-
भारतात जेवढे महापुरुष झालेत, त्या सर्वांवर काही ना काही वाद उद्भवत असतात. सध्या छत्रपती संभाजी महाराज, सावरकर यांच्याबाबत चाललेले वाद सर्वश्रुत आहेत. पण महिलांना शिक्षणाची दारं उघडणाऱ्या सावित्रीमाई फुले यांच्याबाबत कधीही वाद होत नाहीत किंबहुना असल्या वादाच्याही कित्येक पुढे जाऊन त्यांनी त्याकाळात काम केलेले आहे.
-
महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी पावणे दोनशे वर्षांपुर्वी जे कार्य केले, ते काळाच्याही पुढे होते. या दाम्पत्याने त्या काळात दाखवलेली हिंमत, घेतलेली भूमिका आणि त्यासाठी केलेला त्याग आजही कुणी करु शकत नाही. त्यासाठी या दोघाही महापुरुषांना मनापासून वंदन केलेच पाहीजे.
-
भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची आज जयंती. सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे ३ जानेवारी १८३१ रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. जोतीराव फुले यांच्याशी लहान वयात विवाह झाल्यानंतर दोघांनी मिळून १८४८ साली मुलींची पहिली शाळा सुरु केली.
-
शिक्षण प्रसाराचे कार्य म्हणावे तितके सोपे नव्हते. त्याकाळी ते मोठे पातकच होतं. मुलींना शिकवण्यासाठी शाळेत जात असताना त्यांना लोकांनी दगडं फेकून मारली होती. तरिही न डगडगता, सरधोपट मार्ग सोडून एका कठीण मार्गावर चालण्याचं काम सावित्रीबाईंनी केलं.
-
शिक्षण प्रसाराच्या कामात त्यांना अनेक सहकारी लाभले. त्यापैकीच एक होत्या फातिमा शेख.
-
सावित्रीबाईंच्या कार्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरही अनेकदा घेतली गेली आहे. ३ जानेवारी, २०१७ रोजी सावित्रीबाई फुले यांच्या १८६ व्या जयंतीनिमीत्त त्यांचे गूगल डूडल प्रसिद्ध करुन गूगलने त्यांना अभिवादन केले होते.
-
शिक्षण मिळाल्यानंतर सावित्रीबाईंनी अभ्यासाच्या जोरावर आपले व्यक्तिमत्व घडविले होते. जोतीरावांच्या प्रत्येक कार्यात सहभाग घेत असताना त्यांनी स्वतः पुस्तके प्रकाशित केली होती. काव्यफुले (काव्यसंग्रह), सावित्रीबाईंची गाणी (१८९१), सुबोध रत्नाकर, बावनकशी ही त्यांची चार पुस्तके आहेत. पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देऊन एकप्रकारे त्यांच्या कार्याचा सन्मानच झाला आहे.
-
केवळ शैक्षणिक, सामाजिक कार्यात सहभाग घेऊनच त्या थांबल्या नाहीत. जोतीरावांचे निधन झाल्यानंतर सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाज संघटनेचीही जबाबदारी उचलली. संघटनेच्या माध्यमातून राज्यभर चळवळ पसरविण्यासाठी त्यांनी लक्ष घातले.
-
इ.स. १८९६-९७ दरम्यान पुणे व परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजला. यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. त्यातून १० मार्च १८९७ रोजी त्यांचे निधन झाले.

‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…