-
काँग्रेसचे माजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर घणाघाती टीका करत बंडखोर ‘जी-२३’ गटाचे नेते गुलाम नबी आझाद यांनी शुक्रवारी क्षाचा राजीनामा दिला.
-
आझाद यांनी गांधी कुटुंबावर थेट प्रहार केल्यामुळे सामंजस्याची शक्यता संपुष्टात आली आहे.
-
जम्मू-काश्मीरमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आझाद नवा पक्ष स्थापन करणार असल्याचे सांगितले जाते.
-
त्याचवेळी दुसरीकडे आझाद यांचा नवा पक्ष भाजपासोबत युती करेल अशीही चर्चा आहे.
-
संघटनात्मक बदल करण्याबरोबरच पक्ष कार्यकर्त्यांसाठी पूर्णवेळ उपलब्ध अध्यक्ष नियुक्त करण्याची मागणी ‘जी-२३’ गटाने केली होती. सोनिया गांधी यांना ऑगस्ट २०२० मध्ये लिहिलेल्या पत्रानंतर बंडखोर गटाचा पक्षांतर्गत संघर्ष सुरू होता.
-
या गटाचे म्होरके असलेले आझाद यांनी काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या अन्य नेत्यांप्रमाणे राहुल गांधींच्या कार्यपद्धतीवर उघड नाराजी व्यक्त करून अखेर पक्षाला सोडचिठ्ठी दिली.
-
‘‘रिमोट कंट्रोल पद्धतीने यूपीए सरकारची विश्वासार्हता संपुष्टात आली होती, आता काँग्रेसमध्येच हा प्रयोग केला जात आहे. सोनिया गांधी या केवळ नामधारी अध्यक्ष असून सर्व निर्णय राहुल गांधी वा त्यांचे सुरक्षारक्षक किंवा खासगी सचिव घेत आहेत,’’ अशी कठोर टीका आझाद यांनी सोनिया गांधींना पाठवलेल्या पाच पानी राजीनामापत्रात केली आहे.
-
राहुल गांधी अधिकृत पक्षाध्यक्ष नसले तरी, त्यांच्या संमतीशिवाय पक्षात कोणतेही निर्णय घेतले जात नसल्याची तक्रार ज्येष्ठ नेते सातत्याने करत आहेत.
-
मात्र या साऱ्या घडामोडी आणि भाजपासोबतच्या चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात आझाद यांना राज्यसभेचा सदस्य म्हणून निरोप देताना भावूक झाल्याचा व्हिडीओ आणि त्यावेळीचं मोदींचं भाषण पुन्हा चर्चेत आलं आहे.
-
या भाषणामध्ये पंतप्रधान मोदींनी आझाद यांच्याबद्दल केलेल्या विधानांकडे आता वेगळ्या अर्थाने पाहिलं जातं असून यामधून युतीचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. मोदी नेमकं काय म्हणाले होते पाहूयात…
-
गुलाम नबी आझाद यांच्यासह राज्यसभेतील चार सदस्यांचा कार्यकाळ १५ फेब्रुवारी २०२१ रोजी संपला. या चारही सदस्यांना ९ फेब्रुवारी रोजी सभागृहात निरोप देण्यात आला.
-
यावेळेस मोदींनी ते स्वत: गुजरातचे आणि गुलाम नबी आझाद हे जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री असतानाचा एक किस्सा सांगितला होता.
-
बोलता बोलता गुलाम नबी आझाद यांचं कौतुक करताना पंतप्रधान मोदी भावूक झाले.
-
दहशतवादी हल्ल्यानंतरची आझाद यांनी केलेल्या मदतीचा अनुभव सांगताना मोदींच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. मोदींनी या भाषणादरम्यान तीन वेळा डोळे पुसले होते.
-
गुजरातचे लोक जेव्हा काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यामुळे अडकले होते तेव्हा गुलाम नबी आझाद आणि प्रणव मुखर्जी यांनी केलेली मदत मी कधीही विसरणार नाही. गुलाम नबी आझादजी मला सतत तेथील माहिती देत होते, असं मोदींनी सांगितलं.
