उत्तर प्रदेशमध्ये २७ फेब्रुवारी रोजी राज्यसभेच्या १० रिक्त जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपा आणि समाजावादी पक्षाकडे आमदारांची पुरेशी संख्या आहे. त्यानुसार, भाजपा सात, तर समाजवादी पक्ष तीन उमेदवार निवडून आणू शकतात. मात्र, भाजपाकडून आठवा उमेदवार उभा करण्यात आल्याने १०व्या जागेसाठी होणारी निवडणूक रंजक होण्याची शक्यता आहे.
गुरुवारी भाजपाचे संजय सेठ यांनी राज्यसभेसाठी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर केला. सेठ हे २०१६ मध्ये समाजवादी पक्षाचे खासदार म्हणून राज्यसभेवर निवडून आले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. याशिवाय भाजपाकडून माजी केंद्रीय मंत्री आरपीएन सिंग, माजी खासदार चौधरी तेजवीर सिंग, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस अमरपाल मौर्य, माजी राज्यमंत्री संगीता बळवंत, भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, माजी आमदार साधना सिंह आणि आग्राचे माजी महापौर नवीन जैन यांनीही उमेदावारी अर्ज दाखल केले आहेत.
याशिवाय समाजवादी पक्षाकडून ज्येष्ठ नेत्या आणि अभिनेत्री जया बच्चन, दलित नेते रामजी लाल सुमन आणि राज्याचे माजी मुख्य सचिव आलोक रंजन यांनी उमेदावारी अर्ज दाखल केला आहे. जर भाजपाने या निवडणुकीसाठी आपला आठवा उमेदवार उभा केला नसता, तर ही निवडणूक बिनविरोध झाली असती. मात्र, भाजपाने आठवा उमेदवार दिल्याने १० जागांसाठी आता ११ उमेदवार रिंगणात आहेत.
हेही वाचा – भाजपचा ‘माधव’ सूत्राबरोबर लिंगायत मतपेढीला आकार देण्यावर भर
आकडेवारी काय सांगते?
उत्तर प्रदेश विधानसभेची सदस्य संख्या ४०३ इतकी आहे. त्यापैकी चार जागा रिक्त आहेत. त्यामुळे विधानसभेची एकूण सदस्यसंख्या ३९९ इतकी आहे. त्यानुसार प्रत्येक उमेदवाराला जिंकण्यासाठी ३७ मतांची आवश्यक आहे. अशावेळी भाजपाकडे २५२ आमदार आहेत. तर त्यांच्या मित्रपक्षाकडे एकूण ३४ आमदार आहेत. यामध्ये अपना दलचे (सोनेलाल गट) १३, राष्ट्रीय लोकदलचे ९, निशाद पक्ष आणि सुहेलदेव भारतीय समाज पक्ष यांच्या प्रत्येकी ६ आमदारांचा समावेश आहे. याशिवाय राजा भैय्या यांच्या नेतृत्वाखालील जनसत्ता दल लोकतांत्रिकचे दोन आमदारही भाजपाच्या बाजुने मतदान करण्याची शक्यता आहे.
जर भाजपाला ही ३६ आमदारांची मते मिळवण्यात यश मिळाले. तर त्यांच्याकडे असलेल्या आमदारांची संख्या २८८ इतकी होईल. मात्र, तरीही त्यांना आपला आठवा उमेदवार निवडून आणण्यासाठी आठ मते कमी पडतील. कारण आठवा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपाला एकूण २९६ मतांची आवश्यक असेल.
याबरोबरच समाजवादी पक्षाला आपले तीन उमेदवार निवडून आणण्यासाठी १११ मतांची आवश्यकता आहे. अशावेळी काँग्रेसच्या दोन आमदारांनी समाजवादी पक्षाच्या उमेदवाराला मतदान केले, तरीही समाजावादी पक्षाला केवळ ११० मतं मिळू शकतात. त्यांना तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी आणखी एक मताची आवश्यकता असेल.
हेही वाचा – यूपीमध्ये भाजपा नेते संजय सेठ रिंगणात उतरल्याने राज्यसभा निवडणूक रंजक ठरणार; कोण आहेत संजय सेठ?
अशातच समाजवादी पक्षाच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण अपना दल (कामेरवाडी) गटाच्या आमदार पल्लवी पटेल यांनी अखिलेश यादव दलित, अल्पसंख्याक, आणि इतर मागासवर्गीकडे यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत या निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. अशावेळी या निवडणुकीत क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या आधी होणाऱ्या या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी बघायला मिळू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.