-
तामिळनाडूमध्ये जलीकट्टू स्पर्धेमध्ये करोनाचे सर्व नियमांचं उल्लंघन केलं जात असल्याचं चित्र दिसत आहे.
-
दाक्षिणात्य राज्यांमध्ये शुक्रवारपासून जलीकट्टू या पारंपारिक खेळांच्या आयोजनाला सुरुवात झालीय. आज या खेळांचा दुसरा दिवस आहे.
-
शुक्रवारी (१४ जानेवारी २०२२ रोजी) अवनियापुरममध्ये बैलांचा समावेश असणाऱ्या या खेळादरम्यान झालेल्या धावपळीमध्ये एका १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. बैलाने शिंग मारल्याने गंभीर जखमी झालेल्या या १८ वर्षीय प्रेक्षकाचा मृत्यू झालाय.
-
पोंगलच्या दिवशी बैलांवर नियंत्रण मिळवण्याच्या जल्लीकट्टू या खेळाच्या आयोजनाला सुरुवात केले. पहिल्याच दिवशी या खेळादरम्यान ५९ जण जखमी झाले आहेत.
मागील वर्षीप्रमाणे या वर्षीही राज्य सरकारने खेळाच्या ठिकाणी बसण्यासाठी १५० जणांची आसन क्षमता आणि उपस्थित १५० जण अशी प्रेक्षक संख्या निश्चित केलीय. ही आसन क्षमता सामान्य संख्येच्या ५० टक्के इतकी आहे. मात्र या नियमांचं पालन केलं जात असल्याचं चित्र दिसत नाहीय. अनेक ठिकाणी शेकडोच्या संख्येने लोक हा खेळ पाहण्यासाठी उपस्थित असल्याचं चित्र दिसतंय. -
आज (१५ जानेवारी २०२२ रोजी) मदुराईमध्ये हा खेळ खेळवला जात असून तिथेही करोना नियमांचं उल्लंघन करण्यात येत असल्याचं दिसत आहे. तामिळनाडू सरकारने सप्टेंबर २०२१ मध्ये जलीकट्टू खेळाच्या आयोजनाला परवानगी दिली आहे. या परवानगीमुळे जलीकट्टू पुन्हा चर्चेत आला होता. आज करोना नियमांचं उल्लंघन होत असल्याने या खेळाची पुन्हा चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर हा खेळ नक्की काय आहे, तो कसा खेळला जातो आणि त्याचा इतिहास काय आहे, तामिळनाडू सरकारने करोना काळात त्याच्या आयोजनासाठी काय अटी घातल्यात यावर आपण या गॅलरीमधून नजर टाकणार आहोत.
-
करोनासंदर्भातील नियमांचे पालन करण्याच्या अटीवर जलीकट्टूला परवानगी देण्यात आलीय. एका सरकारी पत्रकानुसार यंदा जलीकट्टूमध्ये केवळ ३०० लोकांना भाग घेण्याची परवानगी देण्यात आली आहे.
-
सामान्यपणे या खेळामध्ये दरवर्षी हजारो तरुण सहभागी होतात. बैलावर नियंत्रण मिळवणारा हा खेळ पोंगल सणादरम्यान खेळण्यात येतो. या खेळाला दोन हजार वर्षांहून अधिक जुना इतिहास आहे.
-
सरकारने जारी केलेल्या पत्रकामध्ये जलीकट्टू आणि मंजुविरट्टू या दोन्ही खेळांमध्ये ३०० जणांना सहभागी होण्याची परवानगी देण्यात आलीय असं म्हटलं आहे. तसेच इरुथुवरत्तू या खेळात दीडशे लोकांनाच सहभागी होता येणार आहे, असंही या पत्रकात म्हटलं होतं.
-
हे खेळ खुल्या मैदानात खेळवले जावेत असे निर्देशही या आदेशात देण्यात आलेत. तसेच हे खेळ पाहण्यासाठी दरवर्षी होणाऱ्या गर्दी इतकी गर्दी कार्यक्रम स्थळी चालणार नाही असंही स्पष्ट करण्यात आलं असून केवळ ५० टक्के प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची अनुमती देण्यात आली आहे.
-
जलीकट्टू खेळ पाहण्यासाठी येणाऱ्या सर्वांच्या शरीराचे तापमान तपासले जाईल. तसेच मास्क असणाऱ्यांना प्रवेश दिला जाईल आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे लागेल अशा अटी घालण्यात आल्यात. तसेच खेळात सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंची करोना चाचणी बंधनकारक असणार आहे. चाचणीचा निकाल निगेटिव्ह असेल तरच खेळात सहभागी होता येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र यापैकी अनेक नियमांचं उल्लंघन केलं जात असल्याचं आजच्या फोटोंमध्ये दिसतंय.
