-
मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी सध्या सोशल नेटवर्किंगवर चर्चेत आहे ती ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ या शिर्षकाखाली लिहिलेल्या पोस्टमुळे. तशीही हेमांगी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती बिनधास्तपणे तिची मतं सोशल नेटवर्किंगवर मांडताना दिसते. नेटकऱ्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर, अगदी स्त्री पुरुष समानतेपासून ते ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देण्यापर्यंत सारं काही हेमांगी प्रो स्टाइलने करते.
-
नुकताच हेमांगीने पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमुळे तिच्यावर ट्रोलधाड पडली तर तिने स्त्रीयांना त्यांच्या कपड्यांवरून तसेच अंर्तवस्त्रांवरुन ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच सुनावले. तिची ही पोस्ट सध्या चर्चेत असून तिला अनेक कलाकारांनी पाठिंबा दिला आहे. सध्या हेमांगी चर्चेत येण्यामागे नक्की काय घडलं ते आधी जाणून घेऊयात..
-
हेमांगीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर “गोल पोळ्याचं गुपित!” असं कॅप्शन देत एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओवर काही नेटकऱ्यांनी दिलेल्या कमेंटनंतर हेमांगीने तिच्या इन्स्टास्टोरीवर एक पोस्ट शेअर केलीय. यात हेमांगी कवीने कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना चांगलंच सुनावलं.
-
“हो मला स्तन आहेत. त्याला स्तनाग्रेही आहेत अगदी पुरुषांसारखी! जसे चालताना माझे हातपाय हलतात तसचे काम करताना माझे स्तन हलतात. कारण मी सस्तन प्राणी आहे. मादी आहे! ज्यांचे हलत नाहीत अशांना माझा त्रिवार सलाम. आता मी घरात, बाहेर, सोशल मीडियावर अंर्तवस्त्र (ब्रा) घालायची कि नाही ही माझी पंसत आहे," अशा शब्दांमध्ये हेमांगीने आपला राग व्यक्त केला.
-
“या व्हिडीओत दिसणारे माझे स्तन आणि स्तनाग्रे, त्यावरून मला जज करण्याचा, अश्लिलतेचा, माझ्या संस्कारांचा माझ्या बुद्धीमत्तेचा, माझ्या इमेज विषयी घाणेरड्या चर्चा, गॉसिप करून जो काय संबध जोडताय ती तुमची पसंती” असं म्हणत हेमांगीने ट्रोलर्सचा समाचार घेतला.
-
याशिवाय हेमांगीने तिच्या इन्स्ट स्टोरीच्या पोस्टमध्ये पुन्हा एक तळटीप दिलीय. यात ती म्हणाली “मला डायरेक्ट मेसेज करून माझ्या विषय काळजी दाखवणाऱ्या हितचिंतकांनो..चिल… या एवढ्या चिंधी गोष्टीवरुन मला अनफॉलो करावसं वाटतं असेल तर खुशाल करावं. विचित्र विचारांचे फॉलोअर्स नसलेलं कधीही चांगल”, असं ती म्हणालीय.
-
ट्रोल करणाऱ्यांला सडेतोड उत्तर देण्याची हेमांगीची ही पहिली वेळ नाही या आधी देखील हेमांगीने अनेकदा ट्रोलर्सची बोलती बंद केलीय. अशीच तीची आणखीन एक पोस्ट काही महिन्यांपूर्वी व्हायरल झालेली.
-
हेमांगीने न बोलल्या जाणाऱ्या विषयावर बोलण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीय यापूर्वीही तिने सार्वजनिक ठिकाणी पाश्चात्य पद्धतीच्या शौचालयाचा वापर करण्यावरुन लिहिलेली पोस्ट चांगलीच गाजली होती.
-
सध्या व्हायरल झालेल्या हेमांगीच्या पोस्टमध्ये तिने समाजात नेहमी स्त्रीयांवर कपड्यामुळे असणाऱ्या बंधनांच्या प्रश्नावर बेधडक मत मांडले आहे. मात्र यापूर्वी १० ऑक्टोबर २०२० रोजी तिने पाश्चमात्य पद्धतीची शौचालये वापरताना पुरुष कशापद्धतीने बेजबाबदार वर्तन करतात यावरुन परखड मत व्यक्त केलेलं.
-
“हल्ली बऱ्याच कामाच्या ठिकाणी वेस्टर्न टॉयलेट (कमोड) असतात. त्यात काही कॉमन टॉयलेट म्हणजे स्त्री- पुरुषांकरता एकचटॉयलेट असतं. अशावेळी ते टॉयलेट कसं वापरावं याचं ज्ञान हे शाळेत किंवा घरातच पालकांनी लहान वयात आपल्या मुलामुलींना द्यायला हवं,” असं म्हणत हेमांगीने आपलं मत एका पोस्टमधून मांडलं होतं. तसेच हा अत्यंत गरजेचा विषय असल्याचंही तिने म्हटलं होतं.
