-
इंटरनेटवर किंवा सोशल मीडियावर एकदा काही व्हायरल झाले तर ते किती प्रमाणात व्हायरल होईल याचा अंदाज आपल्याला येणं कठीण होऊन जाते.
-
जगाच्या कोणत्याही देशातून त्या देशाच्या कुठल्यातरी एका छोट्याश्या भागातून एखादा व्हिडीओ, एखादी छोटीशी रील संपूर्ण जगात काही क्षणात पोहचते आणि त्या काँटेंटमधील काही ना काही लोकांना कोणत्याही कारणानं आवडायला लागतं. मग सुरु होतं ते मोठ्या प्रमाणावर शेअरिंग आणि त्यातूनच व्हायरल हा प्रकार घडत असतो.
-
असाच प्रकार घडला आहे तो बदो-बदी या गाण्याबद्दल. या गाण्याला लोकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. जर तुम्ही इंस्टाग्राम रील्स पाहत असाल, तर स्क्रोल करताना तुम्हाला हा चेहरा पाहायला मिळालाच असेल. हे आहेत पाकिस्तानी गायक चाहत फतेह अली खान. सद्या त्यांचं ‘बदो बदी’ हे गाणं लोकांच्या खूपच पसंतीस उतरलं आहे. चाहत फतेह अली खान हे त्यांच्या मजेशीर स्टाईलमध्ये गाणं गाण्यांच्या व्हिडीओसाठी ओळखले जातात. नुकतचं त्यांचं ‘आय हाये ओय होय बदो बदी’ हे गाणं प्रदर्शित झालं आणि या गाण्याने सोशल मीडियावर जोरदार लोकप्रियता मिळवली.
-
मुळात चाहत यांचं हे गाणं जुन्या गाण्याचं नव्याने डब केलेलं व्हर्जन आहे. ‘बनारसी ठग’ या १९६५ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील हे गाणं नूर जेहान या पाकिस्तानी गायिकेने गायलेलं आहे. चाहत यांचं हे गाणं एप्रिल महिन्यात युट्युबवर रिलीज झालं. या गाण्यात स्वतः खान आणि वजधन राव रणघार ही सहकलाकार दिसत आहे. या गाण्याला आत्तापर्यंत तब्बल २ कोटी ३० लाख लोकांनी पाहिलंय.
-
हे गाणं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे. या गाण्यातील मजेशीर संगीत आणि चाहत यांचा वेगळा आवाज, तसेच त्यांनी या गाण्याच्या व्हिडीओमध्ये सहकलाकार रणघारसह केलेला अभिनय, हे सर्व प्रेक्षकांना खूपच भन्नाट वाटत असल्याच्या प्रतिक्रिया लोक कमेंट करून देत आहेत.
-
दरम्यान, रणघारनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत धक्कादायक वक्तव्य केलं आहे, तिनं सांगितलं की या गाण्याने तिचे करिअर उद्ध्वस्त केले आहे.
-
“माझ्या दुर्दैवाने मी या गाण्यासाठी काम करायला होकार दिला. लोक मला प्रचंड प्रमाणात ट्रोल करत आहेत. मला प्रश्न विचारत आहेत की मी या गाण्यात काम का केलं? माझ्याकडे ईदसाठी कपडे घेण्यासाठी पैसे नसल्याने, कुठे चोरी करण्यापेक्षा हे काम करणे कधीही चांगले आहे, असा विचार करून मी काम केले.” असं तिने म्हटलंय.
-
चाहत फतेह अलीखान कोण आहेत?
काशिफ राणा असे चाहत यांचे मूळ नाव आहे. त्यांच्या मजेशीर गाण्यांना मिळत असलेल्या प्रतिसादामुळे त्यांनी सोशल मीडियावर चाहत फतेह अली खान या नावानं खाती बनवली आहेत. ते ५६ वर्षीय आहेत. २०२० मध्ये कोरोना काळात त्यांना वेळ मिळाला आणि त्यांनी छोटे छोटे व्हिडीओ बनवायला सुरवात केली. त्यांच्या या व्हिडीओंना प्रतिसादही मिळाला. त्यांना विविध कार्यक्रम मिळायला लागले. मिम फेस्टिवलमध्ये त्यांच्या गाण्यांना खूप प्रतिसाद मिळायला लागला. जानी कि शाह, पब्लिक डिमांड विथ मोहसीन अब्बास हैदर, ऑनेस्ट हावर पॉडकास्ट अशा अनेक टॉक शोमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे. -
बदो बदी या शब्दाचा अर्थ काय?
गाणं व्हायरल झाल्यांनतर अनेकांना प्रश्न पडला आहे की या शब्दाचा अर्थ तरी काय? याबद्दल प्रेक्षकांनी खुद्द चाहत यांनाच याबद्दल विचारले आहे. विविध कमेंट करत, बदो बदी म्हणजे काय? याच उत्तर द्या, असं लोक विचारत आहेत. तर काही लोक या प्रश्नाच उत्तरही देत आहेत. एका युजरच्या मते ‘बदो बदी’ म्हणजे ‘बळजबरी’, तर दुसर्या युजरने सांगितलं बदो बदी म्हणजे ‘हळू हळू’, आणखी एकाने या शब्दाचा अर्थ ‘खूप मोठा’ असा सांगितला आहे. -
याआधीही आपण ‘काचा बदाम’, ‘जाना मेरी जानेमन बचपन का प्यार’ या गाण्यांबाबत व्हायरल प्रकार झाल्याचे पाहिले आहेत. या ही गाण्यांना लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता, सर्वांच्या तोंडी ही गाणी सहज यायची. या गाण्यांवर रील्स आणि शॉर्ट्स मोठ्या प्रमाणावर बनवले जात होते. (सर्व फोटो साभार – chahat fateh ali khan/Instagram Page)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”