लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : महाविकास आघाडीत जागावाटपाच्या वाटाघाटी करण्याकरिता काँग्रेसने १० नेत्यांचा समावेश असलेली समिती स्थापन केली आहे. राज्य आणि मुंबईतील जागावाटपाची चर्चा करण्याची जबाबदारी या समितीमधील नेत्यांवर असेल.

महाविकास आघाडीत जागावाटप हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाने आधीच अधिक जागा लढविण्याचे सुतोवाच केले आहे. शिवसेना ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला नमविले होते. सांगलीची काँग्रेसची हक्काची जागा ठाकरे गटाने जबरदस्तीने मिळविली होती. या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याचे काँग्रेसपुढे आव्हान आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक १३ जागा मिळाल्याने विधानसभेत जास्त जागा मिळाल्या पाहिजेत, अशी काँग्रेस नेत्यांची अपेक्षा आहे.

महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, शेकाप, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पार्टी या पक्षांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या यशाने सर्वच मित्र पक्षांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने १२ जागांवर दावा केला आहे. समाजवादी पार्टीला ३५ जागा हव्या आहेत. याशिवाय अन्य काही छोट्या पक्षांना जागा हव्या आहेत. काँग्रेसला किमान १०० जागा मिळाव्यात, अशी प्राथमिक चर्चा झाली आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशी वाटाघाटी करताना अधिक जागा पदरात पाडून घेण्याचे या १० जणांच्या समितीसमोर मोठे आव्हान असेल.

हेही वाचा >>>“उत्तर बंगालमधील जिल्हे मिळून स्वतंत्र राज्य करा”; भाजपा नेत्यांच्या मागणीमागे काय आहे राजकारण?

समितीत कोण?

● महाविकास आघाडीत शिवसेना आणि राष्ट्रवादीबरोबर चर्चा करण्याकरिता प्रदेश पातळीवर सात तर मुंबईसाठी तिघांची समिती नियुक्त करण्यात आली आहे.

● प्रदेश पातळीवरील समितीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील पक्षनेते सतेज पाटील, माजी मंत्री नितीन राऊत आणि नसिम खान या नेत्यांचा समावेश आहे.

● मुंबईतील ३६ मतदारसंघांसाठी जागावाटपावर चर्चा करण्यासाठी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड, आमदार भाई जगताप व अस्लम शेख या तिघांचा समितीत समावेश करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 10 member congress committee for seat sharing negotiations for legislative assembly 2024 amy
Show comments