-
"पुरुष मूत्र विसर्जन करताना ‘कमोड’च्या रिंगवर, आजूबाजूला जी काही रांगोळी करून ठेवतात ते बघूनच अंगावर शिसारी येते. स्त्रियांची मूत्र विसर्जन करायची पद्धत या पुरुषांना माहीत नसते का? की याचा विचारच केला जात नाही? की अशा घाणेरड्या ‘कमोड’वर त्या कश्या बसत असतील? बसत नसतील तर मग कशा मॅनेज करत असतील? त्यांचा हा मूलभूत नैसर्गिक हक्क बजावताना काय द्राविडी प्राणायाम करत असतील याचा विचार होत नाही का? मासिक पाळीच्या (पिरेड्सच्या) वेळी काय करत असतील याचा विचार होत नाही का?,” असे प्रश्न तिने उपस्थित केलेले.
-
तसेच पुढे लिहिताना तिने या गोष्टींचा विचार करण्याची गरज असल्याचं म्हटलं होतं. “याचा विचार होत नसेल तर करावा. स्त्री पुरुष दोघांनी! ‘कमोड’ कसं वापरावं हे कळतं, माहीत नसेल तर न लाजता विचारावं, शिकून घ्यावं! कारण त्याचा थेट संबंध दोघांच्या ही हायजीन (स्वच्छता), हेल्थशी (आरोग्याशी) असतो. सगळ्यांनी या विषयी ओपनली बोलावं", असं हेमांगी म्हणाली होती.
-
"कित्येकदा काहीजण आपला कार्यभाग उरकल्यावर फ्लशही ही करत नाहीत. अरे काय? एक बटण दाबायचं असतं फक्त… तेवढं ही होऊ नये आपल्याकडून? बरं ते दिवसभर पुन्हा आपल्यालाच वापरायचं असतं,” असं म्हणत हेमांगीने कॉमन टॉयलेट बेजबाबदारपणे वापरणाऱ्या व्यक्तींवर टीका केलेली.
-
“‘कमोड’, वेस्टर्न टॉयलेट आणि युरोपियन टॉयलेट कसे वापरावेत याची आपल्याला गुगलवर माहिती मिळवता येईल. पण आपल्याला साधं फ्लश बटणही पुश करता येत नसल्याचा आळस बघता इथे मी मला जमेल तसं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे,” असं म्हणत हेमांगीने टॉयलेट कसं वापरावं हे सुद्धा पुढे सांगितलं होतं.
-
“पुरुषांनी मूत्र विसर्जन करताना ‘कमोड’ची रिंग (फ्रेम) वर करून आपला कार्यभाग उरकून फ्लश करून झाल्यावर पुन्हा ती फ्रेम टॉयलेट सीटवर पाडायची असते. ‘कमोड’ सीट स्वच्छ, कोरडं कसं राहील याकडे लक्ष द्यावं. व्यवस्थित प्लश झालंय की नाही ते पहावं जेणे करुन दुर्गंधी येऊन जीव गुदमरुन जाऊ नये याची खात्री करुन मगच बाहेर पडावं,” असं हेमांगीने पोस्टमध्ये सांगितलेलं.
-
तसेच पुढे, “काही पुरुष आम्ही ती रिंग वर करू पण पुन्हा ती खाली पाडणार नाही असा भलताच पुरूषी अहंकार गाजवतात त्यांना कोपऱ्यापासून दंडवत,” म्हणत तिने टोलाही लगावलेला.
-
“या गोष्टीकडे आपण कधीच गांभीर्याने पाहत नाही किंवा हसण्याचा, चेष्टेचा विषय म्हणून सोडून देतो, पण त्यामुळे होणारे अनेक त्रास, इन्फेक्शन याकडे अनाहूतपणे आपण दुर्लक्ष करतोय. हे शिकून किंवा समजून घेण्यात काहीच कमीपणा नाही. उलट स्त्रियांचं आरोग्य यावर ही अवलंबून असतं याचा विचार करावा. प्रत्येकाला ‘मनासारखं’ ‘मनोसोक्त’ हलकं व्हावंसं वाटत असतं याचा आदर व्हावा एवढीच इच्छा,” असं हेमांगीने या पोस्टच्या शेवटी म्हटलं होतं.
-
हेमांगीच्या अशापद्धतीच्या काही इतरही पोस्ट सोशल नेटवर्किंगवर चर्चेत आल्याचं पहायला मिळालं होतं.
