-
दिल्लीतील राष्ट्रपती भवनात सोमवारी पद्म पुरस्काराच्या मानकऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्कार मिळणाऱ्यांमध्ये वाराणसीचे १२६ वर्षीय स्वामी शिवानंददेखील होते. योगा क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना पद्म पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.
-
दरम्यान स्वामी शिवानंद पुरस्कार घेण्यासाठी पोहोचले असता आपल्या साधेपणाने त्यांनी सर्वांचं मन जिंकलं. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच राष्ट्रपतींसमोर नतमस्तक होत सर्वांना भारावून टाकलं.
-
दरम्यान १२६ वय असणाऱ्या स्वामी शिवानंद यांच्याबद्दल लोकांमध्ये प्रचंड कुतुहूल आहे. इतकी वर्ष ते निरोगी आयुष्य कसे काय जगत आहे याबद्दल लोकांमध्ये उत्सुकता असून जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. एका जुन्या मुलाखतीत त्यांनी याबद्दल खुलासा केला होता.
-
स्वामी शिवानंद यांनी सांगितलं होतं की, आपण सेक्सपासून दूर राहतो तसंच मसाल्यांचं सेवन करत नाही. याशिवाय रोज योगा करणं आपल्या आयुष्याचा भाग आहे.
-
शिवानंद यांच्या पासपोर्टनुसार, त्यांचा जन्म ८ ऑगस्ट १८९६ मध्ये झाला. १९ वं शतक सुरु होण्याआधी जन्म झालेल्या स्वामी शिवानंद यांना २१ व्या शतकात २०२२ मध्ये हा सन्मान मिळाला आहे.
-
कोलकातामध्ये एएफपीशी बोलताना स्वामी शिवानंद यांनी सांगितलं होतं की, “मी अत्यंत साधं आणि शिस्तबद्ध जीवन जगतो. मी जेवणही साधंच करतो ज्यामध्ये फक्त उकडलेलं अन्न असतं. यामध्ये कोणतंही तेल किंवा मसाला नसतो. डाळ, भात आणि हिरवी मिरची मी खासकरुन खातो”.
-
५ फूट २ इंच उंची असणारे स्वामी शिवानंद एका चटईवर झोपतात. इतकंच नाही तर आपण दूध आणि फळंही खात नाही, कारण ते फॅन्सी फूड आहे असं ते सांगतात.
-
मी लहानपणी अनेकदा भुकेल्या पोटी झोपले आहेत. इतकं वय जगल्यासंबंधी विचारलं असता ते म्हणतात की आपण कधीही प्रचार करत नाही, पण माझ्या अनुयायांनी मी असा दावा केला पाहिजे वाटतं.
-
स्वामी शिवानंद यांचा जन्म ८ ऑगस्ट १८९६ रोजी बंगालच्या श्रीहट्टी जिल्ह्यात झाला. त्यांच्या आई-वडिलांचे उपासमारीने निधन झाले होते, तेव्हापासून शिवानंद यांनी अर्ध्या पोटी जेवण्याचे व्रत घेतले, ते आजपर्यंत पाळत आहेत. काही काळानंतर त्यांनी बंगालमधून काशी गाठली आणि येथे गुरु ओंकारानंद यांच्याकडून शिक्षण घेतले. १९२५ मध्ये, ओंकारानंद यांच्या आदेशानुसार, ते जगाच्या दौऱ्यावर गेले. त्यांनी सुमारे ३४ वर्षे देश-विदेशात प्रवास केला.
-
आश्रमात दीक्षा घेतल्यानंतर १९७७ मध्ये ते वृंदावनला गेले. दोन वर्षे वृंदावनात राहिल्यानंतर ते १९७९ मध्ये वाराणसीला आले. तेव्हापासून ते इथेच राहत आहेत.
-
स्वामी शिवानंद अनेक देश फिरले आहेत. विमानतळावरही त्यांना एवढ्या वयात कोणाचाही आधार न घेता फिरताना पाहून लोक आश्चर्यचकित होतात.
-
वाराणसीमध्ये काही वर्षे राहिल्यानंतर त्यांनी लोकांना योग आणि निरोगी दिनचर्यासाठी प्रेरित करण्यास सुरुवात केली.
-
काशीबद्दल ते म्हणतात की ती पवित्र भूमी आहे तशी तपोभूमी आहे. येथे भगवान शंकर स्वतः वास करतात, त्यामुळे त्यांना येथे राहण्यास आवडते. स्वामी शिवानंद यांना योग आणि धर्माचे खूप सखोल ज्ञान आहे.
-
स्वामी शिवानंद म्हणतात की, “आधी लोक कमी गोष्टींमध्ये आनंदी असायचे. पण आज लोक दुखी, आजारी आहेत आणि प्रामाणिकताही कमी झाली आहे. यामुळे मला फार दु:ख होतं. लोकांनी आनंदी, निरोगी आणि शांततापूर्ण आयुष्य जगावं अशी माझी इच्छा आहे”.
-
स्वामी शिवानंद यांना पुरस्कार मिळाल्यानंतर महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा यांनीदेखील कौतुक केलं असून हीच योगाची ताकद असल्याचं म्हटलं आहे. ट्वीट करत ते म्हणाले आहेत की, “हीच योगाची ताकद आहे. १२५ वर्षांच्या समर्पणाचे आयुष्य! स्वामी शिवानंद यांची वागणूक आणि प्रतिष्ठा नम्र आणि प्रेरणादायी आहे. योगाचा उगम झालेल्या देशाचे नागरिक असल्याचा अभिमान आहे”.
![sharad ponkshe review chhaava vicky kaushal laxman utekar](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/sharad-ponkshe-review-chhaava-vicky-kaushal-laxman-utekar.jpg?w=300&h=200&crop=1)
Chhaava: शरद पोंक्षेंनी ‘छावा’ चित्रपट पाहिल्यावर शेअर केला व्हिडीओ; म्हणाले, “मी हात जोडून विनंती करतो…”