-
डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील भागात आज एक विचित्र अपघात घडला. रेल्वे स्थानकाजवळच्या सर्वाधिक वर्दळीच्या पाटकर रस्त्यावरून विटांनी भरलेला एक अवजड ट्रक जात असताना अचानक येथील रस्ता खचला. विटांसह ट्रकचा मागील भाग टायरसह जमिनीत रूतला. ही घटना घडताच या भागात काही वेळ वाहतूक कोंडी आणि बघ्यांची गर्दी झाली.
-
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात पाटकर रस्त्यावरील कैलास लस्सी दुकानासमोरून एक विटांनी भरलेला ट्रक चालला होता. रेल्वे स्थानक भागातील या रस्त्यांखालून नाले, गटारे गेली आहेत. त्यावर रस्त्यांची बांधणी केली आहे. अनेक वर्षापासून रेल्वे स्थानक भागातील रस्त्यांची देखभाल करण्यात आली नाही. त्यामुळे हा रस्ता निकृष्ट झाला आहे, असे माहितगाराने सांगितले. याच कारणामुळे हे अवजड वाहन जात असताना अपघात झाला.
-
तेथे या ट्रक चालकाला इतर रिक्षाचालकांनी अवजड वाहनांना या भागात प्रवेश बंदी आहे. अरूंद रस्त्यावरून हा ट्रक जाणार नाही, असे सांगितले. त्यामुळे चालक पाटकर रस्त्यावरून ट्रक फिरवून इंदिरा चौकातून मानपाडा रस्ता मार्गे पलीकडे जात होता.
-
ट्रक चालक नेहरू रस्त्यावरून कैलास लस्सी समोरून वळण घेऊन पाटकर रस्त्याने जात असताना अचानक ट्रकचे मागील चाक डांबरी रस्त्यात रूतत गेले. ट्रक चालविताना चालकाला अवघड वाटू लागले. त्यावेळी पादचाऱ्यांनी ट्रक चालकाला ट्रकचा मागील भाग रस्त्यात रूतत चालला आहे असे सांगितले. चालकाने क्षणार्धात ट्रकमधून उडी मारली. तोपर्यंत ट्रकचा एक भाग टायर, पेट्रोल टाकीसह जमिनीत रूतला होता.
-
वाहतूक पोलिसांनी तातडीने याठिकाणी येऊन या रस्त्यावरील रिक्षा वाहतूक अन्य भागातून वळविली. रस्ता खचला असल्याने या भागातून प्रवाशांनी येजा करू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे. ट्रकमधील विटा उतरवून मग ट्रक पोकलेनच्या साहाय्याने बाहेर काढण्याचे घटनास्थळी वाहन मालकाकडून सुरू होते.
