-
वनप्लस या जगप्रसिद्ध मोबाइल कंपनीचा नुकताच लॉन्च झालेला नॉर्ड टू या स्मार्टफोनचा स्फोट झाल्याची बातमी समोर आली आहे. या स्फोट इतका भयंकर होता की स्मार्टफोन वापरणाऱ्या महिलेला या अपघाताचा मोठा धक्काच बसलाय.
-
बेंगळुरुमधील अंकुर शर्मा नावाच्या व्यक्तीने यासंदर्भात ट्विटरवरुन कंपनीकडे तक्रार केली होती.
-
अंकुर यांनी नंतर आपलं ट्विट डिलीट केलं असलं तरी त्या ट्विटचे स्क्रीनशॉर्ट आणि त्यांनी त्या ट्विटसोबत पोस्ट केलेले स्फोट झालेल्या फोनचे फोटो व्हायरल झालेत.
-
अंकुर यांनी दिलेल्या माहितीनुसार पाच दिवसांपूर्वीच त्यांच्या पत्नीसाठी घेतलेला नॉर्ड २ या स्मार्टफोनचा स्फोट झाला आणि त्यामधून धूर येऊ लगाला.
-
या स्फोटामुळे अंकुर यांच्या पत्नीला मोठा मानसिक धक्का बसला असून यामध्ये ती जखमीही झाल्याचं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. अशाप्रकारे नॉर्ड टूचा स्फोट होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
-
दरम्यान अंकुर यांनी केलेल्या या ट्विटला कंपनीने प्रतिसाद दिल्यानंतर त्यांनी आपलं ट्विट डिलीट केलं असलं तरी या स्फोट झालेल्या फोनचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेत.
-
व्हायरल फोटोंमध्ये फोनचं पूर्णपणे नुकसान झाल्याचं दिसत आहे. फोनचा रेअर पॅनल, फ्रेम आणि डिसप्ले पूर्णपणे जळून खाक झाला आहे.
-
या फोनमध्ये लिथियम बॅटरीचा वापर होतो. फोनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने फोनच्या बॅटरीचा स्फोट झाल्याचा अंदाज लेट्सगोडिजीटल या वेबसाईटने व्यक्त केलाय.
-
मात्र हा फोन फुटला असला तरी ही एखाद्या डिव्हाइजसंदर्भात घडलेली घटना असून याचा अर्थ सर्वच फोन किंवा हा मॉडेल डिफेक्टड आहे असा या घटनेचा अर्थ होत नसल्याचंही जाणकार सांगतात.
-
या फोनचे फोटो व्हायरल झाल्यानंतर वनप्लसने अधिकृतपणे एक पत्रक जारी करुन आपली भूमिका स्पष्ट केलीय.
-
"आमच्या ग्राहकांचं आरोग्य आणि सुरक्षा याला कायमच आमचं पहिलं प्राधान्य आहे. आम्ही या घटनेसंदर्भात माहिती मिळाल्यानंतर तातडीने या ग्राहकाशी संपर्क करुन काय घडलं हे जाणून घेत. कंपनीच्या स्तरावर या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. या स्मार्टफोनचा स्फोट हा आयसोलेटेड इन्सिडन्स प्रकारातील आहे," असं कंपनीने पत्रकात म्हटलं आहे.
-
तसेच, "हा स्फोट बाहेरील घटकांमुळे घडला असून यामध्ये निर्मितीदरम्यानचे दोष किंवा प्रोडक्टसंदर्भातील इतर कोणतेही कारण समोर आलेले नाही. मात्र आम्ही या ग्राहकांच्या संपर्कात असून आम्ही त्यांना सर्व मदत करत आहोत," असंही कंपनीने म्हटलं आहे.
-
"आम्ही आमच्या ग्राहकांना सांगू इच्छितो की आमचे सर्व प्रोडक्ट हे दर्जात्मक चाचण्या आणि सुरक्षा चाचण्यानंतरच ग्राहकांपर्यंत पोहचवले जातात. यामध्ये प्रेशर आणि इम्पॅक्ट टेस्टसारख्या चाचण्यांचाही समावेश असतो. हे फोन ग्राहकांच्या वापरासाठी योग्य असावेत असा आमचा प्रयत्न कायमच असतो," असंही कंपनीने म्हटलं आहे.
-
अंकुर यांच्या ट्विटनंतर वनप्लस सपोर्टच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन या प्रकरणासंदर्भातील माहितीही देण्यात आली. "तुम्हाला आलेला अनुभव समजल्यानंतर आम्हाला धक्का बसलाय. आम्हाला तुमची चिंता वाटत असल्याने आम्ही तुमच्यापर्यंत पोहचू इच्छितो. कृपया तुम्ही थेट मेसेजच्या माध्यमातून आमच्याशी संपर्क साधा आम्ही तुम्हाला यासंदर्भातील सर्व मदत करु," असं वनप्लसने म्हटलं होतं. मात्र कंपनीने शर्मा यांना पत्नीच्या जळालेल्या फोनच्या जागी नवीन फोन दिला का हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
-
सध्या स्फोट झाल्याने वनप्लस कंपनी चर्चेत असली तरी यापूर्वीही स्मार्टफोनचा स्फोट झाल्याच्या घटना घडल्यात. याच वर्षाच्या सुरुवातीला रेडमी नोट ९ प्रो/प्रो मॅक्सला आग लागल्याची घटना घडलेली. तपासानंतर कंपनीने ग्राहकाच्या बेजबाबदारपणामुळे घटना घडल्याचं सांगितलं होतं. (सर्व फोटो ट्विटर आणि इंडियन एक्सप्रेसवरुन साभार)

“असा असतो मराठी मुलींचा दणका”, ‘नटीनं मारली मिठी’ गाण्यावर तरुणींचा जगात भारी डान्स! VIDEO पाहून म्हणाल, वाह्ह…