-
नेहमीच तिने व्यक्त केलेल्या मतांवर अनेक सेलिब्रिटी तिच्या पाठीशी उभे असल्याचं चित्र पहायला मिळतं.
-
हेमांगीने नुकत्याच केलेल्या ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ या बेधडक पोस्टवर दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी तिचं कौतुक केलंय.
-
“विचार म्हणुन खतरनाक ऽऽऽऽ..खन म्हणुन वरचा दर्जा …साहित्य म्हणून कालातीत ..तू लढ हेमांगी,”असं म्हणत प्रविण तरडेंनी त्यांच्या हटके स्टाइलने हेमांगीला पाठिंबा दिला आहे. तर अभिनेत्री, लेखिका आणि दिग्दर्शका रसिका आगाशेने देखील हेमांगीचं कौतुक केलंय.”लव्ह यू मुली, ब्रालेस असण्याचा आनंद आहे.” असं रसिका म्हणाली.
-
बरं हेमांगी आपल्या इन्ताग्रामवर प्रचंड सक्रीय असल्याने ती अनेकदा चाहत्यांच्या ट्रोलिंगवर ट्रोलर्सचीही फिरकी घेताना दिसते.
-
हेमांगी केवळ सामाजिक विषयांवर भाष्य करते असं नाही ती तिच्या ट्रोलर्सला पुरुन उरते.
-
त्याचं एक उदाहरण सांगायचं झाल्यास, मध्यंतरी हेमांगीने तिच्या फेसबुक अकाऊंटवर नव्या फोटोशूटमधील काही फोटो शेअर केले होते. या फोटोत हेमांगीने टॉप आणि टोन्ड जिन्स (रिप्ट जिन्सचा एक प्रकार) परिधान केल्याचं दिसत होतं. मात्र, तिचे हे फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला चांगलंच धारेवर धरलं.
-
हेमांगीच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या असून लाईक्सचा वर्षाव केला आहे. पण काही नेटकऱ्यांनी या फोटोंमुळे हेमांगीला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला असता ती त्यांना पुरुन उरली. पाहा काही ट्रोलर्सच्या कमेंट्स आणि त्यावर हेमांगीने दिलेली मजेदार उत्तरं…
-
एका यूजरने तर 'किती गरीब आहात तुम्ही, फाटके कपडे घालता' असे म्हणत कमेंट केली आहे. हेमांगीने त्याला जशास तसं उत्तर दिलं होतं.
-
'मला वाटल नव्हत तुम्ही इतके फटके कपडे घालत असाल म्हणून ते पण त्याची satail' असं एकाने म्हटलं असता हेमांगी काय म्हणाली पाहा.
-
'खरं सांगू काहीच म्हणजे बिलकुल नाही आवडलं' असंही काही युजर्सने म्हटलं आहे. हेमांगीने या चाहत्याची फिरकीच घेतली.
-
बाईच्या जातीला साडीच सुंदर दिसते.' असं एका नेटकऱ्याने म्हटलं तर त्यावर हेमांगीने उत्तर दिलं होतं.
-
अनेक चाहत्यांनी हेमांगीला पाठिंबा दिल्याचं पहायला मिळालं होतं.
-
'लक्ष वेधून घेण्यासाठी च फोटो आहे ना.. तस ही' असं म्हणत तिला काही जाणांनी ट्रोल देखील केलं मात्र हेमांगीने त्याला सडेतोड उत्तर दिलं.
-
एकंदरितच हेमांगीचा हा अवतार पाहिल्यास तिला ट्रोलर्सला ट्रोल करणारी अभिनेत्री म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही.
-
हेमांगीची अनेक विषयांबाबतची मत ही चाकोरीबद्ध नसल्याने तिच्या या बोल्ड आणि बिनधास्त वक्तव्य तिच्या चाहत्यांना एखाद्या विषयाकडे पाहण्याची वेगळी दृष्टी देतात असं कमेंटवरुन दिसून येतं.
-
अर्थात हेमांगीला पाठिंबा देणारे जसे आहेत तसा तिला विरोध करणारेही आहेत. मात्र मूड असल्यावर मर्यादेबाहेर जाऊन ट्रोलिंग करणाऱ्यांची ती चांगलीच खरडपट्टी काढते, हे अनेकदा दिसून आलंय.
-
ते काहीही असलं तरी कवी नावाची ही अभिनेती आपल्या लेखणीमधून सामान्यपणे न बेललो जाणारे विषय चाहत्यांपर्यंत पोहचते आणि बेधडकपणे चाकोरीबद्ध विचारसरणीला न पटणारी मत मांडते हे कौतुकास्पदच आहे. (सर्व फोटो facebook/Hemangi Kavi-Dhumal वरुन साभार)

भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”