-
सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याचे शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू राजाराम भोसले-पाटील सध्या सगळीकडेच चर्चेत आहेत.
-
“काय झाडी… काय डोंगार… काय हाटील… एकदम ओके” या आठ शब्दांमुळे महाराष्ट्रबरोबरच इंटरनेटच्या माध्यमातून जगभरात अल्पवाधित लोकप्रिय झालेले शहाजीबापू पाटील हे सध्या अनेक वृत्तवाहिन्यांमध्ये आणि बातम्यांमध्ये सातत्याने झळकताना दिसतायत.
-
एकनाथ शिंदेंनी बंड करण्याआधी आणि त्यानंतर ओके” व्हायरल होण्याआधी शहाजीबापू त्यांचा मतदारसंघ वगळता फारसे कोणाला ठाऊक नव्हते.
-
मात्र अवघ्या चार आठवड्यांमध्ये शहाजीबापू केवळ महाराष्ट्राच नाही तर जगभरातील मराठी लोकांना ठाऊक झालेत. त्यांना या बंडखोरी प्रकरणामुळे तुफान लोकप्रियता मिळाली आहे.
-
शहाजीबापू यांच्या त्या आठ शब्दांची जादू इतकी आहे की त्या शब्दांचा समावेश असणारी गाणीही तयार करण्यात आली असून ती युट्यूबवर धुमाकूळ घालतायत.
-
अर्थात राजकीय टीका टीप्पणी आणि साजकीय भूमिकांसाठी शहाजीबापू पाटील यांचं वजन वाढलं असलं तरी ते त्यांच्या गावरान स्टाइलमुळे अधिक लोकप्रिय झाले आहेत.
-
शहाजीबापूंच्या पत्नी रेखा पाटीलही चांगल्याच लोकप्रिय झाल्याचं पहायला मिळत आहे.
-
बंडखोरीनंतऱ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर शहाजीबापू सांगोल्याला परतल्यानंतर रेखा यांनी घेतलेला उखाणा असो किंवा मग “काय झाडी… काय डोंगार… काय हाटील… एकदम ओके”वर दिलेली प्रतिक्रिया असो रेखा पाटीलही चांगल्याच चर्चेत असतात.
-
नुकतच हे जोडपं चला हवा येऊ द्या या झी टीव्हीवरील मालिकेमधील राजकारण विशेष भागामध्ये सहभागी झालं होतं.
-
शहाजीबापू पाटील यांच्यासोबतच मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटीलही आपल्या पतीसोबत सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं.
-
आपल्या स्वभावाप्रमाणे मोकळेपणे हसण्याबरोबरच शहाजीबापू पाटील यांनी आपल्याकडील किस्से आणि उत्तरांनी लोकांनाही हसवलं.
-
झाडी, डोंगार, हाटीलमुळे लोकप्रिय झालेल्या शहाजीबापू पाटील यांच्या याच संवादाच्या अवतीभोवती थुकरटवाडीतील स्कीट लिहिण्यात आल्याचं पहायला मिळतंय.
-
विशेष म्हणजे यावेळेस शहाजीबापूंनी खास उखाणाही घेतल्याचं पहायला मिळालं. मातीशी नाळ जोडलेला नेता ही ओळख जपणारा उखाणा घेताना शहाजीबापूंनी सांगोल्यातील नदीच्या नावाचं यमक आपल्या पत्नीचं नाव घेताना जुळवल्याचं पहायला मिळालं.
-
पत्नी रेखाचं नाव घेताना शहाजीबापूंनी, “माझ्या दुष्काळाला पाणी देण्याऱ्या नदीचं नाव आहे माण अन् रेखा माझी जान” असा खणखणीत उखाणा घेतला.
-
अगदी आपल्या पत्नीच्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवत त्यांनी हा उखाणा घेतला. हा उखाणा ऐकून रुपाली ठोंबरेंसहीत किशोरी पेडणेकर यांनाही हसू आलं. तर स्वप्नील जोशीने ‘एक नंबर’ असं म्हणत या उखाण्याला दाद दिल्याचं पहायला मिळालं.
-
याच कार्यक्रमामध्ये शहाजीबापू आणि रेखा यांच्या लग्नाच्या वेळेचा एक धम्माल किस्साही या जोडप्याने सांगितला.
-
लग्नाच्या वेळेस रेखा यांना शहाजीबापूंनी दिलेले सोन्याचे दागिने हे खोटे होते, असा खुलासा रेखा यांनी केला.
-
शहाजीबापूंनी आपल्या पत्नीला लग्नाच्यावेळी दिलेल्या दागिने हे पितळ्याचे होते.
-
मी सोनाराकडे गेल्यानंतर मला हे दागिने पितळ्याचे असल्याचं समजलं असं रेखा यांनी डॉ. निलेश साबळेंच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.
-
यामागील कारण शहाजीबापूंना विचारण्यात आलं. त्यावर उत्तर देताना आधी त्यांनाच हसू अनावर झालं.
-
एक हजार रुपयांमध्ये माझं लग्न उरकण्याचं आम्हा तिन्ही भावांनी ठरवलं होतं, असं लग्नाच्या वेळेची आठवण सांगताना शहाजीबापू म्हणाले.
-
लग्नासाठी दागिने करायला सोनाराकडं गेलो तर त्याने ७५० रुपये तोळा सोनं असल्याचं सांगितल्याचं शहाजीबापूंनी आठवणींना उजाळा देताना नमूद केलं.
-
एवढा दर परवडत नसल्याने काहीतरी जुगाड करण्याचा निर्णय शहाजीबापूंनी त्यावेळी घेतला.
-
पुढे बोलताना शहाजीबापूंनी, सोनारानेच पितळ्याचे दागिने बनवण्याचा सल्ला दिल्याची कबुली दिली. संभाजीबापू म्हणाले की, “सोनार माझा दोस्तच होता. त्यामुळे त्याने २०० रुपयांचं सोन टाकून बाकी पितळं वापरुन चकचकीत करुन दागिने बनवून देतो असं तो म्हणाला.”
-
“ते दागिने हिला दिले. त्यानंतर सात आठ महिन्यांनी ही गेली ते मोडायला तर तिला कळलं,” असंही शहाजीबापू म्हणाले.
-
“ती आली माझ्याकडं भांडायला. तर मी म्हटलं पाया पडतो भांडू नको. थोरल्या भावानं केलंय त्याच्याशी भांड, का माझ्या डोक्याशी…” असं म्हटल्याचं शहाजीबापू म्हणाले.
-
अगदी हात जोडून शहाजीबापूंनी लग्नाच्या वेळेचा खोट्या सोन्याच्या दागिण्यांचा हा किस्सा सांगितला आणि सारेच जण हसू लागले. (फोटो झी मराठी आणि ट्वीटरवरुन साभार)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”