-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाला ३० जुलै रोजी एक महिना पूर्ण झाला.
-
एक महिना उलटून गेला तरी शिंदे आणि फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अद्यापही झालेला नाही.
-
परिणामी मुख्यमंत्री आणि बिनखात्याचे उपमुख्यमंत्री असाच कारभार सध्या सुरू आहे.
-
मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल, असे साचेबद्ध उत्तर मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सातत्याने दिले जाते.
-
पण या मंत्रीमंडळ विस्ताराला सरकार स्थापनेला एक महिना उलटून गेल्यानंतर अद्यापही मुहूर्त मिळालेला नाही.
-
शिंदे यांचा सध्या वेगवेगळ्या जिल्ह्यांचा दौरा सुरु आहे.
-
या दौऱ्यांनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचे सुतोवाच शिंदे यांनी केले.
-
मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याने सध्या सारा कारभार हा मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडेच आहे.
-
सरकारचे प्रमुख या नात्याने त्यांना सर्व खात्यांमध्ये मुख्यमंत्र्यांना लक्ष घालता येते.
-
उपमुख्यमंत्रीपद हे घटनात्मक पद नाही. राजकीय सोयीसाठी हे पद निर्माण करण्यात आले.
-
त्यामुळे मुख्यमंत्र्यांप्रमाणे उपमुख्यमंत्र्यांना अधिकार नसतात.
-
खातेवाटप झालेले नसल्याने फडणवीस हे कायदेशीरदृष्ट्या बिनखात्याचे उपमुख्यमंत्री आहेत.
-
शिंदे हे मुख्यमंत्री असले तरी सरकारवर भाजपा किंवा फडणवीस यांचाच पगडा आहे.
-
मात्र सरकारी कामकाजाच्या नियमानुसार खातेवाटप झालेले नसल्याने फडणवीस यांच्याकडे अधिकृतपणे कोणत्याही खात्याचा पदभार सध्या तरी नाही.
-
मात्र कारभाराबद्दल संभ्रम असला तरी हे दोन मंत्र्यांचं सरकार एका नव्या विक्रमाच्या दिशेने पण नकोश्या विक्रमाच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे.
-
शिंदे व फडणवीस सरकारचा विस्तार होत नसल्याने विरोधकांनी टीकेची झोड उठविली आहे. अगदी राष्ट्रवादीपासून शिवसेनेपर्यंतच्या अनेक नेत्यांनी मागील महिन्याभरात याबद्दल भाष्य केलं आहे.
-
दोनच मंत्र्यांना धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नाही, अशी टीका सुरू झाली.
-
घटनेत मंत्रिमंडळाची किमान संख्या ही १२ असावी अशी तरतूद आहे.
-
पण किमान संख्येचे मंत्रिमंडळ किती काळात अस्तित्वात आले पाहिजे, अशी काहीच ठोस तरतूद नाही.
-
हिमाचल प्रदेशमध्ये १० जणांच्या मंत्रिमंडळाच्या कारभारावरून करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने खर्च कमी होत असल्यास कमी आकारमानाचे मंत्रिमंडळ असल्यास बिघडले कुठे, असे निरीक्षण नोंदविले होते.
-
३० जून रोजी शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
-
यावेळी फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
-
आठडाभराच्या बंडखोरी नाट्यानंतर शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर शिंदे यांनी दुसऱ्याच दिवशी शपथ घेतली.
-
भाजपाच्या १०६ आमदारांच्या पाठिंब्यावर आणि ४० बंडखोर आमदारांबरोबरच १० अपक्ष आमदारांच्या संख्याबळाच्या जोरावर शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. तेव्हापासून राज्यात या दोन मंत्र्यांच्या सरकावर विरोधकांकडून सातत्याने टीका केली जातेय.
-
तेलंगणात मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली दोनच मंत्र्यांचे सरकार ६६ दिवस कार्यरत होते.
-
तेलंगणात मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीला २०१८ मध्ये पुन्हा सत्ता मिळाली तेव्हा मुख्यमंत्री चंद्रशेखर राव आणि मोहंमद अली हे दोनच मंत्री होते.
-
चंद्रशेखर राव यांच्यासह दोघांचा शपथविधी १३ डिसेंबर २०१८ रोजी झाला होता, तर मंत्रिमंडळाचा विस्तार १९ फेब्रुवारी २०१९ रोजी म्हणजे तब्बल ६६ दिवसांनी झाला होता.
-
यामुळेच शिंदे व फडणवीस सरकार चंद्रशेखर राव यांचा हा नकोसा विक्रम मोडीत काढणार की काय अशी चर्चा सुरु झालीय.
-
मुख्यमंत्री शिंदे हा विक्रम मोडतात का, याचीच आता भाजपा आणि शिंदे गटाच्या आमदारांना उत्सुकता आहे.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”