-
भारत सरकारकडून प्रदान करण्यात येणाऱ्या पद्म पुरस्कार सोहळ्यामध्ये मागील काही वर्षांपासून सामान्यातील असामान्य म्हणजेच लोकांचे पद्म पुरस्कार विजेत्या या पद्धतीने पुरस्कार दिले जात आहेत. असेच एक नाव यंदा दिसून आलं, ते म्हणजे हरेकाला हजाब्बा.
-
हरेकाला हजाब्बा हे मूळचे कर्नाटकचे असून त्यांच्या नावाची सध्या सोशल नेटवर्किंगवर तुफान चर्चा आहे. ही चर्चा असण्यामागील कारण म्हणजे एक संत्री विकणारा म्हणून काम करणारे हरेकाला हजाब्बा हे देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एकाचे मानकरी ठरलेत.
-
२०२० साली प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली तेव्हा त्या यादीमध्ये सात पद्मविभूषण, १६ पद्मविभूषण आणि ११८ जणांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात येणार असल्याचं निश्चित झालं. याच यादीमध्ये हरेकाला हजाब्बांचंही नाव होतं.
-
उल्लेखनीय आणि समाजउपयोगी कार्याची दखल घेत सरकारने सामान्यातील असामान्य या पद्धतीने काम करणाऱ्यांना यंदाही या पुरस्कारांनी सन्मानित केलंय. भारत सरकारकडून कर्नाटकातील हरेकाला हजाब्बा यांनाही यंदा पद्मश्री प्रदान करण्यात आला.
-
पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर हजाब्बांच्या नावाची सोशल मिडियावर तुफान चर्चा आहे. त्यांच्या संघर्षाची कहाणी अनेकांना प्रेरणा देणारी आहे. आपण आपलं काम करत राहिल्यास आपण कोणत्याही ठिकाणी असलो तरी त्याची दखल घेतली जाते हे हजाब्बांच्या उदाहरणातून दिसत येत असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. पण हजाब्बांची नक्की कहाणी आहे तरी काय आणि त्यांनी काय काम केलंय हे अनेकांना माहिती नाहीय, त्यावर नजर टाकूयात…
-
हजाब्बा हे एक फळविक्रेते असून त्यांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याने त्यांना यंदा पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला.
-
विद्यार्थ्यांना शिक्षणोपयोगी वातावरण कसं निर्माण करता येईल यासाठी हजाब्बा सतत काम करतात. फळविक्री करत असल्याने हजाब्बा त्यांना स्थानिक भाषांचं ज्ञान फार उत्तम आहे.
पण एकदा एक परदेशी दाम्पत्य हरेकाला यांच्याकडे संत्री विकत घेण्यासाठी आले होते. मात्र हरेकाला यांना केवळ स्थानिक भाषा येत असल्याने भाषेच्या अडचणीमुळे त्यांना परदेशी दाम्पत्याची भाषा समजली नाही. -
भाषा न समजल्याने ते दाम्पत्य संत्री न खरेदी करताच निघून गेलं. या घटनेचं हरेकाला यांना खूप वाईट वाटलं. विक्री झाली नाही यापेक्षा आपण इंग्रजीत संवाद साधू शकलो नाही याचं त्यांना वाईट वाटलं.
-
मात्र याच निराशेमधून एक आशेचा किरण दिसावा तसा त्यांनी एक आयुष्य बदलणारा निर्णय घेतला.
-
या घटनेनंतर हजाब्बा यांना आपल्या गावात प्राथमिक शाळा असणं गरजेचं असल्याची जाणीव त्यांना झाली. तसेच येणाऱ्या पिढीला अशा गोष्टीचा सामना करावा लागू नये यासाठी शाळा उभारण्याची गरज वाटली.
-
दिवसभर संत्री विकून अवघे १५० रुपये कमावणाऱ्या हजाब्बा यांनी गावामध्ये शाळा उभारण्यासाठी पैसे साठवायला सुरूवात केली.
-
पैसे साठवून हजाब्बा यांनी ज्या गावात शाळा नव्हती तिथे लहान मुलांसाठी प्राथमिक आणि माध्यमिक शाळा उभारली.
मँगलोर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात हजाब्बा यांची जीवनगाथा शिवकण्यात येते. सुरुवातीला केवळ २८ विद्यार्थी त्यांच्या शाळेत यायचे. पण विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यानंतर जागेची कमतरता जाणवू लागली आणि हजाब्बांनी पुन्हा एकदा नवीन निश्चय केला. -
हजाब्बा यांनी जागा कमी पडू लागल्यानंतर नवीन शाळेसाठी अजून पैसे साठवले आणि एक लहानशी शाळा बांधली गेली. एवढेच नाही तर सध्या ते विश्वविद्यालय उभारण्याच्या तयारीत आहे.
-
हजब्बा २०१२ पासून आपल्या गावात महाविद्यालय सुरू करण्यासाठी झटत आहेत. सरकारकडे त्यांनी तशी मागणीही केली आहे. लवकरच त्यांचं हे स्वप्नदेखील पूर्ण होईल अशी अशा त्यांना वाटतेय. त्यासाठी या पद्मश्री पुरस्काराच्या रुपाने मिळालेली कौतुकाची थाप काम वगाने होण्यासाठी मदत करणारी ठरेल अशी त्यांची अपेक्षा आहे.
-
“गृह मंत्रालयाकडून पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याचा फोन आला. पुरस्कार जाहीर झाला यावर विश्वासच बसत नाही. पद्मश्री पुरस्कार मिळेल याचा स्वप्नातही विचार केला नव्हता. खूप आनंद झाला आहे’ अशी प्रतिक्रिया हरेकाला हजाब्बा यांनी पुरस्काराच्या घोषणेनंतर दिली होती.
-
हजब्बा यांचं रहाणीमान अगदी साधं आहे. हा वरील फोटो बघा. ते पुरस्कार सोहळ्यासाठी दिल्लीला गेले होते तेव्हाचा हा फोटो असून त्यांच्या हा फोटो व्हायरल झालाय. त्यांच्या साधेपणासाठी अनेकजण त्यांचं कौतुक करतायत.
-
गावापासून २५ किलोमीटर दूर असलेल्या जिल्हा पंचायत कार्यालयात जाऊन ते शिक्षणासंदर्भातील आपल्या गावातील कामांबद्दल अधिकाऱ्यांची भेट घेतात तसेच शैक्षणिक सुविधांचीही माहिती वरचेवर घेत असतात.
-
स्वतःच्या उभारलेल्या शाळेत सुरुवातीला मुलांनी यावं म्हणून ते स्वत:च शाळेची देखभाल करायचे. अगदी साफसफाई ते विद्यार्थ्यांसाठी उकळलेल्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यापासून सर्व काम ते सुरुवातीच्या दिवसांमध्ये करायचे.
-
हरेकाला यांना एका प्रसंगामधून शिक्षणाचं महत्त्व कळलं आणि त्यांनी गावकऱ्यांना समजावलं. त्यानंतर गावकऱ्यांमध्ये त्यांनी शिक्षणासंदर्भात जागृकता निर्माण केली आणि विश्वास संपादन केला. आज त्याच विश्वासाच्या जोरावर आणि आपल्या कर्तृत्वाच्या बळावर त्यांनी पद्मश्रीपर्यंत झेप घेतलीय. (सर्व फोटो ट्विटरवरुन साभार)

‘ठरलं तर मग’मध्ये एन्ट्री घेणार ‘हा’ लोकप्रिय अभिनेता! यापूर्वी स्पृहा जोशीच्या मालिकेत केलंय काम, कोणती भूमिका साकारणार? पाहा प्रोमो