विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राहुल नार्वेकर यांनी पहिल्याच दिवशी एकनाथ शिंदे हेच शिवसेना विधिमंडळ पक्षाचे गटनेते आहेत आणि भरत गोगावले हे मुख्य प्रतोद आहेत असा निर्वाळा देत शिवसेनेला झटका दिला आहे. विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयामुळे सोमवारी विधानसभेत होणाऱ्या बहुमत चाचणीच्या वेळी आदित्य ठाकरेंसह शिवसेनेच्या १६ आमदारांवर शिंदे गटाचा पक्षादेश लागू होणार की शिवसेनेचा यावरून दोन्ही गटात मोठा संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर त्यांच्याऐवजी शिवसेना आमदार अजय चौधरी यांची शिवसेना विधिमंडळ पक्ष गटनेतेपदी निवड झाल्याचे पत्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यानंतर त्यावेळी महाराष्ट्राबाहेर असलेल्या एकनाथ शिंदे गटाने शिंदे हेच शिवसेना विधिमंडळ पक्षाचे गटनेते आहेत आणि मुख्य प्रतोदपदी भरत गोगावले यांची निवड केल्याचे पत्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पाठवले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने रविवारी भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड केली.

या निवडणुकीवेळी शिवसेनेचे गटनेते म्हणून अजय चौधरी यांची तर मुख्य प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांची नियुक्ती विधिमंडळ सचिवालयात नोंदवलेली होती. त्याचाच आधार घेत शिंदे गटातील ३९ आमदारांनी शिवसेनेच्या पक्षादेशाचा भंग करून भाजपच्या उमेदवाराला मतदान केल्याने त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होईल असा इशारा सुनील प्रभू यांनी आपल्या भाषणात दिला होता. त्यानंतर शिंदे गटाने पत्र देत शिवसेनेच्या १६ आमदारांनी आमच्यापेक्षा देशाचा भंग केल्याची उलटी तक्रार केली होती. मात्र तोवर विधिमंडळ सचिवालयाच्या नोंदीत सुनील प्रभू हेच शिवसेनेचे मुख्य प्रतोद असल्याने शिंदे गटाचा पक्षादेश लागू होईल की नाही यावरून दावे-प्रतिदावे केले जात होते. या पार्श्वभूमीवर निवड झाल्यानंतर पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी अजय चौधरी यांची शिवसेना गटनेते पदी आणि सुनील प्रभू यांची मुख्य प्रतोदपदी नियुक्ती रद्द केली. तसेच एकनाथ शिंदे हेच शिवसेना विधिमंडळ पक्षाचे गटनेते आहेत आणि भरत गोगावले हे मुख्य प्रतोद आहेत यास मान्यता दिली.

विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्या या निर्णयामुळे आता विधिमंडळ सचिवालयाच्या लेखी एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे गटनेते तर भरत गोगावले हे मुख्य प्रतोद असल्याची नोंद झाली आहे. तसे पत्र विधिमंडळ सचिवालयाने रविवारी रात्री शिंदे गटाला दिले. त्यामुळे आता सोमवारी विधानसभेत होत असलेल्या शिंदे फडणवीस सरकारच्या बहुमत चाचणी वेळी आदित्य ठाकरेंसह शिवसेनेचे १६ आमदार शिंदे गटाच्या पक्षादेशाच्या कचाट्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आदित्य ठाकरेंसह शिवसेनेच्या सोळा आमदारांनी बहुमत चाचणी वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने मतदान न केल्यास शिंदे गट विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडेच या १६ आमदारांना अपात्र ठरवण्याची कारवाई करण्याची मागणी करण्याची शक्यता आहे. त्यातून शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले शिवसेनेतील १६ आमदार यांच्यात राजकीय आणि कायदेशीर संघर्ष उडण्याची चिन्हे आहेत.‌

Story img Loader