-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज ठाण्यामध्ये उत्तरसभा आहे. गुढीपाडव्याच्या सभेमध्ये घेतलेल्या हिंदुत्ववादी भूमिकेबरोबरच अनेक नेत्यांच्या टीकेला ते या सभेतून उत्तर देणार आहेत.
-
गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क मैदानातील मनसेच्या मेळाव्यात आक्रमक हिंदूत्वाची भूमिका मांडतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरही यथेच्छ टीका केली.
-
राज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप करत, “शरद पवारांनी १९९९ मध्ये राष्ट्रवादीची स्थापना केल्यापासूनच राज्यात जातीपातीचे राजकारण सुरू झालं,” असं म्हटलं.
-
राज यांनी केलेल्या या टीकेवरुन शरद पवारांबरोबरच त्यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे तसेच पुतण्या आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राज ठाकरेंवर निशाणा साधला.
-
वडीलांवरील आरोपांनंतर सुप्रिया सुळे यांनी तर थेट २१०० हजार कोटींच्या घोटाळ्याची राज यांना आठवण करुन दिली होती.
-
तर अजित पवार यांनी शरद पवारांवरील टीकेला उत्तर देण्याबरोबरच मागील काही दिवसांमध्ये जाहीर सभांमधूनही राज यांच्या भोंग्यांविरोधी भूमिकेवरुन टीका केलीय.
-
शरद पवार यांच्यासहीत त्यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आलेल्या टीकेचा आज राज ठाकरे ठाण्यातील सभेत समाचार घेतील असं म्हटलं जातंय. पण पाडव्याच्या सभेपासून आतापर्यंत नेमकं काय काय घडलंय पवार आणि राज ठाकरेंदरम्यानच्या आरोप प्रत्यारोपांमध्ये ते या गॅलरीमधून पाहूयात…
-
भ्रष्टाचाराच्या आरोपावरून छगन भुजबळ तुरुंगात जाऊन आले तरी त्यांना मंत्री करण्यात आले, असं राष्ट्रवादीच्या भूमिकेवर निशाणा साधताना राज यांनी म्हटलं.
-
दाऊदशी संबंध असल्याच्या आरोपांवरून दुसरे मंत्री नवाब मलिक यांना अटक झाली. कसले हे राष्ट्रवादीचे राजकारण, असा सवालही राज यांनी केला.
-
शऱद पवार हे जातीपातीचं राजकारण करत असल्याचा आरोप करताना या असल्या राजकारणामुळे राज्याचं नुकसान होत असल्याचा दावा राज यांनी केला.
-
जातीपातीच्या राजकारणामुळे महाराष्ट्राचे नुकसान होत असून त्यातून त्याला बाहेर काढण्याची वेळ आली आहे, असं राज पवारांवर निशाणा साधताना म्हणाले.
-
अन्य राज्ये प्रगती करत असताना महाराष्ट्र मात्र जातीच्या राजकारणात खितपत पडला आहे, असा टोलाही त्यांनी लगावलाय.
-
या टीकेला उत्तर देताना दुसऱ्या दिवशी म्हणजेच ३ एप्रिल रोजी शरद पवारांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला.
-
“एक गोष्ट चांगली झाली, हे कुठे भूमिगत झाले होते, याचा काही कोणाला अंदाज येत नव्हता. त्यामुळे ठाकरे महाराष्ट्रात सार्वजनिक यायला उत्सुक आहे हे कालच्या सभेतून दिसलं,” असं शरद पवार राज यांच्या टीकेबद्दल बोलताना म्हणाले.
-
“राज ठाकरेंचं हेच वैशिष्ट आहे की, दोन-चार महिने कुठेही भूमिगत होतात आणि एखादं व्याख्यान देऊन पुन्हा पुढचे तीन-चार महिने काय करतात मला माहीत नाही,” असंही पवार राज यांच्याबद्दल म्हणाले.
-
राज ठाकरेंनी केलेल्या जातीयवादाच्या टीकेवरुनही शरद पवारांनी अगदी मोजक्या शब्दात यावेळी उत्तर दिलं.
-
“ते जातीयवादाबाबत जे बोलले त्याबद्दल सांगायचं झालं तर, ते काही म्हणू शकतात त्यांच्या तोंडावर कुणी मर्यादा आणू शकत नाही,” असं पवार यांनी राज यांच्याकडून झालेल्या टीकेबद्दल मत व्यक्त करताना म्हटलं.
