-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आलं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. मागच्या दहा वर्षांपासून नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. बिगर काँग्रेसी नेत्यांपैकी दहावेळा देशाला लाल किल्ल्यांवरुन संबोधन करणारे नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. (सर्व फोटो सौजन्य-ANI)
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुरुवातीला आपल्या राष्ट्रीय ध्वजाला वंदन केलं. त्यानंतर ध्वजरोहण केलं.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने लाल किल्ल्यावर आयोजित सोहळ्यात जनतेला संबोधताना सविस्तर भाषण केलं. यावेळी मोदींनी त्यांच्या सरकारच्या १० वर्षांच्या कार्यकाळात कोणत्या योजना राबवल्या, त्याचा फायदा जनतेला कशा प्रकारे झाला आणि देशाची अर्थव्यवस्था दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर कशी आली याविषयी उल्लेख केले.
-
आम्ही जेव्हा २०१४ मध्ये सत्तेत आलो, तेव्हा आपण जगात दहावी अर्थव्यवस्था होतो. आज आपण जगात पाचव्या स्थानी पोहोचलो आहोत. जेव्हा भ्रष्टाचाराचा राक्षस देशाच्या मानगुटीवर बसला होता, लाखो कोटींचे घोटाळे अर्थव्यवस्थेला हादरे देत होते, प्रशासकीय दिरंगाई देशाची ओळख झाली होती. आम्ही अर्थव्यवस्था सक्षम केली. गरीबांसाठी चांगल्या योजना आणल्या”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले
-
नरेंद्र मोदींनी आधीच्या केंद्र सरकारशी त्यांच्या कार्यकाळाची तुलना केली. “मी १० वर्षांचा हिशेब तिरंग्याच्या साक्षीनं देतोय. एवढा मोठा बदल इथे १० वर्षांत झाला. १० वर्षांपूर्वी राज्यांना ३० लाख कोटी भारत सरकारकडून दिले जात होते. गेल्या ९ वर्षांत १०० लाख कोटींपर्यंत पोहोचला आहे. आधी स्थानिक विकासासाठी भारत सरकारकडून ७० हजार कोटी जात होते. आज तो आकडा ३ लाख कोटींहून जास्त झाला आहे. आधी गरीबांची घरं बनवण्यासाठी ९० हजार कोटी खर्च होत होते. आज तो चारपट वाढून ४ लाख कोटींहून जास्त झाला आहे. असंही मोदींनी म्हटलं आहे.
-
मागील काही आठवड्यांमध्ये ईशान्य भारतात विशेष करून मणिपूरमध्ये आणि हिंदुस्थानच्या इतरही काही भागात हिंसाचार झाला. त्यात अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. आई-बहिणींच्या सन्मानाला धक्का लावण्यात आला. मात्र, काही दिवसांपासून सातत्याने तेथे शांतता प्रस्थापित झाल्याची बातमी येत आहे. देश मणिपूरमधील नागरिकांबरोबर आहे. असंही मोदींनी म्हटलं आहे.
-
“मणिपूरमधील लोकांनी मागील काही दिवसांपासून शांतता प्रस्थापित केली आहे. त्यांनी हे शांततेचं पर्व पुढे न्यावं. शांततेतूनच या प्रश्नावर मार्ग निघेल. राज्य आणि केंद्र सरकार त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी भरपूर प्रयत्न करत आहे आणि करत राहील,” असं मोदींनी म्हटलं.
-
आपल्या भाषणात मोदींनी महिला बचत गटांविषयी बोलताना देशाच्या गावांमध्ये २ कोटी लक्षाधीश महिला तयार करण्याचं स्वप्न असल्याचं सांगितलं. “आज १० कोटी महिला महिला बचत गटांशी जोडल्या गेल्या आहेत. तुम्ही गावात गेलात तर तुम्हाला बँकवाली दीदी भेटेल, अंगणवाडीची दीदी भेटेल, औषध देणारी दीदी भेटेल. माझं स्वप्न आहे देशात दोन कोटी लखपती दीदी बनवण्याचं”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
-
ग्रामीण भागांत लक्षाधीश महिला तयार करण्यासाठी नरेंद्र मोदींनी ड्रोन योजना राबवणार असल्याचं सांगितलं. “शेती क्षेत्रात तंत्रज्ञान यावं यासाठी महिला बचत गटाच्या सदस्यांना आम्ही ड्रोन चालवण्याचं, दुरुस्त करण्याचं प्रशिक्षण देणार आहोत. अशा हजारो महिलांना भारत सरकार ड्रोन देईल. त्याची सुरुवात आम्ही १५ हजार महिला बचत गटांच्या माध्यमातून करणार आहोत”, असंही मोदींनी लाल किल्ल्यावरून जाहीर केलं.
-
“मी एका देशाचा दौरा करत होतो. तिथल्या एका फार ज्येष्ठ मंत्र्यांनी मला एक प्रश्न विचारला. त्यांनी विचारलं ‘तुमच्याकडे मुली विज्ञान आणि इंजिनिअरिंगच्या विषयांचा अभ्यास करतात का?’ मी त्यांना म्हटलं आज माझ्या देशात मुलांपेक्षा जास्त मुली विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणिताच्या शिक्षणात सहभागी होतात. तर त्यांच्यासाठी ती आश्चर्याची बाब होती. हे सामर्थ्य आज माझ्या देशाचं आहे”, असं मोदी यावेळी म्हणाले.

घटस्फोटानंतर अडीच महिन्यांनी मराठमोळ्या अभिनेत्रीच्या पूर्वाश्रमीच्या पतीचे निधन, म्हणाली, “मला थोडा…”