-
देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची ओळख कणखर स्वाभावाचा आणि खंबीर भूमिका मांडणारा नेता अशी आहे.
-
याच अमित शाहांच्या आतापर्यंतच्या राजकीय प्रवासासंदर्भात भाष्य करणाऱ्या ‘अमित शाह आणि भाजपाची वाटचाल’ या पुस्तकाचं प्रकाशन मंगळवारी (२६ एप्रिल २०२२ रोजी) मुंबईमध्ये झाले.
-
मराठीमध्ये भाषांतर करण्यात आलेल्या पुस्तकाचं प्रकाशन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे नेते प्रवीण दरेकर, अभिनेत्री पल्लवी जोशी यांच्या उपस्थितीमध्ये झालं.
-
या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सर्वच मान्यवरांनी अमित शाहांबद्दलचे आपले अनुभव आणि राजकारणापलीकडचे अमित शाह या विषयावर भाष्य केलं.
-
याच कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाहांबद्दल जवळजवळ २० मिनिटांहून अधिक वेळ भाषण दिलं. या भाषणात त्यांनी अनेक मुद्दे मांडले.
-
त्यापैकी एका मुद्द्यात त्यांनी अमित शाहांच्या घरी ते आसनस्थ होतात त्या मागील भिंतीवर लावलेल्या दोन फोटोंची गोष्टही सांगितली. हे फोटो अमित शाह यांनी का लावलेत यामागील कारण म्हणा किंवा गुपीत म्हणा ते फडणवीसांनी आपल्या भाषणादरम्यान सांगितलं.
-
अमित शाह यांच्या राजकीय प्रवासाबद्दल भाष्य करताना अगदी ते १३ वर्षाचे असताना संघाच्या संपर्कात आल्यापासून ते कलम ३७० हटवण्यापर्यंतचा निर्णय घेणारे गृहमंत्री अशा प्रदीर्घ प्रवासावर फडणवीस यांनी भाष्य केलं.
-
यावेळी त्यांनी राजकीय प्रवासामध्ये अमित शाहांच्या मार्गात आलेले अडथळे आणि त्यावर त्यांनी कशापद्धतीने मात केली यावरही भाष्य केल्याचं पहायला मिळालं.
-
अमित शाहा महामंत्री झाले तेव्हा… >> यावेळी बोलताना फडणवीस यांनी अमित शाहांकडे उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवण्यात आल्यानंतर काय घडलं हे सांगताना त्यांची चाणक्यशी तुलना केली.
-
“अमित शाहांकडे जेव्हा उत्तर प्रदेशच्या महामंत्री पदाची जबाबदारी आली तेव्हा राज्यामध्ये भाजपाचं संघटन फार कमजोर होतं. तिथल्या नेतृत्वाने काय जे काय कारण असेल त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्या निवडणुका न लढवल्याने अतिशय खिळखिळी अशी अवस्था होती,” असं फडणवीस म्हणाले.
-
अमित शाहांना चाणक्य का म्हणतात? >> पुढे बोलताना फडणवीस यांनी, “अमित शाहांना चाणक्य का म्हटलं जातं? तर चाणक्य यांच्यामध्ये सर्वात महत्वाचा गुण काही होता तर ते कोणामध्येही ऊर्जा प्रसारित करु शकत होते, कोणातही ऊर्जा भरु शकत होते, ते टीम बिल्ड करु शकत होते, ते सैन्य उभं करु शकत होते आणि त्या सैन्याच्या भरोश्यावर कुठल्याही व्यक्तीला पराजित करु शकत होते,” असं म्हटलं.
-
“अमित शाह तिथे (उत्तर प्रदेशात) जाऊन राहिले. एक एका जिल्ह्यात गेले. प्रत्येक जिल्ह्याची परिस्थिती समजून घेतली. रात्ररात्र त्या ठिकाणी रहायचे. मग त्यांनी पहिली घोषणा केली की भाजपा ग्रामपंचायतपासून ते जिल्हा परिषदेपर्यंत सर्व निवडणुका लढवणार,” असं फडणवीस म्हणाले.
-
घोषणेचा परिणाम काय झाला? > “या एका घोषणेने खालील स्तरातील कार्यकर्ता उर्जित अवस्थेत आला. मग त्या कार्यकर्त्याच्या मदतीने सोशल इंजिनियरिंग करुन अमित शाहांनी एक असं संघटन त्या ठिकाणी तयार केलं की त्यांनी ८० पैकी ७३ जागा २०१४ साली मिळवल्या,” असं फडणवीस यांनी सांगितलं.
-
अमित शाहांच्या घरी ते दोन फोटो का? >> याच भाषणादरम्यान त्यांनी अमित शाहांना प्रेरणा देणाऱ्या दोन व्यक्तींबद्दल सांगितलं.
-
फडणवीस यांनी चाणक्य आणि अमित शाहा यांची तुलना केल्यानंतर याच चाणक्य यांचा फोटो आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा फोटो का लावलाय याबद्दल भाष्य केलं.
-
“अमित शाहांच्या घरी गेलं तर त्यांच्या पाठीमागे (ते बसतात त्या खुर्चीच्या मागील भिंतीवर) दोन फोटो लागलेलं आहेत. एक फोटो आहे चाणक्य यांचा तर दुसरा सावरकरांचा (स्वातंत्र्यवीर सावरकर)”, असं फडणवीस यांनी भाषणामध्ये म्हटलं.
-
पुढे बोलताना फडणवीस यांनी अमित शाहांनी हे फोटो का लावलेत यामागील कारण सांगताना, “ही दोन व्यक्तीमत्वं त्यांना प्रचंड प्रेरणा देतात,” असं म्हटलं. (सर्व फोटो फेसबुक, ट्विटर, रॉयटर्स आणि पीटीआयवरुन साभार)
