-
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकासआघाडी सरकार अडचणीत आले आहे. त्यांची समजूत घालण्यासाठी आणि महाविकासआघाडी सरकार वाचवण्यासाठी राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे.
-
शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी सुरतमध्ये जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मात्र, या चर्चेतून अद्याप कोणताही मार्ग निघाला नसून चर्चा निष्फळ ठरली.
-
त्यानंतर आता एकनाथ शिंदे शिवसेनेचे ३३ तर अपक्ष सात अशा एकूण ४० आमदारांना सोबत घेऊन सुरतहून आसाममधील गुवाहाटी येथे पोहोचले. या आमदारांना रात्रीच चार्टर्ड विमानाने गुवाहाटी येथे एअर लिफ्ट करण्यात आलं.
-
एकीकडे इतकी राजकीय धामधुम सुरु असताना दुसरीकडे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड पुकारणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे सातत्याने चर्चेत आहे. त्यांची राजकीय कारकिर्दीची चर्चा सर्वत्र सुरु आहे.
-
एक साधा रिक्षा चालक, शिवसेनेतील एक मातब्बर नेते ते नगरविकास मंत्री यांचा राजकीय प्रवास नेमका कसा होता? हे आपण जाणून घेणार आहोत.
-
एकनाथ शिंदे हे शिवसेनेतील एक मातब्बर नेते म्हणून ओळखले जातात. एकनाथ शिंदे हे जरी ठाणेकर असले तरी त्यांचा जन्म हा ठाण्यात झालेला नाही.
-
एकनाथ शिंदे यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९६४ रोजी साताऱ्यातील महाबळेश्वर तालुक्यातील दरे या ठिकाणी झाला.
-
शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या एकनाथ शिंदेंची परिस्थिती तशी बेताचीच होती.
-
एकनाथ शिंदे यांनी लहान वयातच गाव सोडलं आणि ते ठाण्यात स्थायिक झाले. ठाण्यात आल्यानंतर त्यांनी मंगला हायस्कूलमधून आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं. यानंतर त्यांनी न्यू इंग्लिश हाय स्कूलमधून त्यांनी अकरावीचं शिक्षण घेतलं.
-
पण आर्थिक अडचणींमुळे त्यांना कॉलेज सोडावं लागलं. घरची बेताची परिस्थिती, आर्थिक अडचणी यामुळे एकनाथ शिंदे हे ठाण्याच्या प्रसिद्ध वागळे इस्टेटमधील एका मासळी विकणाऱ्या कंपनीत सुपरव्हायझर म्हणून कामाला लागले.
-
पण त्यानंतर नोकरी सोडत त्यांनी ठाण्यात ऑटो रिक्षा चालवण्यास सुरुवात केली. पण हे काम करत असतानाच वयाच्या १८ व्या वर्षी ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाण्यातील शिवसेनेचे नेते आनंद दिघे यांच्या संपर्कात आले.
-
वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा आंदोलनात त्यांनी पोलिसांचा लाठीचार्जही सहन केला.
-
मितभाषी, संयमी, पण आंदोलनात आक्रमक असलेल्या एकनाथ शिंदेंवर आनंद दिघेंचा प्रचंड विश्वास होता. ते आनंद दिघेंचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाऊ लागले.
-
पक्षाप्रतिची निष्ठा पाहून एकनाथ शिंदेंना त्यांच्या कामाची पावतीही मिळाली. १९८४ मध्ये वयाच्या २० व्या वर्षी एकनाथ शिंदे यांना ठाण्याच्या किसन नगरचं शाखाप्रमुख पद देण्यात आलं. यानंतर खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदे यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली
-
आनंद दिघे यांच्या खांद्याला खांदा लावून एकनाथ शिंदे हे काम करू लागले. पक्षानं दिलेल्या संधीचं शिंदेंनी सोनं करुन दाखवलं.
-
शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात पुढे असलेल्या एकनाथ शिंदेंना १९९७ हे वर्ष अंत्यत लाभदायक ठरलं. १९९७ मध्ये त्यांना आनंद दिघेंनी ठाणे महापालिका निवडणूक लढवली. त्यात ते घवघवीत मतांनी विजयी झाले.
-
त्यानंतर ते २००१ मध्ये ठाणे महापालिकेचे सभागृह नेतेही झाले. २००२ मध्ये त्यांनी पुन्हा नगरसेवक पदाची निवडणूक लढवली. त्यातही ते विजयी झाले.
-
सभागृह नेते म्हणून पालिका गाजवल्यानंतर २००४ मध्ये त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. पहिल्याच विधानसभा निवडणुकीत ते निवडून आले.
-
२००४ च्या निवडणुकीत शिवसेनेचा दारुण पराभव झाला होता. पण एकनाथ शिंदे यांनी बाजी मारली. ते थेट आमदार झाले. त्यानंतर पुढच्या वर्षी २००५ मध्ये ते ठाण्यात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख झाले.
-
२००४ पासून सलग चार वेळा ते कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत.
-
त्यानंतर २०१४ मध्ये शिवसेना ही विरोधी बाकावर बसली होती. तेव्हा त्यांना १२ दिवसांसाठी गटनेतेपदही देण्यात आले.
-
शिवसेना सत्तेत गेल्यानंतर ते मंत्रीही झाले. शिंदे यांनी या आधी २०१५ ते २०१९ पर्यंत सार्वजनिक बांधकाम या खात्याचे मंत्री म्हणून काम पाहिले.
-
नम्र, मितभाषी, कडवट शिवसैनिक, जोडतोडीच्या राजकारणाचं कौशल्य या एकनाथ शिंदेंच्या जमेच्या बाजू आहेत. कार्यकर्त्यांचं गाऱ्हाणं ऐकून घेण्याची क्षमता आणि ‘मास बेस’ असलेला नेता म्हणून शिंदेची ओळख आहे.
-
आनंद दिघेंनंतर ठाण्यात शिवसेना टिकवण्यामागे शिंदेंचे मोठे योगदान आहे. त्यांनी ठाणे पालिका, जिल्हापरिषदा, अंबरनाथ नगरपरिषद, कल्याण-डोंबिवली पालिका, बदलापूर नगरपरिषदेपासून ते नाशिकपर्यंत शिवसेना पक्षाची वाढ केली आहे.
-
२०१९ मध्ये ते कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले. २०१९ मध्ये राज्यात सत्तांतर झाले.
-
भाजपकडून शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्यात आले नाही. त्यामुळे युती पुन्हा फिस्कटली. यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत आघाडी स्थापन केली. पण मुख्यमंत्री पदाचा पेच कायम होता.
-
शिवसेनेकडून सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे ही दोन नाव आघाडीवर होती. पण शरद पवारांच्या आग्रहामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.
-
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्री पद हुकलं. पण सत्ता स्थापन झाल्यावर त्यांना नगरविकास मंत्री हे खातं देण्यात आलं. सरकार स्थापन झाल्यापासूनच महाविकास आघाडीत अनेक खटके उडाले. त्यावेळी पक्षाच्या निष्ठावंत नेत्यांपैकी एकनाथ शिंदेंनी पक्षासाठी अनेक महत्त्वाच्या भूमिका बजावल्या.
-
भाजपकडून वारंवार होणारे आरोप-प्रत्यारोप, घोडेबाजार रोखण्यासाठी एकनाथ शिंदे पक्षाकडून अगदी ठामपणे उभे राहिले. पण आता पक्षाशी एकनिष्ठ असलेला खंदा कार्यकर्ता आणि बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक पक्षावर आणि पक्षश्रेष्ठींवर नाराज आहे.
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच