-
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा आज ६३ वा वाढदिवस. अजित पवार हे त्यांच्या भाषणांसाठी आणि वक्तव्यांसाठी ओळखले जातात. अनेकदा ते पत्रकार परिषदेमध्ये अशी काहीतरी भन्नाट उत्तर देतात की पत्रकांरांना हसू अनावर होतं. केवळ कोपरखळ्याच नाही तर त्यांनी केलेली टीकाही कायमच चर्चेचा विषय ठरते. अगदी विरोधकांपासून ते पत्रकारांपर्यंत अजित पवारांची विधानं चर्चेत असतात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची अशी काही गाजलेली वक्तव्यं आपण या गॅलरीमधून पाहणार आहोत.…
-
“हनुमान जयंतीला पर्वत आणायला जाऊ नका, घरातच थांबा” उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील वर्षी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये करोनाच्या पार्श्वभूमीवर शब्ब-ए-बारात तसंच हनुमान जयंतीला घराबाहेर पडू नका असं आवाहन राज्यातील जनतेला केलं होतं. “लक्ष्मणाचे प्राण वाचवण्यासाठी हनुमानानं औषधी झाडासह संपूर्ण पर्वत उचलून आणल्याचं वर्णन रामायणात आहे. आज जनतेला करोनापासून वाचवण्यासाठी हनुमानासारखे पर्वत उचलण्याची नाही तर घरातच थांबण्याची गरज आहे,” असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. मुस्लीम बांधवांनीही शब्ब-ए-बारातसाठी घराबाहेर पडू नये, घरातंच थांबावं असंही त्यांनी म्हटलं होतं. “करोना संसर्गाची साखळी तोडणं आणि नागरिकांचा जीव वाचवणं हे पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपासून देशातील प्रत्येक व्यक्तीचं आज एकमेव कर्तव्यं आहे. त्यासाठी घराबाहेर न पडणं, बाहेरील व्यक्तीच्या संपर्कात न येणं, करोनाला प्रसाराची संधी न देणं आणि करोनाची साखळी तोडणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. पुढील सूचना येईपर्यंत सण, उत्सव, पूजा, अर्चा, यात्रा, जत्रा, प्रार्थना, धार्मिक कार्ये ही घरातंच करावीत, कुणीही घराबाहेर पडू नये,” असं अजित पवार यांनी सांगितलं होतं.
-
“अरे त्याचा बाप सांगतोय ना” : एका पत्रकाराने अजित पवारांना पार्थ पवार सिंगापूर येथून सुखरुप पोहोचले का असं विचारलं असता अजित पवारांनी सांगितलं की, “तो कधीच सिंगापूरला गेला नव्हता. काही लोक चुकीच्या बातम्या सांगतात. तुम्हाला हवं तर त्याचा पासपोर्ट दाखवतो. माझ्या माहितीप्रमाणे गेल्या तीन चार महिन्यात तो काही सिंगापूरला गेलेला नाही”. यावर पत्रकारांनी अजून प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला असता, “आता मीच त्याचा बाप सांगतोय ना…पासपोर्ट दाखवायचीही माझी तयारी आहे” असं भन्नाट उत्तर दिलं.
-
“एका कार्यक्रमात मी सात वाजता गेलो होतो” : अजित पवार यांच्या कामाचा उरक आणि आवाका मोठा आहे. त्यामुळे यापुढचे कार्यक्रम ११ नंतर घ्या अशी विनंती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे केली होती. मात्र अजित पवारांनी त्यांना शाब्दिक चिमटे काढत सकाळी लवकर उठायची सवय करुन घ्या असं प्रत्युत्तर दिलं होतं. “राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येऊन तीन महिनेच झाले आहेत. विविध मंत्र्यांकडून अनेक निर्णय घेतले जात आहेत. मात्र या सगळ्यांमध्ये अजित पवार आघाडीवर आहेत. सकाळपासून ते रात्रीपर्यंत दादांच्या बैठका सुरु आहेत. आम्ही सगळे त्यांच्याकडून स्फूर्ती घेऊनच काम करत आहोत. मात्र त्यांनी सकाळी दहाऐवजी अकराला कार्यक्रम ठेवावेत” असंही आव्हाड यांनी म्हटलं होतं. त्यावर उत्तर देताना अजित पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांना शाब्दिक चिमटे काढले. “सकाळी लवकर उठायची सवय ठेवा. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात मी सात वाजता गेलो होतो. त्यावेळी अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. लवकर उठून काम करावं लागतं. मी हे सगळं शरद पवार यांच्याकडून शिकलो आहे. ” असंही अजित पवार यांनी म्हटलं होतं.
-
“फडणवीस यांनी इतकं केलं तर आम्हाला सुगीचे दिवस येतील” – माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये फडणवीस यांच्या पुस्तकाचं कौतुक करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, फडणवीसांनी राजकारण सोडून लेखक बनायला काही हरकत नाही असं म्हटलं होतं. ““देवेंद्र फडणवीसांचं हे पुस्तक बघितल्यानंतर देवेंद्रजी तुम्ही उत्तम साहित्यिक होऊ शकाल असं आम्हाला जाणवायला लागलं आहे आणि विषयाची जाण जर बघितली तर राजकारण सोडून लेखक बनायला काही हरकत नाही असं आम्हाला वाटतं. तसं झाल्यास आम्हाला पण सुगीचे दिवस येतील. आमचं जरा बरं चालेल,” असं पवार म्हणाले होते. “देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण सोडून लेखक व्हायला हरकत नाही. तेवढेच आम्हाला शांतपणे जगता येईल. राम नाईक आलेले आहेत. त्यांनी देवेंद्रजींच्या या ज्ञानाचा उपयोग दिल्लीत करून घ्यावा. अर्थात तसे झाले तर सर्वात जास्त आनंद हा सुधीर मुनगंटीवार यांना होईल,” अशी टोलेबाजी करत अजित पवार यांनी कार्यक्रमात रंगत आणली होती.
-
“सूनेत्रा तर तिथून निघूनच आली” : “मुंबईला येत असताना जी मुंबईची कामं असतील तिच घेऊन या. बरेच जण विचारल्यावर सांगतात, काही नाही दादा सहज भेटायला आलो, म्हणतात. सहज देखील भेटायला येऊ नका. एकतर अजून सरकारी घर मिळायचं असतं, ते मिळालेलं नाही. त्याच्यामुळे ज्या घरात राहतोय, तिथे डायनिंग टेबलवर माणसं बसवावी लागतात. हॉलमध्ये बसवावी लागतात. बेडरूममध्ये माणसांना बसवावं लागतं. सूनेत्रा तर तिथून निघूनच आली. म्हणाली, आता राहतच नाही इथे. जोपर्यंत मोठं घर मिळत नाही. अशी माझी अवस्था झाली आहे. त्याच्यामुळे तुम्ही मला समजून उमजून घ्या,” असं अजित पवार कार्यकर्त्यांना संदेश देताना म्हणाले होते.
-
“सूर्याकडे पाहून थुंकलं तर काय होणार?” : गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले करोना आहेत असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या टीकेला उत्तर देताना, “शरद पवार यांना उभा भारत देश ओळखतो. कुठलंही संकट येवो, गारपीट, दुष्काळ, भूकंप किंवा इतर काही समस्या. शरद पवार उमेदीच्या काळात तर फिरलेच मात्र या वयातही ते पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. ज्या माणसाची योग्यता नाही, आपण काय बोलतो, कुणाबद्दल बोलतो याचा जराही विचार जो माणूस करत नाही त्याच्याबद्दल काय बोलायचं? सूर्याकडे पाहून थुंकल तर थुंकी आपल्याच अंगावर पडणार ना?”, असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. “जी व्यक्ती बोलली त्यांचा स्वभाव तसाच आहे. पूर्वी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयीही बोलले होते. एखाद्याला नको तितकं महत्त्व दिल्याने त्याला आकाशही ठेंगणं वाटतं त्यातलाच हा प्रकार आहे. बारामतीकरांनी सर्वांची डिपॉझिट जप्त केली तसं याचंही डिपॉझिट जप्त केलं. यावरुन जनाधार त्यांच्यामागे किती आहे ते समजतं, राज्याने ते ओळखलं आहे. आम्ही असल्या माणसांकडे लक्ष देत नसतो,” असंही अजित पवार म्हणाले होते.
-
“भाजपाचा सत्तेचा माज उतरवायचा असेल आमच्या हाती सत्ता द्या” : “आमच्या हाती सत्ता दिल्यावर तीन महिन्यांमध्ये सात बारा कोरा न केल्यास पवारांची औलाद आहे, असं सांगणार नाही,” असं अजित पवार यांनी निवडणूक प्रचाराच्यावेळी सांगितले होते.
