-
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे सोमवारी पहिल्यांदाच ठाण्यामध्ये आले. यावेळी शिंदे समर्थक शिवसैनिकांनी ढोल-ताशे आणि फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे स्वागत केले.
-
शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचा गड असलेल्या ठाणे शहरात त्यांच्या समर्थकांना त्यांची प्रतीक्षा होती.
-
सोमवारी सायंकाळी शिंदे ठाण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या समर्थकांना मिळाली होती. त्यामुळे सकाळपासून शिंदे समर्थकांनी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू केली होती.
-
टेंभीनाका येथील आनंद आश्रमास फुलांनी सजविण्यात आले होते.
-
शहरात मुख्यमंत्री शिंदे रात्री ९ च्या सुमारास दाखल झाले. आधी त्यांनी आनंदनगर येथे शुभेच्छा स्वीकारल्यानंतर शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेतले.
-
त्यानंतर ते टेंभीनाका येथील आनंद आश्रम येथे गेले. तेथेही ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले.
-
एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे समर्थक आमदारही उपस्थित होते.
-
या ठिकाणी सर्व आमदारांनी एकमेकांना मिठाई भरवून तोंड गोड केलं.
-
टेंभीनाका येथे दिवंगत आनंद दिघे यांच्या पुतळय़ाचे दर्शन घेतले आणि त्यानंतर भर पावसातही त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित असलेल्या समर्थक शिवसैनिकांची त्यांनी भेट घेतली.
-
त्यावेळी शिंदे भावुक झाले आणि त्यांचे डोळे पाणावले. तेथेही ढोल ताशांच्या गजरात त्यांचं स्वागत करण्यात आलं.
-
त्यानंतर ते लुईसवाडी येथील आपल्या निवासस्थानी दाखल झाले. तेथेही सेवारस्त्यावर समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.
-
पावसामध्येही समर्थकांचा उत्साह थोडाही कमी झाला नाही. फटाके, गुलाल, बॅनर्स, जल्लोष आणि ढोल ताशांच्या सोबतीला पाऊसही होता.
-
पुष्पवृष्टी करुन शिंदे यांचं स्वागत करण्यात आलं.
-
मुख्यमंत्री होऊन एकनाथ शिंदे २१ जूननंतर म्हणजेच १० दहा दिवसांहून अधिक कालावधीनंतर घरी आल्यानंतर दारातच त्यांच्या स्वागतासाठी एक खास व्यक्ती हजर होता.
-
या खास व्यक्तीचं नावं होतं रुद्रांश श्रीकांत शिंदे. रुद्रांश हा एकनाथ शिंदेंचा नातू आहे. त्यांनी लगेच रुद्रांशला कडेवर घेतलं.
-
रात्री उशीरा निवासस्थानी पोहोचल्यानंतर शिंदे यांचे कुटुंबीयांनी जोरदार स्वागत केले.
-
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता, सून वृषाली यांनी त्यांचे औक्षण केले. “घराची पायरी चढताच माझी सौभाग्यवती लता, श्रीकांत, सुनबाई तसेच लाडका रुद्रांश यांनी माझे औक्षण करित स्वागत केले,” असं शिंदेंनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलंय.
-
घरातील इतर स्त्रीयांनीही एकनाथ शिंदेंचं औक्षण करुन त्यांचं मुख्यमंत्री म्हणून घरात स्वागत केलं.
-
या साऱ्यांहून अधिक एकनाथ शिंदेंना नातवाला भेटण्याची ओढ लागल्याचं त्यांनी शेअर केलेल्या पोस्टवरुन दिसून येतं.
-
“अनेक दिवसांनी माझा नातू रुद्रांश याने मला पाहिल्यावर त्याचाही आनंद गगनात मावत नव्हता. खऱ्या सुखाची अनुभूतीच ही”, असं म्हणत शिंदे यांनी आपल्या नातवाला भेटल्याचे फोटो शेअर केलेत.
-
रुद्रांशनेही आपलं औक्षण केल्याचं एकनाथ शिंदेंनी पोस्टमध्ये म्हटलंय. अशाप्रकारे रुद्रांक्षने आजोबांच्या कपाळावर टीळा लावून त्यांचं स्वागत केलं. (फोटो सौजन्य : एकनाथ शिंदेंच्या ट्विटरवरुन आणि दीपक जोशी/एक्सप्रेस फोटो)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”