-
सरकारी आकडेवारीनुसार, २०२१-२२ या आर्थिक वर्षात भारताने सुमारे ४२२.२ बिलियन डॉलरच्या वस्तू आणि सेवा जगाला निर्यात केल्या आहेत. कोणत्याही आर्थिक वर्षाच्या तुलनेत ही भारतातील सर्वात मोठी निर्यात आहे. देशाअंतर्गत अनेक क्षेत्रांनी उत्कृष्ट उत्पादन केल्याने निर्यातीचा हा विक्रमी आकडा गाठण्यात मदत झाली आहे.
-
CMIE इकॉनॉमिक आऊटलूक डेटानुसार, भारताने या कालावधीत अभियांत्रिकी संबंधित वस्तूंची सर्वाधिक निर्यात केली. अभियांत्रिकी वस्तू क्षेत्रात भारताने ६९.८ बिलियन डॉलर्सची निर्यात केली.
-
त्यापाठोपाठ रिफाइंड पेट्रोलियम आणि कच्च्या तेलाची ६७.६ बिलियन डॉलरची निर्यात केली. त्यानंतर रसायने आणि संबंधित उत्पादनांनी भारताच्या निर्यातीत ५७.३ बिलियन डॉलर, कृषी आणि संबंधित उत्पादनांनी ४९.७ बिलियन डॉलर आणि वस्त्रोद्योग क्षेत्राने ३९.८ बिलियन डॉलरचं योगदान दिले.
-
यावर्षी भारताच्या निर्यातीत ४५.१० टक्के वाढ झाली. २०२०-२१ या आर्थिक वर्षात भारताने सुमारे २९१ बिलियन डॉलरची निर्यात केली. हा कल असाच सुरू राहिला तर २०२२-२३ या आर्थिक वर्षात भारत ५०० बिलियन डॉलरचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य गाठू शकेल.
-
भारताच्या व्यापारी भागीदारांबद्दल बोलायचे झाल्यास, अमेरिकेनं चीनला मागे टाकले आहे, जो बऱ्याच काळापासून आघाडीवर होता. अमेरिका भारतासाठी सर्वात मोठी निर्यात बाजारपेठ म्हणून उदयास आली आहे. गेल्या आर्थिक वर्षात भारताने अमेरिकेला ७६.२ बिलियन डॉलरची निर्यात केली आहे. भारताच्या एकूण निर्यातीच्या तुलनेत हा वाटा १८ टक्के इतका आहे.
-
आखाती देश संयुक्त अरब अमिराती हा देश भारतासाठी दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश आहे. गेल्या आर्थिक वर्षात भारताने यूएईला २८.१ बिलियन डॉलर्सची निर्यात केली, जी भारताच्या एकूण निर्यातीच्या ६.७ टक्के इतकी आहे. २०२०-२१ च्या तुलनेत २०२१-२२ मध्ये UAE मध्ये भारतीय निर्यात ६९ टक्क्यांनी वाढली आहे.
-
एकेकाळी भारतासाठी सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या चीनची आता तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात भारताने चीनला २१.२ अब्ज डॉलरची निर्यात केली. हे भारताच्या एकूण निर्यातीच्या ५ टक्के इतके होते.
-
शेजारील देश बांगलादेशला भारतातून अनेक वस्तूंची निर्यात केली जाते. अगदी तांदळापासून गव्हापर्यंत विविध बाबींसाठी बांगलादेश भारतावर खूप अवलंबून आहे. २०२१-२२ मध्ये भारताने बांगलादेशला १६.१ बिलियन डॉलर्सची निर्यात केली आहे. यामध्ये कृषी उत्पादने, वस्त्र, तयार कपडे आणि अभियांत्रिकी सामानाचा समावेश होता.
-
युरोपातील अनेक देशांसोबत भारताचे व्यापारी संबंध वाढत आहेत. निर्यातीसाठी नेदरलँड ही भारतासाठी मोठी बाजारपेठ म्हणून उदयास येत आहे. गेल्या आर्थिक वर्षात निर्यातीच्या नेदरलँड हा भारताची ५ वा सर्वात मोठा देश ठरला आहे. भारताने या देशाला १२.५ बिलियन डॉलर्सची निर्यात केली, जी एकूण निर्यातीच्या ३ टक्के इतकी होती. भारताने नेदरलँडला पेट्रोलियम उत्पादने,अभियांत्रिकी उत्पादने, रसायने आणि इतर उत्पादने नेदरलँडला निर्यात केली आहेत. (सर्व फोटो सौजन्य- रॉयटर्सवरून साभार)

शनीदेव घेऊन आले सुखाचे दिवस; मकर राशीची साडेसाती संपताच ‘या’ तीन राशींना गडगंज श्रीमंतीचे सुख लाभणार