-
मागील वर्षी मार्च महिन्यामध्ये पुण्यातील एका पत्रकार परिषदेमध्ये अजित पवारांना एका पत्रकाराने तुम्ही लस घेतली का असा प्रश्न विचारला. त्यावर अजित पवारांनी आपल्या खास शैलीमध्ये उत्तर देताना, “होय रे बाबा, मी लस घेतली आहे. मला इतरांसारखा लस घेताना फोटो काढायचा नव्हता. अशी नौटंकी मला आवडत नाही,” असं म्हटलं. यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
-
लसीसंदर्भात अजित पवारांना विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी अगदी मिश्कील शब्दामध्ये एक टोलाही लगावला. “इतरांनी फोटो टाकल्यानंतर अनेकांनी ती लस घेतली. मी जर लस घेताना फोटो काढला असता तर जे लस घेणारे आहेत त्यांनी पण लस घेतली नसती”, असं अजित पवार यांनी म्हणताच सर्वजण हसू लागले.
-
त्यानंतर त्याच पत्रकार परिषदेमध्ये एप्रिल महिन्यात मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोफत लसीकरणावर चर्चा होणार असून तेव्हाच निर्णय होईल, असं अजित पवारांनी सांगितल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी पुन्हा खोदून खोदून काय निर्णय होऊ शकतो, असं विचारलं असता अजित पवारांनी त्यावरून प्रतिनिधींना चांगलाच टोला हाणला होता.
-
“आत्ता मी काही बोललो आणि उद्या तिकडे मंत्रिमंडळ बैठकीत सगळ्यांच्या चर्चेत काही वेगळा प्रस्ताव मंजूर झाला तर उद्या पुन्हा माझी ब्रेकिंग न्यूज होईल. बघा अजित पवार हे म्हणाले होते आणि मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला आहे. त्यापेक्षा उद्या काय तो निर्णय होईल. २४ तास प्रतीक्षा करा”, असं अजित पवार म्हणाले होते. ज्यावर पत्रकांनाही हसू आवरता आले नव्हते.
-
डिसेंबर २०२० मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत भाजपाला मोठा फटका बसला होता. त्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीतील पक्षांनी एक-एकटं लढावं असं वक्तव्य केल्याचं सांगत पत्रकारांनी यावर अजित पवार यांना प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देताना आम्ही कसंही येऊन कोणी बिनकामाचा सल्ला देण्याची गरज नाही अशा शब्दांमध्ये अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना सुनावलं होतं.
-
“हे बघा आम्ही एकटं यायाचं की आघाडी करुन यायचं ते आमचे वरिष्ठ नेते ठरवतील. यांनी कोणी बिनकामाचा सल्ला देण्याचं काही कारण नाही,” असा टोला अजित पवार यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला. पुढे बोलताना खास गावरान भाषेत त्यांनी, “हे बघा एक नक्की आहे. म्हायासारखा माणूस त्यांच्या जागी असता तर खुल्या मनाने पराभव मान्य केला असता. आम्हाला आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. आम्हाला एवढा दारुण पराभव का झाला याचं चिंतन करुन वगैरे वगैरे. पण तो देखील दिलदारपणा दाखवण्याची दानत त्यांच्या लोकांची नाहीय. पण ठीक आहे, त्यांच त्यांना लखलाभ”, असं म्हटलं होतं.
-
“काल, आज आणि उद्या पवार कुटंबीय एकत्रच असणार” – “काल, आज आणि उद्याही पवार कुटुंबीय एकत्रच असणार, आमच्या कुटुंबाकडे लक्ष देण्यापेक्षा देशाचा विकास कसा होईल हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहावे”, असे उत्तर अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले होते. वर्धा येथील भाजपाच्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवार कुटुंबीय आणि शरद पवारांवर निशाणा साधला होता. त्यावर आज अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जशास तसे उत्तर दिले आहे. एवढंच नाही तर आम्हाला तुमच्याबद्दल आदर आहे, आम्ही तुमच्या कुटुंबाबद्दल बोलणार नाही असंही अजित पवार यांनी म्हटलं होतं.
-
“शप्पथ खरं सांगतो, असं झालं तर मुनगंटीवार सर्वाधिक खूष होतील” – ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ या देवेंद्र फडणवीस यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात विधिमंडळातील नेत्यांनी फडणवीस यांच्या कौतुकाचे निमित्त साधत टोले, चिमटे व फटकारे लगावत विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात राजकीय रंगपंचमीच साजरी केली होती. कार्यक्रमाला सर्वच पक्षांचे नेते उपस्थित होते. यामध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांचाही समावेश होता. फडणवीस यांच्या पुस्तकाचे कौतुक करुन झाल्यानंतर भाषणाच्या शेवटी अजित पवारांनी नाईक यांचा उल्लेख करत फडणवीस यांच्या ज्ञानाचा उपयोग दिल्ली करण्यासंदर्भातील हलचाली कराव्यात अशी इच्छा बोलून दाखवली. “रामनाईक साहेब तुम्ही या कार्यक्रमाला हजर आहात. तर जरा वर म्हणजेच दिल्लीला सांगितलं की हे (फडणवीस) साहित्यिक पण आहेत, यांना बरचं ज्ञान आहे. तर त्या ज्ञानाचा दिल्लीमध्ये आपण उपयोग करुन घेऊ. असं ठरल्यास महाराष्ट्राच्या खालच्या सभागृहाच्या २८८ सभासदांची त्याला एकमताने मान्यता राहिलं. त्यातही फडवीस दिल्लीला गेल्यास सर्वाधिक आनंद सुधीर मुनगंटीवार यांना होतील,” असं मत अजित पवारांनी मांडलं. त्यानंतर गळ्याजवळ हात नेत, “गळ्याची आण खोटं बोलत नाही,” असं म्हणत फडणवीसांकडे पाहिलं. पवारांच्या या मजेदार टिप्पणीमुळे सभागृहात एकच हशा पिकला.
-
जून २०२१ मध्ये बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यासमोर करण्यात आलेल्या आंदोलनावरुन भाजपाचे माजी खासदार निलेश राणे यांनी निशाणा होता. अजित पवारांकडे १० सेकंद थांबून विचारपूस करायला जी माणुसकी लागते ती सुद्धा नाही अशा शब्दातं त्यांनी टीका केली होती. त्यावरही अजित पवारांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं होतं.
-
या घटनेसंबंधी बोलताना अजित पवारांनी सांगितलं की, “जे येतात त्या सर्वांना मी भेटत असतो. मी लोकांमध्ये राहणारा कार्यकर्ता आहे. ३० वर्षांपासून हेच काम करत असून पुढेही जनतेचा पाठिंबा आहे तोपर्यंत तेच करणार आहे. मी बैठकीतून बाहेर पडल्यानंतर काहीजण एकदम आडवे आले, आमचा ताफा निघतो तेव्हा रस्ता मोकळा असतो,त्यामुळे असं कोणी वाहनासमोर येऊ नये. आम्ही वेळ दिली होती, भेटा, चर्चा करा निवदेन द्या…चर्चेची तयारी आहे,” असं अजित पवार यांनी सांगितलं होतं.
-
“सरकार कोणाचंही असलं तरी सगळेच समाधानी आहेत असं नसतात. कोणीही १०० टक्के समाधानी नसतं. ही एक मिनिटाची गोष्ट घडली, पण लगेच त्याची ब्रेकिंग सुरु झाली. त्याआधी बैठक झाली, त्यात काय झालं त्याचं काही दाखवलंच नाही अशी खंत व्यक्त केली. तसेच निलेश राणेंच्या टीकेबद्दल विचारण्यात आलं असता, “ज्यांना काही उद्योग नाहीत ते अशी टीका करत असतात. टीका कोण करत आहे…म्हणजे ती व्यक्ती कोण आहे यावरुन त्या टीकेला महत्व असतं. त्यांच्या टीकेकडे कोण लक्ष देतं,” असा टोला त्यांनी लगावला होता.
