-
तुम्हाला चंद्रावर न जाता चंद्राच्या भूपृष्ठावर भटकंती केल्याचा अनुभव घ्यायचा असेल तर काही वर्षांमध्ये दुबईत तुम्ही हे नक्कीच करु शकता. नाही नाही दुबईमधील रस्त्यांवरील खड्डे किंवा तिथल्या वाळवंटांबद्दल नाही बोलत आहोत आपण. आपण इथे बोलतोय ‘द मून रिसॉर्ट’बद्दल… (सर्व फोटो Moon World Resorts Inc च्या फेसबुक पेजवरुन साभार)
-
तशी दुबईची वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही. अगदी या जागेला भेट न देणाऱ्यांनाही दुबईची महती आहे. जगातील सर्वात उंच इमारत असणारी बुर्ज खलिफा याच शहरात आहे. त्याप्रमाणे बुर्ज अल अरब सारखे आगळेवेगळे संग्रहालयही पर्यटकांच्या आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे. आता समोर आलेल्या एका वृत्तानुसार दुबईमध्ये आता एक आलिशान रिसॉर्ट उभारण्यात येणार असून हे रिसॉर्ट चंद्राच्या थीमवर आधारीत असणार आहे.
-
या रिसॉर्टचे काही कनसेप्ट बेस फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. ‘तुम्हाला जर भटकंतीची संधी दिली तर तुम्ही कुठे जाल चंद्रावरच ना’ अशा अर्थाची जाहिरातही सध्या सोशल मीडियावरुन केली जात आहे.
-
दुबईमधील हे चंद्रसारखं दिसणारं मून रिसॉर्ट उभारण्यासाठी जवळजवळ ५ बिलियन अमेरिकी डॉलर्स खर्च केले जाणार आहेत. भारतीय चलनामध्ये ही रक्कम तब्बल ४० हजार कोटी इतकी होते.
-
‘अरेबियन बिझनेस’ने दिलेल्या वृत्तानुसार हे रिसॉर्ट उभारण्याचं काम कॅनडामधील ‘मून वर्ल्ड रिसॉर्ट्स इंटरनॅशनल’ ही कंपनी करणार आहे. ही इमारत ७३५ फूट उंच असणार आहे.
-
पुढील चार वर्षांमध्ये ही इमारत बांधून पूर्ण होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या मून रिसॉर्टमध्ये सर्व आधुनिक सोयी सुविधा असतील. यात स्पा सेंटर, नाईट लाइफसाठी विशेष सेक्शन्सही असतील.
-
या रिसॉर्टमधील मुख्य मार्ग हा गोलाकार असणार आहे. या रिसॉर्टमध्ये दरवर्षी २५ लाख पर्यटक भेट देतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पाच हजार लोक एकाच वेळी एखाद्या कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकतील एवढे मोठे सभागृह या मून रिसॉर्टमध्ये असतील असं सांगितलं जात आहे.
-
या रिसॉर्टच्या इमारतीमधील सर्वात वरच्या मजल्यावरील २३ टक्के जागा ही कसिनोसाठी असेल. नऊ टक्के जागा ही नाईटक्लब्ससाठी तर हॉटेल्ससाठी ४ टक्के जागा राखीव ठेवली जाणार आहे.
-
या रिसॉर्टच्या गच्चीचा एक तृतियांश भाग हा बीच क्लबसाठी वापरला जाणार आहे. उतरेला एक तृतीयांश भाग हा लगूनसाठी आणि चार टक्के भागावर अॅम्पीथेअटर बांधलं जाणार आहे.
-
संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएईमधील पर्यटनाला सध्या सुगीचे दिवस आहेत. त्यामध्ये या ‘द मून रिसॉर्ट’मुळे भर पडणार आहे.
-
गॅलेक्सी स्टार डीजे या नावाने उडत्या तबडीच्या आकाराशी साधर्म्य असणारं डिस्को थेअटर या रिसॉर्टमध्ये असणार आहे. या रिसॉर्टसंदर्भात बोलताना शेख मोहम्मद यांनी दुबईमधील पर्यटनाची सविस्तर माहिती दिली. “आमच्या देशातील पर्यटनासंदर्भातील आर्थिक उलाढालीने २०२२ च्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये १९ बिलीयन द्राम्सचा (५.२ बिलियन अमेरिकन डॉलर्सचा) टप्पा ओलांडला आहे,” असं सांगितल्याचं डब्लूएएम या वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.
-
“हॉटेलमधील पाहुण्यांची संख्या एक कोटी २० लाखांहून अधिक असून ही वाढ ४२ टक्के इतकी आहे. हिवाळ्यामध्येही मोठ्या संख्येने पर्यटक येतील असा अंदाज आहे,” असं शेख मोहम्मद म्हणाले आहेत. नव्या ‘द मून रिसॉर्ट’मुळे अधिक पर्यटक दुबईला भेट देतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
-
या मून रिसॉर्टच्या सह-संस्थापकांपैकी एक असणाऱ्या मायकल आर हेंडरसन यांनी पर्यटकांची संख्या या मून रिसॉर्टमुळे नक्कीच वाढेल असा विश्वास व्यक्त केला आहे. मून हायपर स्पीड शटल आणि चंद्रावर असल्याचा अनुभव देणाऱ्या अनेक गोष्टी या रिसॉर्टमध्ये असतील.
-
अगदी लूनार कॉलिनीसारखी अनोखी संकल्पनाही या रिसॉर्टमध्ये पहायला मिळणार आहे. “या मून रिसॉर्टमुळे देशातील सेवा क्षेत्र, मनोरंजन, पर्यटन, शिक्षण, तंत्रज्ञान, पर्यावर आणि अवकाश पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये हातभार लागणार आहे,” असं हेंडरसन म्हणाले आहेत.
-
सोशल मीडियावरही आतापासूनच या रिसॉर्टची चर्चा असल्याचं चित्र पहायला मिळत आहे.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”