-
अफगाणिस्तानमध्ये गतवर्षी जुलैमध्ये कर्तव्य बजावताना ठार झालेले भारतीय वृत्तछायाचित्रकार दानिश सिद्दिकी यांना फोटोग्राफी क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. (सर्व फोटो रॉयटर्स, इंडियन एक्सप्रेस आणि पीटीआयवरुन साभार)
-
फिचर फोटोग्राफी विभागामध्ये दानिश यांना यंदाचा ‘पुलित्झर पुरस्कार २०२२’ प्रदान केला जाणार आहे.
-
दानिश यांच्यासहीत चार भारतीयांना हा बहुमान यंदा हा बहुमान देण्यात येणार आहे. ‘पुलित्झर पुरस्कार’ हा फोटोग्राफीमधील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो.
-
दानिश यांचे रॉयटर्स वृत्तसंस्थेमधील सहकारी अदनान अबिदी, साना इशरद माटो आणि अमित दवे यांनाही या पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे. यासंदर्भातील माहिती सोमवारी देण्यात आली.
-
“भारतामधील करोना मृतांची दाहकता दाखवणारे फोटो हे भावनिक जवळीक आणि विध्वंस दाखवणारे असून फोटो पाहणाऱ्याला त्या जागेचे महत्व अखोरेखित करुन सांगणारे आहेत,” असं ‘पुलित्झर’च्या वेबसाईटवर या दानिश यांनी काढलेल्या फोटोबद्दल म्हटलं आहे.
-
२२ एप्रिल २०२१ रोजी नवी दिल्लीमधील एका स्मशानभूमीमध्ये एकाच वेळी अनेक करोना मृतांवर अंत्यसंस्कार केले जात असल्याचा फोटो दानिश यांनी काढला होता. या फोटोमध्ये स्मशानभूमीच्या भिंतींच्या सीमा या लोकवस्तीला लागून असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे.
-
करोनाची दाहकता दर्शवणारा फोटो म्हणून हा फोटो तेव्हा चांगलाच चर्चेत आलेला. रॉयटर्स वृत्तसंस्थेसाठी त्यांनी हा फोटो काढलेला. हा फोटो अंगावर काटा आणणारा आहे असं अनेकांनी हा फोटो पाहता क्षणी म्हटलं होतं.
-
मात्र या स्मशानभूमीच्या फोटो व्यतिरिक्तही अनेक फोटो दानिश यांनी काढले आहेत. याच फोटोंवर या पुरस्काराच्या निमित्ताने या फोटोगॅलरीमधून टाकलेली नजर…
-
१५ एप्रिल २०२१ रोजी दिल्लीत सर्वात मोठ्या करोना रुग्णालयामध्ये दानिश यांनी काढलेला फोटो.
-
आपल्या वडिलांच्या निधनानंतर आईला आधार देण्याचा प्रयत्न करणारे भाऊ-बहीण आपल्या कॅमेरात दानिश यांनी दिल्लीमधील एका स्मशानभूमीबाहेर टीपले.
-
करोना मृतांच्या अस्थी अशाप्रकारे अनेक दिवस स्मशानभूमीमध्ये ठेवण्यात आलेल्या. अनेकांना यामधूनही करोनाचा फैलाव होतो की काय अशी भीती वाटायची. स्मशानभूमीमधील हा फोटोही दानिश यांचाच.
-
केवळ दिल्ली आणि मोठी शहरं नाही तर उत्तराखंडसारख्या छोट्याश्या राज्यामध्येही दानिश हे करोनाची दाहकता आपल्या कॅमेरात टीपण्यासाठी गेले होते.
-
उत्तराखंडमधील एका करोनाबाधित महिलेला तिचा पुतण्या रुग्णालयात नेतानाचा हा फोटो परिस्थितीची दाहकता दर्शवण्याबरोबरच मूलभूत सुविधांची कमतरता अधोरेखित करणारा आहे.
-
२४ एप्रिल २०२१ रोजी काढलेला हा फोटो आहे उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमधील. ऑक्सिजनचा तुटवडा असणाऱ्या या कालावधीमध्ये एका गुरुद्वारेच्या पार्कींगमध्ये थेट रुग्वाहिकेमध्ये अशाप्रकारे लोकांना ऑक्सिजन पुरवला जात होता. हा फोटोही दानिश यांचाच आहे.
-
२९ एप्रिल २०२१ रोजी दिल्लीतील रुग्णालयामध्ये ऑक्सिजन तुटवड्याची दाहकत दर्शवणारा हा फोटोही दानिश यांनीच काढलाय.
-
गंगा नदीच्या घटावर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी अशाप्रकारे मृतांच्या नातेवाईकांची धडपड सुरु होती हे दानिश यांनी आपल्या कॅमेरातून टीपलंय.
-
दिल्लीमध्ये एकाच वेळी अनेक करोना मृतांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरु असतानाच हा एरिअल व्ह्यू कॅमेरात टीपलाय दानिश यांनीच.
-
दिल्लीतील स्मशानभूमीबाहेर एका महिलेच्या आईचा मृत्यू झाल्यानंतर तिचे डोळे पुसताना एक आरोग्य कर्मचारी. हा फोटो २८ एप्रिल २०२१ रोजी दानिश यांनी काढलेला.
-
नवी दिल्लीमधील एका स्मशानभूमीत करोना मृताच्या अंत्यसंस्काराच्या वेळी एकमेकांचं सांत्वन करणारे नातेवाईक कॅमेरात टीपलेत दानिश यांनी. हा फोटो १६ एप्रिल २०२१ चा आहे.
-
२९ एप्रिल २०२१ रोजी दिल्लीमधील होली फॅमेली रुग्णालयातील आयसीयूमध्ये करोना रुग्ण असणाऱ्या महिलेवर उपचार सुरु असतानाचा हा क्षण दानिश यांनी कॅमेरात टीपलाय.
-
यापूर्वी ३८ वर्षीय दानिश यांना २०१८ मध्ये रोिहग्या निर्वासितांवरील छायांकनाबाबत पुलित्झर पुरस्काराने गौरविण्यात आले होते. हा पुरस्कार मिळविणारे ते पहिलेच भारतीय होते.
-
दानिश यांचं शिक्षण जामिया मिलिया इस्लामियात झाले होते. तेथे त्यांचे वडील प्राध्यापक होते. दानिश यांचे वडील प्रा. अख्तर सिद्दिकी आणि आई शाहिदा यांनी मुलाच्या मृत्यूप्रकरणी सध्या आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयात (इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट) तालिबानविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
-
आपल्या मुलाच्या मृत्यूची चौकशी करावी आणि तालिबानचे नेते आणि उच्चस्तरीय सेनानी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
-
अफगाणिस्तानात १६ जुलै २०२१ रोजी स्पिन बोल्दाक भागात रॉयटरसाठी काम करीत असताना दानिश यांच्यावर हल्ला झाला होता. नंतर तालिबानने त्यांना ताब्यात घेऊन छळ केला, तसेच त्यांना ठार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या दानिश यांच्यासह अफगाणी सैनिकांवर नजीकच्या मशिदीत उपचार करण्यात आले होते.


