मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क मैदानावर सभा घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडे राजकीय पक्षांचे तब्बल १२ अर्ज आले आहेत. शिवसेनेचे दोन्ही गट, भाजप, मनसे या प्रमुख पक्षांचे वेगवेगळ्या तारखांचे अर्ज यात आहेत. तर निवडणुकीचा प्रचार संपण्याच्या आदल्या दिवशी १७ नोव्हेंबर रोजी सभा घेण्यासाठी चारही पक्षांचे अर्ज आले असून या दिवसासाठी चार पक्षांमध्ये चुरस आहे.

विधानसभेच्या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मुंबईत मतदान होणार आहे. मतदानाला एक महिना उरला असून मुंबईत राजकीय वातावरण तापले आहे. येत्या काही दिवसांत मुंबईत राजकीय पक्षांतील मोठ्या नेत्यांच्या राजकीय सभांचा धुरळा उडणार आहे हे निश्चित. सभांच्या आयोजनासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे यासाठी राजकीय पक्षांनी मुंबई महापालिकेकडे अर्ज केले आहेत. त्यातही १७ नोव्हेंबर या दिवशी सभा घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह अन्य तीन राजकीय पक्षांनीही अर्ज केले आहेत. त्यामुळे या दिवशी सभा घेण्यासाठी कोणाला परवानगी देणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. ज्या पक्षांचे अर्ज आले आहेत त्यांच्या निवेदनासह परवानगीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार असून नगर विकास विभागच त्यावर निर्णय घेईल, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा >>>विधान परिषदेच्या पाच माजी आमदारांना विधानसभेचे वेध, वेगवेगळ्या पक्षांकडून तयारी सुरू

शिवाजी पार्क मैदान आणि राजकीय सभा यांचे जुने नाते आहे. त्यातही शिवसेनेशी हे नाते अधिक जोडलेले आहे. मात्र शिवसेनेची दोन शकले झाल्यानंतर शिवाजी पार्क मैदानावर सभा घेता यावी याकरिता शिवसेनेच्या दोन गटांमध्ये आणि अन्य राजकीय पक्षांमध्ये चुरस वाढली आहे. दादरचे शिवाजी पार्क मैदान प्रचार सभेकरिता मिळावे म्हणून सर्वच महत्त्वाच्या राजकीय पक्षांनी मुंबई महापालिकेकडे अर्ज केले आहेत. एकेका पक्षाचे दोन अर्ज, वेगवेगळ्या दिवसासाठीचे अर्ज असे मिळून सुमारे १२ ते १३ अर्ज पालिकेच्या जी उत्तर विभाग कार्यालयाकडे आले आहेत. शिवसेना (एकनाथ शिंदे), भाजप, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना (उद्धव ठाकरे) या प्रमुख पक्षांचा त्यात समावेश आहे. १८ नोव्हेंबर रोजी प्रचाराची सांगता होणार आहे. त्यामुळे आदल्या दिवशी १७ नोव्हेंबरला मैदान सभेसाठी मिळावे याकरिता चार पक्षांचे अर्ज आले आहेत.