-
“ये बारामतीमध्ये बघतोच तुला” : २०१९ मध्ये पक्षाने जबाबदारी दिल्यास शरद पवारांची बारामतीदेखील जिंकवून दाखवू, असे विधान जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केले होते. यावरुन महाजन यांना उद्देशून अजित पवार यांनी, “ये बारामतीमध्ये बघतोच तुला… ५०- ५० वर्ष इथले लोक मला व माझ्या चुलत्यांना निवडून देत आहेत आणि हे कुठलं सोमटं आलंय. लोकांना फसवले जात असून त्यांना गाजरं दाखवली जात आहेत. खासगी आयुष्यावर गदा आणली जात आहे. व्यक्ती स्वातंत्र्यावर हा हल्ला आहे. इंग्रजांच्या पारतंत्र्यापेक्षा फार गंभीर पारतंत्र्य या सरकारच्या काळात सुरु असून त्यासाठी परिवर्तन झालेच पाहिजे, हे सरकार गेलेच पाहिजे,” असं म्हटलं होतं.
-
पुण्यामधील करोना आढावा बैठकीसाठी पोहचलेल्या अजित पवारांकडे ७ मे २०२१ रोजी मराठा चेंबर ऑफ कॉमर्सने ५० बायकॅट यंत्र आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स सुपूर्द केले होते. अजित पवार बैठकीला जाण्याआधीच प्रशासकीय इमारतीच्या बाहेरच मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सचे महासंचालक प्रशातं गिरवणे यांच्या हस्ते ही सामुग्री अजित पवारांकडे देण्यात आली होती. यासंदर्भात अजित पवारांनी गिरवणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. मात्र ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सला वीज लागते का असा प्रश्न अजित पवारांनी सर्वांसमोरच विचारला होता.
-
“…तर मी दोषी आढळल्यास राजकारण सोडून देईन” : मावळ गोळीबार प्रकरणी अजित पवार दोषी असल्याची टीका करण्यात येते. या प्रश्नावर अजित पवार यांनी २०१९ मध्ये एका प्रचारसभेत आपली भूमिका मांडली होती. “मी कोणालाही आदेश दिले नाहीत. यासंदर्भात काही जर संभाषण असेल त्यांनी सादर करावे. तसेच सीबीआय, सीआयडी या संस्था मार्फत चौकशी करावी. आता तर त्यांचेच सरकार असल्याने या चौकशीला सामोरे जाण्यास मी तयार असून या चौकशीचा अहवाल लोकांसमोर यायला पाहिजे. माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. मी देखील शेतकऱ्यांचा पोरगा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेणार नाही. गोळीबार प्रकरणी माझ्या वरील आरोप खोटे असून मी माझी राजकीय कारकीर्द पणाला लावण्यास तयार असून मी दोषी आढळलो तर राजकारण सोडून देईन,” असं पवार म्हणाले होते.
-
१५ मे २०२२ रोजी सांगलीत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकाराने मास्क काढा म्हटल्यानंतर अजित पवारांनी, “हमम… मास्क काढा. अजून कपडे काढायला लावा मला,” अशी प्रतिक्रिया दिली होती. ही प्रतिक्रिया ऐकून सारेच हसू लागले. पुढे हसतच बोलताना अजित पवार यांनी, “आम्ही दोन वर्ष मास्क लावून प्रेस घेतो. कुठं कोणी सांगितलं नाही. सांगलीचं मला काही कळत नाही बाबा,” असं म्हटलं होतं.
-
राज्यात सध्या सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर २४ जून रोजी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये तीन पक्षांच्या सरकारपेक्षा दोन पक्षांचं सरकार चांगलं असं तुम्ही पहिल्यांदा शपथ घेतल्यानंतर म्हणाला होता, असं एक पत्रकार अजित पवारांना म्हणाला. त्यानंतर, अजित पवारांनी स्वत:कडे हात करत, “कोण मी?” असा प्रश्न पत्रकाराला विचारला. त्यावर पत्रकाराने ‘होय, नोव्हेंबर २०१९ मध्ये’ असं उत्तर दिलं. पत्रकारने थेट देवेंद्र फडणवीसांसोबतच्या पहाटेच्या शपथविधीचा संदर्भ दिल्यानंतर अजित पवारांनी त्यावर मजेशीर प्रतिक्रिया दिली. “मी जेव्हा पहिल्यांदा शपथ घेतली होती ना, त्यानंतर मी प्रसारमाध्यमांसमोर आलोच नव्हतो,” असं अजित पवार यांनी एकदम हातवारे करुन सांगितलं. ते पाहून अजित पवारांच्या बाजूला बसलेले राष्ट्रवादीचे राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासहीत सर्वच उपस्थित पत्रकार जोरजोरात हसू लागले.
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”