-
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ जाहीर झालेला पहिला ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला.
-
माटुंग्यातील षण्मुखानंद सभागृहामध्ये आयोजित केलेल्या ८० व्या मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृतिदिन सोहळय़ात या पुरस्काराने पंतप्रधान मोदी यांना सन्मानित करण्यात आले.
-
उषा मंगेशकर, मीना खडीकर- मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या हस्ते मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन पंतप्रधान मोदी यांना पहिल्या ‘लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.
-
या सोहळय़ास महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मंगेशकर कुटुंबीय, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मंत्री सुभाष देसाई, विनोद तावडे असे राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
-
विश्वकल्याण साधायचे असेल तर मानवी मूल्ये आणि आध्यात्मिक चेतना गरजेची आहे. मूल्याधिष्ठित विचारसरणी लाभलेला आपला देश आज विविध क्षेत्रांत जगासाठी मार्गदर्शक ठरत आहे, असं पंतप्रधान मोदी यावेळेस म्हणाले.
-
याच चिरंतन मूल्यांचा वारसा असलेले भारतीय संगीत विश्वशांतीचे माध्यम बनू शकेल, असा विश्वास मोदींनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
-
या पुरस्काराच्या निमित्ताने उपस्थितांशी संवाद साधताना, सर्वाना बरोबर घेऊन, सगळय़ांच्या विश्वासाने आणि प्रयत्नांनी विकास साधणे हे देशाच्या विकासाचे सूत्र असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले.
-
मात्र विकासाकडे पाहण्याची देशाची दृष्टी ही इतरांपेक्षा वेगळी असल्याचे सांगत केवळ भौतिक सामर्थ्यांने विकास साधता येणार नाही, तर त्यासाठी मानवी मूल्यांची जपणूक गरजेची आहे, असे मोदींनी नमूद केले.मात्र विकासाकडे पाहण्याची देशाची दृष्टी ही इतरांपेक्षा वेगळी असल्याचे सांगत केवळ भौतिक सामर्थ्यांने विकास साधता येणार नाही, तर त्यासाठी मानवी मूल्यांची जपणूक गरजेची आहे, असे मोदींनी नमूद केले.
-
त्या दिवसापासून दीदींची मोठया बहिणीसारखी माया आणि मंगेशकर कुटुंबीयांचा स्नेह लाभला. दीदींच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार हे त्या प्रेमाचे प्रतीक आहे, अशी भावना व्यक्त करत मोदी यांनी हा पुरस्कार देशवासीयांना समर्पित केला.
-
लतादीदींच्या आठवणींना उजाळा देताना ग्रामोफोन, कॅसेट, डीव्हीडी, पेनड्राइव्ह ते आजचे ऑनलाइन संगीत असा संगीत क्षेत्राचा अफाट प्रवास ज्या लतादीदी यांच्या साक्षीने झाला त्यांना भारतरत्न देऊन सन्मान म्हणजे देशासाठी गौरवशाली क्षण होता, असे मोदी म्हणाले.
-
अद्वैत काय असते हे दीदींच्या गाण्यातून समजते. ईश्वर या शब्दात स्वर समाविष्ट आहे. जेथे स्वर आहे तिथे पूर्णत्व आहे आणि अशा स्वराचा उगम जर लतादीदींच्या सुरात असेल तर आपण पावित्र्य अनुभवल्याशिवाय राहू शकत नाही, अशी भावना मोदींनी व्यक्त केली. यावेळी चाहत्यांनी षण्मुखानंद सभागृहामध्ये मोठी गर्दी केली होती.
-
दीदींनी आपल्या गाण्यातून देशभक्तीची चेतना लोकांमध्ये जागवली. त्यांनी ‘शिवकल्याण राजा’सारख्या अल्बममधील गाण्यांमधून छत्रपती शिवाजी महाराज जगभर पोहोचवले, असंही मोदी म्हणाले.
-
रामचरित मानस, बापूंची भजने, अभंग गाणाऱ्या दीदींनी गाण्यांच्या माध्यमातून भारतीयत्व जगभर पोहोचवले. त्याचबरोबर आपल्या सुरातून पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत आणि दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत संपूर्ण देशाला त्यांनी एका सूत्रात बांधले, अशा शब्दांमध्ये मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
-
देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीपासून ते स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवापर्यंतचा त्यांचा प्रवास म्हणूनच अलौकिक असल्याचेही मोदी यांनी सांगितले.
-
दरवर्षी वडिलांच्या स्मृतिदिनी एकत्र येत होतो, मात्र एक दिवस दीदीसाठी या व्यासपीठावर यावे लागेल असे वाटले नव्हते, हे सांगताना आशा भोसले यांचा कंठ दाटून आला होता.
-
गळ्यात सरस्वती, बुद्धीने चाणक्य अशा दीदीला कुठे काय बोलायचे हे नेमके माहीत होते. तिने पहिल्यांदा रेकॉर्डवर गायकांची नावे द्यायला भाग पाडले, असं मत आशा भोसलेंनी व्यक्त केलं.
-
गायकांना स्वामित्वहक्क मानधन मिळावे यासाठी ती लढली, परदेशात महत्त्वाच्या सभागृहांची दारे भारतीय गायकांसाठी दीदीनी खुली केली, असंही आशा भोसले यांनी म्हटलं.
-
ती भली होती, पण भोळी नव्हती. तिच्यासारखे कोणी झाले नाही आणि यापुढेही होणार नाही, अशा शब्दांत आशाताईंनी दीदींच्या आठवणींना उजाळा दिला़
-
पं. हृदयनाथ मंगेशकर प्रकृतिअस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल आहेत. त्यामुळे ते पुरस्कार सोहळय़ाला उपस्थित राहू शकले नाहीत, अशी माहिती त्यांचे पुत्र आदिनाथ मंगेशकर यांनी दिली.
-
या सोहळय़ात संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी गायक, संगीतकार राहुल देशपांडे यांना मास्टर दिनानाथ मंगेशकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
-
तर सिनेमातील भरीव योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख आणि अभिनेते जॅकी श्रॉफ यांना मास्टर दिनानाथ विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
-
उत्कृष्ट सामाजिक सेवेचा मास्टर दिनानाथ आनंदमयी पुरस्कार नूतन मुंबई टिफिन बॉक्स चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष उल्हास शांताराम मुके यांनी स्वीकारला, तर सर्वोत्कृष्ट नाटय़निर्मितीसाठीचा पुरस्कार ‘संध्या छाया’ या नाटकासाठी दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी स्वीकारला. या सोहळय़ाचे सूत्रसंचालन हरीश भिमानी यांनी केले.
-
मास्टर दिनानाथ स्मृती प्रतिष्ठान, मंगेशकर कुटुंबीय आणि हृदयेश आर्ट्सच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या पुरस्कार सोहळय़ाची सांगता ‘स्वरलतांजली’ या संगीतमय कार्यक्रमाने करण्यात आली.
-
या समारंभास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुपस्थित राहिले. परंतु पंतप्रधानांचे विमानतळावर स्वागत करण्याकरिता राजशिष्टाचारमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.
-
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक भाजप नेते पुरस्कार वितरण समारंभास उपस्थित होते.
-
हा कार्यक्रम खासगी होता. त्यामुळे आमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्र्यांच्या नावाचा उल्लेख नव्हता. (सर्व फोटो सोशल मीडियावरुन आणि इंडियन एक्सप्रेसवरुन साभार)
भरलग्नात नवरा-नवरी बेभान! लग्नसोहळ्यात नातेवाईकांसमोर नवरीने केलं असं काही की…, VIDEO पाहून बसेल धक्का