-
आपल्या कुटुंबातील लोकं तिथे अडकल्याप्रमाणे ते काळजी करत होते, असं मोदी म्हणाले होते.
-
हे सांगताना मोदींचा कंठ दाटून आला होता. भावूक झाल्याने आवाज कापत असल्याने मोदी काही क्षण थांबले, पाणी प्यायले आणि पुन्हा बोलू लागले.
-
पद, कार्यभार, सत्ता येते आणि जाते. मात्र हे सर्व कसं संभाळावं हे गुलाम नबी आझाद यांच्याकडून शिकलं पाहिजे, असं मोदी आपल्या भाषणात म्हणाले होते.
-
आपल्या भावना व्यक्त करुन झाल्यानंतर मोदींनी गुलाम नबी आझाद यांच्याकडे बोट दाखवून त्यांना सॅल्यूट ठोकला होता.
-
मोदींनी सलाम केल्यानंतर गुलाम नबी आझाद यांनाही अगदी नम्रपणे नमस्कार करत तो स्वीकारला होता.
-
मोदींनी गुलाम नबी आझाद यांना सॅल्यूट केल्यानंतर सर्वच खासदारांनी बाकं वाजवून मोदींच्या या कृतीचं कौतुक केलं होतं.
-
“मी तेव्हा संसदेतही नव्हतो तेव्हापासून मी गुलाम नबी आझाद यांच्याशी चर्चा करत आलोय. एकदा पत्रकारांनी त्यांना काही प्रश्न विचारला तेव्हा गुलाम नबी आझाद यांनी, आम्हाला नेहमी वादविवाद करताना बघता पण, आम्ही कुटुंबासारखे आहोत, असं उत्तर दिलं होतं,” अशी आठवणही मोदींनी सांगितलेली.
-
“मी तुम्हाला कधी निवृत्त होऊ देणार नाही. मी यापुढेही तुमचे सल्ले घेत राहिलं,” असं मोदी म्हणाले होते.
-
“माझे दरवाजे तुमच्यासाठी कायमच उघडे असतील,” अशा शब्दही मोदींनी गुलाम नबी आझाद यांना दिला होता.
-
आपल्या या विधानामागील कारण देताना मोदींनी, “गुलाम नबी आझाद हे पक्षाबरोबरच देशाची आणि संसदेचीही काळजी करायचे. त्यांनी कायमच देशाला प्राधान्य दिलं,” असंही म्हटलं होतं.
-
त्यांचा प्रेमळ स्वभाव, शांतता आणि जे काही करु दे देशासाठी करु ही इच्छा त्यांना यापुढेही मार्ग दाखवत राहील, असंही मोदींनी म्हटलेलं.
-
आझाद यांनी पक्ष सोडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे आजच (२७ ऑगस्ट २०२२ रोजी) जम्मू-काश्मीरचे माजी युवा काँग्रेस अध्यक्ष अमिन भट यांनी, “गुलाम नबी आझाद जम्मू आणि काश्मीरचे पुढील मुख्यमंत्री असतील” असं विधान केलं आहे.
-
या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अमिन यांनी आझाद यांच्यासोबत नेमकी काय चर्चा झाली याबद्दलची माहिती दिली. आझाद हे नवीन पक्ष स्थापन करणार असून ते भाजपासोबत युती करुन पुढील विधानसभा निवडणूक लढवतील असा एक अंदाज व्यक्त केला जात असतानाच अमिन यांनी आझाद आणि त्यांचे समर्थक हे भाजपाची टीम बी नसल्याचं जाहीरपणे सांगितलं आहे.
-
“आम्ही पुढील वाटचालीसंदर्भात चर्चा चर्चा केली. आम्ही भाजपाची बी टीम नाही,” असं अमिन यांनी म्हटलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आझाद कोणती भूमिका घेतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. अशातच मोदींचं हे जुनं भाषण सध्या राजकीय संदर्भातून आणि जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर चर्चेत आहे.
१२ फेब्रुवारी पंचांग: सौभाग्य योगात ‘या’ राशींना मिळेल कामाची योग्य पावती, तर कोणाची होईल इच्छापूर्ती; तुमच्या पदरी कसे पडणार सुख? वाचा आजचे राशिभविष्य