार्च ३१, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीमध्ये राकेश झुनझुनवाला आणि त्यांच्या सहकाऱ्यांची गुंतवणूक ही ३७ कंपन्यांमध्ये आहे. यामध्ये टायटन कंपनी, टाटा मोटर्स, क्रिसिल, लिपिन, फोर्टीस हेल्थकेअर, नाझरा टेक्नोलॉजीज, फेड्रल बँक, डेल्टा क्रॉप, डीबी रिअॅलिटी आणि टाटा कम्युनिकेशनसारख्या बड्या कंपन्यांचा सहभाग आहे.
-
ट्रेण्डलेनीच्या आकडेवारीनुसार झुनझुनवाला यांची या मोठ्या कंपन्यांमधी एकूण गुंतवणुकीचं मूल्य १९ हजार ६९५ कोटी ३० लाख रुपये इतकं आहे. घड्याळं आणि दागिने बनवणाऱ्या टायटन कंपनीमध्ये राकेश झुनझुनवाला यांचा सर्वाधिक म्हणजेच ७ हजार ८७९ कोटी रुपयांचा वाटा असून त्या खालोखाल टाटा मोटर्समध्ये १ हजार ४७४ कोटी ४० लाख आणि क्रिसिलमध्ये १ हजार ६३ कोटी २० लाखांचा वाटा आहे.
-
राकेश झुनझुनवाला हे बँकींग क्षेत्रासंदर्भातील जाणकार आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी काही फारश्या चांगल्या नसणाऱ्या बँकांचा इनकम रेशो हाय कॉस्ट असून त्यांचे मूल्य अचानक पडते. या वर्षी भारताचा पर्सेंट नॉमिनल जीडीपी १४-१५ टक्क्यांनी तर पुढील काही वर्षांमध्ये १० ते १२ टक्क्यांनी वाढेल असं राकेश झुनझुनवाला सांगतात.
-
मागील काही वर्षांमध्ये भारतामध्ये झालेल्या मूलभूत सुविधांच्या कामांच्या आधारे आपण हा अंदाज व्यक्त करत असल्याचे सांगतात. राकेश झुनझुनवाला यांनी करोना कालावधीमध्ये घरुन काम करण्याचा प्रधान्य दिलं पाहिजे याबद्दल सर्वात आधी मत व्यक्त केलं होतं.
-
राकेश झुनझुनवाला यांनी भारतामध्ये करोनाची तिसरी लाट येणार नाही असं मत व्यक्त केलं आहे. “मी तुम्हाला पैजेवर पैसे लावून सांगायला तयार आहे की भारतामध्ये इतक्यात (करोनाची) तिसरी लाट येणार नाही,” असं त्यांनी म्हटलं आहे.
-
करोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे शेअर बाजारामध्ये मंदी येण्याची भीती गुंतवणूकदारांमध्ये आहे. याचसंदर्भात बोलताना गुंतवणुकदारांनी घाबरण्याची आणि तिसऱ्या लाटेमुळे मंदी येईल यासंदर्भात चिंता करण्याची गरज नसल्याचं झुनझुनवाला यांनी सांगितलं आहे. “कोणीही दोन लाटांचं भाकित व्यक्त केलं नव्हतं. मात्र आता सगळेजण तिसऱ्या लाटेची भविष्यवाणी करत आहेत. सध्या ज्या वेगाने लसीकरण सुरु आहे ते पाहता आपल्या सर्वांना हर्ड इम्युनिटी मिळेल. त्यामुळेच तिसरी लाट येण्याची शक्यता मला तरी वाटत नाही,” असं झुनझुनवाला यांनी आपलं मत मांडताना म्हटलं आहे.

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…