-
“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्यांनी मागील पाच -सात वर्षांचा त्यांनी उल्लेख केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व राज्यात कोण कोण करत होतं? महाराष्ट्राची विधानपरिषदेत पहिल्यांदा छगन भुजबळ नेते होते. त्यानंतर मधुकरराव पिचड हे नेते होते,” असंही पवार म्हणाले.
-
“भुजबळ कोणत्या समाजाचे आहेत हे सगळ्यांना माहीत आहे. अशी सर्वांची जर यादी बघितली, तर यावेळी पहिल्यांदा अजित पवारांची निवड झाली आणि त्याचं कारण, सभासदांनी असं सांगितलं की त्यांना विधीमंडळात येऊन ३० वर्षे झाली आणि एवढा काळ एखादी व्यक्ती त्या ठिकाणी काम करत असताना, त्यांना संधी द्यावी. त्यातून ही निवड झाली. सर्व जाती-जमातीच्या लोकांना घेऊन पुढे जाणे ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे आणि यापुढेही राहील, ” असंही शरद पवारांनी स्पष्टपणे सांगितलं.
-
“उत्तर प्रदेशचं कौतुक त्यांनी केलं, तर मघाशीच मी सांगितलं की ते काही बोलू शकतात. आता उत्तप्रदेशात कौतुकासारखं त्यांना काय दिसलं हे मला माहिती नाही,” असा टोला पवारांनी राज यांना लगावला.
-
“उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूरला शेतकऱ्यांची हत्या झाली, उत्तर प्रदेशच्या सीमेवर जवळपास वर्षभर शेतकरी बसले होते, त्या सगळ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करायला. कोणी पुढे आलं नाही. कितीतरी गोष्टी अशा आहेत की ज्या उत्तर प्रदेशात घडलेल्या आहेत, योगींच्या राजवटीच्या काळात आणि अशा पद्धतीची राजवट उत्तम आहे असं जर राज ठाकरे म्हणत असतील, तर मला काही त्यावर भाष्य करायचं नाही. पण महाराष्ट्रात असं कधी उद्धव ठाकरेंचं सरकार होऊ देणार नाही.” अशा शब्दांमध्ये राज ठाकरेंवर शरद पवारांनी निशाणा साधला.
-
“राज ठाकरेंनी मोदींबाबत काय काय भूमिका मांडलेली आहे, हे संबंध महाराष्ट्राने पाहीलं आहे. आता त्यांच्यात काहीतरी बदल झाल्याचं दिसतोय,” असंही पवार म्हणाले.
-
“नुकतच मी हे देखील वाचलं आहे की ते अयोध्याला जाताय, आणखी काय काय करत आहेत. तर असा त्यांच्या बदल होताना दिसतोय. त्यामुळे त्यांची मोदींबाबतची भूमिका सध्या, आज, उद्या काय असेल याबद्दल मी काही सांगू शकत नाही,” असं पवार राज यांच्याबद्दल बोलताना म्हणाले.
-
“राज यांच्या भूमिकेत सातत्य नसतं. हे अनेकदा आपण पाहिलेलं आहे.” असंही म्हणत शरद पवार यांनी राज ठाकरेंना टोला लगावला.
-
राज ठाकरेंच्या टीकेला शरद पवार यांनी आपण ही टीका फारशी गांभीर्याने घेत नसल्याच्या शैलीत उत्तर दिली.
-
वडिलांवर राज ठाकरेंनी केलेल्या टीकेवरुन सुप्रिया सुळे यांनी थेट राज यांना २१०० कोटींच्या ‘कोहिनूर स्क्वेअर’ प्रकरणात अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) पाठवलेल्या नोटीसची आठवण करुन देणारं वक्तव्य केलंय.
-
“लाव रे तो व्हिडीओ म्हणणारे एका नोटीशीमुळे एवढे बदलतील याचं मला कौतुक आणि आश्चर्य वाटतं,” असा टोला सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना लगावलाय.
-
तर, “दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, त्यांनी हा आरोप याआधीही केलाय. अशा गोष्टींमध्ये इनकनस्टीस्टंटली कन्सीस्टंट आहेत,” असं खोचक विधानही सुप्रिया यांनी केलंय.
-
“शरद पवारांचं नाव घेतल्याशिवाय मोठी हेडलाइन होत नाही हे ५५ वर्ष महाराष्ट्राने पाहिलंय. त्यामुळे त्यांच नाव घेतलं की कोणाचीही हेडलाइन होते,” असंही सुप्रिया सुळे म्हणाल्यात.
