समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी महाकुंभ मेळ्यासंदर्भात योगी सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. प्रयागराज येथील महाकुंभात गेलेल्या भाविकांपैकी हजारांहून अधिक भाविक अद्याप बेपत्ता असल्याचा दावा अखिलेश यादव यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत बोलताना या लोकांचा शोध घेण्याबाबत बोलणं गरजेचं होतं, असंही ते यावेळी म्हणाले.

दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधानांनी लोकसभेत महाकुंभाबाबत वक्तव्य केले होते. “महाकुंभाचे यश हे सरकार आणि असंख्य लोकांच्या योगदानाची ही परिणती आहे”, असे मोदींनी म्हटले होते. भारतात एवढ्या मोठ्या प्रमाणात महाकुंभाचे आयोजन करण्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना उत्तर देताना मोदी बोलत होते. त्यावर त्यांनी महाकुंभाने देशातील एकतेची भावना बळकट केल्याचे सांगितले.

लोकसभेत बोलताना अखिलेश यांनी भारत सरकारने महाकुंभासाठी किती आर्थिक तरतूद केली होती याबाबत प्रश्न विचारला. याविषयी बोलताना ते म्हणाले, “मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री हे महाकुंभावेळी केवळ वाहनं पार्क कुठे करायची याबाबत निर्णय घेत होते. तिथे असे अनेक आयपीएस अधिकारी होते, जे लोकांना स्नानासाठी जाण्यापासून अडवत होते. कारण- त्यांच्याकडे सुविधा पुरवण्याइतकी क्षमता नव्हती”.

“प्रयागराजच्या सीमेवर लोकांना अडवलं जात होतं. केंद्रानं महाकुंभासाठी राज्य सरकारला किती निधी दिला होता ते नमूद करायला हवं. यामध्ये सर्वांत जास्त जीवितहानी हिंदू भाविकांची झालेली आहे”, असेही अखिलेश यावेळी म्हणाले.

“भाजपा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ज्या ज्या लोकांनी महाकुंभात आपल्या कुटुंबीयांना गमावलं होतं त्या सर्वांना मदत करावी”, असे वक्तव्य उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्र्‍यांनी केलं.

“अजूनही कुंभ मेळ्यातून बेपत्ता असलेल्या भाविकांचा शोध लागलेला नाही, त्यांच्याबाबत माहिती द्यावी”, असेही यादव यावेळी म्हणाले.

सरकारने या बेपत्ता लोकांना शोधण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांची मदत करावी. लोक त्यांच्या कुटुंबीयांचे पोस्टर्स लावतात आणि सरकार ते काढून टाकत आहेत, असा आरोपही यादव यांनी सरकारवर केला.

“आम्ही सुमारे दीड महिना भारतात महाकुंभाचा उत्साह पाहिला. ज्या पद्धतीने लाखो भाविक सोयीसुविधांची पर्वा न करता, भक्तिभावाने एकत्र आले, हेच आमचे सर्वांत मोठे सामर्थ्य आहे. महाकुंभ हा असा कार्यक्रम होता, ज्यामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक एकत्र आले. अहंकार बाजूला सारत मीपणाच्या भावनेनं नाही तर आपण या भावनेनं ते एकत्र आले”, असे महाकुंभाबाबत मोदी यांनी म्हटले होते.

रोजगारासंदर्भातही टीका

याव्यतिरिक्त अखिलेश यांनी तरुणांच्या रोजगाराच्या मुद्द्यावरूनही मोदींवर आगपाखड केली. महाकुंभादरम्यान मोटारसायकली चालवून भाविकांना मदत करणाऱ्या चार लाख तरुणांना रोजगार मिळाला. मात्र, त्यानंतर १४४ वर्षांनंतर पुन्हा त्यांना रोजगार मिळणार आहे का, असा प्रश्न त्यांनी यावेळी विचारला.

Story img Loader