-
मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या निधनानंतर एक महिन्याने २०१७ साली ८ जानेवारी ते २३ जानेवारी दरम्यान जलीकट्टूवर घातलेली बंदी उठवण्यासाठी मरीना सॅण्ड येथे विरोध प्रदर्शन करण्यात आलं होतं. तत्कालीन मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांनी नवी दिल्लीमध्ये जाऊन केंद्र सरकारकडून यासंदर्भात परवानगी घेतली होती.
-
जलीकट्टूसाठी झालेल्या या आंदोलनामध्ये चेन्नईमधील काही ठिकाणी जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना काही ठिकाणी हवेत गोळीबारही करावा लागला. या आंदोलनामध्ये एक दोन प्रसंगी हिंसाही घडली मात्र परवानगी मिळाल्यानंतर हे आंदोलन संपलं.
-
जलीकट्टू या खेळाचा अर्थ आहे वळूंना वश करणे. सल्ली कासू म्हणजे नाणी आणि कट्टू म्हणजे या नाण्यांचा संग्रह. एक पिशवी वळूच्या शिंगांना बांधली जाते. जेव्हा हे वळू पळतात तेव्हा त्यांच्या मागे युवक धावतात आणि त्यांच्या शिंगांना बांधलेली पिशवी काढून घेण्याचा प्रयत्न करतात.
-
जलीकट्टू या खेळामध्ये जेलीकट या विशिष्ट जातीच्या वळूंचा वापर केला जातो म्हणून देखील या खेळाला जलीकट्टू हे नाव पडले आहे. शिंगांना पैसे बांधण्याव्यतिरिक्त खेळाडूंना मोठे बक्षीस देखील दिले जाते.
-
कसा खेळला जातो जलीकट्टू हा खेळ? : जेव्हा या खेळाला सुरुवात होते तेव्हा वळूंच्या शिंगांना पैसे बांधून त्यांना भडकवले जाते. त्यांना पळण्यास प्रवृत्त केले जाते.
-
बऱ्याचदा गर्दीमुळे हे वळू गांगरुन जातात आणि ट्रॅकवर पळण्याऐवजी ते गर्दीमध्ये घुसू पाहतात. काही वेळा या वळूंना मद्य देखील दिले जाते. त्यांनी जोरात पळावे म्हणून त्यांची शेपटीही पिरगाळली जाते.
-
काय आहे जलीकट्टू खेळाला असलेली वादाची पार्श्वभूमी? : जलीकट्टू हा खेळ देशातील सर्वात धोकादायक खेळांपैकी एक मानला जातो. या खेळामुळे आतापर्यंत कित्येक लोक मृत्यूमुखी पडले आहे तर अनेकांना अपंगत्वदेखील आले आहे.
-
२०१० ते २०१४ दरम्यान जलीकट्टू या खेळामुळे १,१०० लोक गंभीरिरत्या जखमी झाले तर १७ जणांना आपला जीव गमवावा लागला. गेल्या २० वर्षांमध्ये २०० पेक्षा अधिक लोक बळी पडले आहेत.
-
जलीकट्टू या खेळात ज्या बैलांचा वापर होतो त्यांच्यावर अत्याचार केले जातात अशी याचिका प्राण्यांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या पेटा या प्राणीमित्र संघटनेनं केली होती.
-
कित्येक वर्षे पेटाने जलीकट्टूविरोधात आंदोलन केले आहे. २०१४ मध्ये या खेळामध्ये बैलांचा वापर थांबविण्यात यावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.
-
मात्र नंतर जलीकट्टूवर बंदी घालण्यावरुन बराच वाद झाल्यानंतर ही बंदी मागे घेण्यात आली आणि हा खेळ पुन्हा तेवढ्यात उत्साहाने आयोजित करण्यात येऊ लागला.
-
किती वर्षे जुनी आहे परंपरा? : जलीकट्टू या खेळाची परंपरा किमान २००० वर्षे जुनी आहे असे म्हटले जाते. प्राचीन काळी स्वयंवरासाठी देखील या खेळाचे आयोजन होत असे.
-
जलीकट्टू या खेळात भाग घेणारा जो कुणी युवक बैलावर नियंत्रण मिळवेल त्याच्या गळ्यात माळ टाकली जात असे.
-
मदुराई, तिरुचिरापल्ली, थेनी, पुदुक्कोटाई आणि दिंडीगुल या तामिळनाडूमधील जिल्ह्यांमध्ये हा खेळ प्रामुख्याने खेळला जात असे. न्यायालयाने बंदी घालण्यापूर्वी मदुराईमध्ये मोठ्या प्रमाणावर हा खेळ खेळला जात असे. (सर्व फोटो: एएनआय पीटीआय, एपी आणि रॉयटर्सवरुन साभार)

Thirsty Cheetahs Viral Video : तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं! Video व्हायरल होताच वन विभागाचा चालक निलंबित