-
“याचा उपयोग जर (राज ठाकरेंच्या) पक्षाला होणार असेल तर मला त्याचा आनंद आहे,” असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
-
राज यांनी केलेल्या भाषणावरुन अजित पवार यांनीही त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
-
“टीका आणि नकला करण्याशिवाय राज ठाकरे यांना दुसरे काही जमत नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत केंद्र सरकारविरोधात रान पेटवणारे आता त्यांचीच री ओढून सरड्यासारखे रंग बदलत आहेत,” असं अजित पवार यांनी राज यांच्यावर निशाणा साधताना म्हटलंय.
-
“राष्ट्रवादीला आणि शरद पवारांनी जातीयवादी म्हणणारे राज ठाकरे स्वत: जास्त जातीयवादी आहेत,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना रविवारी प्रत्युत्तर दिले.
-
“शरद पवारांवर टीका म्हणजे सूर्यावर थुंकल्यासारखे आहे,” अशी टिपणीही अजित पवारांनी राज यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना केली.
-
गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेचा अजित पवार यांनी इंदापूर येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना खास शैलीत समाचार घेतला.
-
“एकेकाळी १३ आमदारांचा पक्ष असलेला मनसेचा आता एकच आमदार आहे. बाकी नेते पक्ष सोडून का गेले? आमदारांची संख्या कमी का झाली?,” असे प्रश्नही अजित पवार यांनी राज ठाकरेंवर टीका करताना विचारले.
-
“नुसती भाषणे करून जनतेचे प्रश्न सुटत नाहीत किंवा रोजीरोटीचा प्रश्न सुटत नाही. राज ठाकरे पलटी मारणारा माणूस आहे,” असा टोमणाही अजित पवार यांनी मारला.
-
“शरद पवारांचे राजकारण बघितले तर कुठेही जातीयवादी राजकारण दिसणार नाही. त्यांनी सर्वधर्मसमभावाचे राजकारण केले,” असंही अजित पवार यांनी सांगितलं.
-
“एका कार्यक्रमात मुलाखत घेतली, तेव्हा पवारसाहेब जातीयवादी नव्हते. पण, आता हा पठ्ठ्या म्हणतो, जातीचं राजकारण केलं, काय बोलावे आता,” अशा शब्दांत अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्या टीकेवर टिपणी केली.
-
“सध्याचं राज्यातलं वातावरण गढूळ करण्याचं काम सुरू आहे. आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. वर्षानुवर्ष आपण गुण्या गोविंदाने नांदतोय. रामनवमी, हनुमान जयंती, आंबेडकर जयंती, रमजान, गुढीपाडवा असे सगळे सण एकमेकांना शुभेच्छा देऊन आपण साजरे करतोय. पण काय कारण आहे हो? भोंगे बंद करा, अमकं करा.. मग इतक्या आधीपासून तुम्ही काय केलं? तेव्हा कळलं नाही का? आज राज्य करोनाच्या संकटानंतर रुळावर आणण्याचा प्रयत्न आम्ही करतोय”, असं म्हणत अजित पवारांनी राज यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीकाही केली.
-
“जातीय सलोखा ठेवला आहे, जातींमध्ये, धर्मात तेढ निर्माण होऊ देत नाही. पण काही पक्षाचे नेते इथं असं करा, इथं हा भोंगा लावा, तिथं हा भोंगा लावा सांगत आहेत”, असं देखील अजित पवारांनी नमूद केलं होतं.
-
पवार आणि त्यांच्या कुटुंबियांकडून होत असणाऱ्या टीकेवरुन मनसेच्या नेत्यांनी मागील काही दिवसांमध्ये वारंवार राष्ट्रवादीसहीत पवारांवरही निशाणा साधला पण राज ठाकरे याबद्दल सभेनंतर काहीही बोलेले नाहीत.
-
आजच्या ठाण्यामधील सभेतून राज ठाकरे पवार कुटुंबातील सदस्यांकडून झालेल्या आरोपांना काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. (सर्व फोटो फाइल फोटो आहेत)

महामार्ग वाहतूक कोंडीमुक्तीच्या दिशेने पहिले पाऊल; संयुक्त कारवाईमध्ये महामार्गालगतची २०१ अतिक्रमणे हटविली