भाजपाचे सध्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि सध्या उपमुख्यमंत्री असणाऱ्या अजित पवार यांनी पहाटे शपथ घेऊन अचानक महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देण्याच्या घटनेला आज दोन वर्ष पूर्ण झाली. -
२०१९ साली महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेच्या संघर्षाच्या वेळेस देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापनेचा दावा करत भल्या पहाटे राजभवानावर जाऊन मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती.
-
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दोन परस्परविरोधी विचारधारांचे प्रतिनिधीत्व करणारे हे दोन नेते सत्ता स्थापनेसाठी एकत्र आल्याने महाराष्ट्रात सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. हे कसे घडू शकते?, असाच प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडला होता.
-
अवघ्या काही दिवसांनंतर राजकीय घडामोडींमुळे अजित पवारांनी आपला पाठिंबा काढून घेतला आणि फडणवीसांनी राजीनामा दिला.
-
भाजपाला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या अजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळं बहुमत चाचणी आधीच अल्पमतात आलेलं फडणवीस सरकार अवघ्यात साडेतीन दिवसात कोसळलं.
-
अजित पवारांच्या पाठिंब्याने भाजपा बहुमत सिद्ध करु शकलं आणि सरकार स्थापना झाली तर अजित पवार यांच्या गटाला १२ मंत्रीपदं आणि १५ महामंडळं दिली जातील असं त्यावेळी सांगण्यात येत होतं.
-
मात्र अजित पवार यांनी काही तासांमध्ये राजीनामा दिल्याने सर्वात कमी कालावधीसाठी राज्याचा मुख्यमंत्री होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला गेला होता.
-
पहाटेच्या या शपथविधीवरुन बराच राजकीय गोंधळ निर्माण झालेला.
-
एकीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, काँग्रेसचे नेते महाविकास आघाडीची मोट बांधण्याचा प्रयत्न करत असतानाच आजच्याच दिवशी अजित पवारांच्या मदतीने फडणवीस दुसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले.
-
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पहाटे दिलेली शपथ आणि त्यानंतर राज्यातच नाही तर देशभरामध्ये या पहाटेच्या सरकारची प्रचंड चर्चा झाल्याने हा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणातील ऐतिहासिक दिवस ठरला.
-
“राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याबरोबर सरकार स्थापन करण्याचा निर्णय विचारपूर्वक घेण्यात आला होता. हा हवेत घेतलेला निर्णय नव्हता” असे राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी २०२० साली मे महिन्यात ‘साठीचा गझल.. महाराष्ट्राचा’ या ‘लोकसत्ता’तर्फे आयोजित वेबिनारमध्ये बोलताना म्हटलं होतं.
-
“सगळयांनी मिळून आम्हाला वाळीत टाकायचं ठरवलं आहे. बहुमताच उपयोग होणार नाही हे जेव्हा आमच्या लक्षात आलं, तेव्हा खेळात टिकून राहणं आवश्यक असतं. म्हणून अजित पवारांबरोबर सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला”, असं फडणवीस म्हणाले होते.
-
“अजित पवारांनी स्वत: सरकार स्थापन करण्याची तयारी दाखवली होती. त्यांनी आमदारांशी आमची चर्चा देखील घडवून आणली होती. त्यामुळे हा हवेत घेतलेला निर्णय नव्हता”, असं फडणवीस म्हणाले होते.
-
बहुमताचा प्राथमिक अंदाजही न घेता राज्यपालांनी फडणवीस यांना शपथविधीसाठी पाचारण केले. पर्यायी सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये आदल्या दिवशी रात्री सहमती झाली होती, असं यासंदर्भात शिवसेना आणि राष्ट्रवादीने यानंतर स्पष्ट केलं होतं.
-
विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा युतीला स्पष्ट बहुमत मिळालं होतं. त्यानंतर शिवसेनेनं मुख्यमंत्रीपदाची मागणी केली. यावर तडजोड करण्यास भाजपानं नकार दिला.
-
शिवसेनेनं भाजपाला दूर सारत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडे सत्तास्थापनेसाठी हात पुढे केला होता.
-
वेळेत दोन्ही (राष्ट्रवादी आणि काँग्रेस) पक्षांनी पाठिंबा न दिल्यानं शिवसेनेला सत्तास्थापनेचा दावा करता आला नाही.
-
अखेर या नाट्यमय घडामोडींनंतर महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे तर उपमुख्यमंत्री पदी अजित पवार विराजमान झाले.

Mahashivratri 2025 Wishes : “हर हर महादेव!”, प्रियजनांना पाठवा महाशिवरात्रीच्या खास मराठमोळ्या अन् हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर संदेश