अठराव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन आजपासून (२४ जून) सुरू होत आहे. या नव्या लोकसभेमध्ये प्राध्यापक, डॉक्टर, अभिनेते, क्रिकेटपटू या आणि अशा अनेक क्षेत्रांमध्ये कार्यरत असणारे सदस्य असणार आहेत. विशेष म्हणजे पहिल्यांदाच लोकसभेची पायरी चढणारेही विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. १७ व्या आणि १८ व्या अशा दोन्ही लोकसभेचे विश्लेषण केल्यास शेती, सामाजिक काम आणि उद्योग-व्यवसायांत कार्यरत असणाऱ्या सदस्यांचीच संख्या इतरांहून अधिक आहे. मात्र, १७ व्या लोकसभेशी तुलना करता, सामाजिक कार्यकर्ता, शेतकरी व उद्योजक असल्याचे घोषित करणाऱ्या सदस्यांची संख्या यंदाच्या लोकसभेमध्ये थोडी घटली आहे. अनेक सदस्यांनी आपण वेगवेगळ्या क्षेत्रांत कार्यरत असल्याचेही घोषित केले आहे. १७ व्या लोकसभेमध्ये ५५९; तर १८ व्या लोकसभेमध्ये ५४२ खासदार निवडून गेले आहेत. राहुल गांधी यांनी वायनाड व रायबरेली अशा दोन्ही मतदारसंघांतून निवडणूक जिंकली असल्याने त्याबाबतचा निर्णय अद्याप व्हायचा आहे. त्यांनी रायबरेलीची जागा राखून ठेवली असून वायनाड मतदारसंघ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या ठिकाणची पोटनिवडणूक अद्याप व्हायची आहे. भारत हा कृषिप्रधान देश असल्याने शेती व्यवसाय करणारे बरेचसे लोकप्रतिनिधी संसदेत आल्याचे दिसतात. एकूण सभागृहाच्या ३३ टक्के म्हणजेच १७९ खासदार या क्षेत्राशी संबंधित आहेत. मात्र, मागील लोकसभेच्या तुलनेत या क्षेत्राशी संबंधित सदस्यांची संख्या आठ टक्क्यांनी घटली आहे. १७ व्या लोकसभेमध्ये २३० खासदार (४१.१४ टक्के) शेतीशी सबंधित व्यवसायांमध्ये होते. सर्वाधिक खासदार असणाऱ्या पाच प्रमुख पक्षांपैकी भाजपाचे २४० पैकी ७९ खासदार शेती व्यवसायामध्ये आहेत. त्यानंतर काँग्रेसचे ९९ पैकी २९ खासदार, समाजवादी पार्टीचे ३७ पैकी २३ खासदार, तृणमूल काँग्रेसचे २९ पैकी दोन खासदार, तर द्रविड मुन्नेत्र कळघमचे २२ पैकी नऊ खासदार शेती व्यवसायात आहेत.

हेही वाचा : नव्या लोकसभेचे पहिलेच अधिवेशन गाजणार या मुद्द्यांवरुन; विरोधकांनी अशी केली आहे तयारी

Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
murder of Satish Wagh, Satish Wagh, dispute,
सतीश वाघ यांची हत्या जुन्या वादातून, पाच लाखांची दिली होती सुपारी – पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार
Navneet Rana, Navneet Rana on EVM issue,
‘राजीनामा देण्‍यास तयार, पण…’; नवनीत राणांचे आव्‍हान खासदार वानखडेंनी स्‍वीकारले
56 year old police officer vishnu tamhane won iron man competition in australia
कौतुकास्पद : ५६ व्या वर्षी विष्णु ताम्हाणे या पोलिस अधिकाऱ्याने ऑस्ट्रेलियातील आयर्न मॅन स्पर्धा जिंकली
balrangbhumi sammelan pune
पहिले बालरंगभूमी संमेलन पुण्यात, संमेलनाच्या अध्यक्षपदी मोहन जोशी यांची निवड
BJPs Chandrapur MLA Kishore Jorgewar criticized Congress leaders are not doing anything but only talking
काँग्रेसचे नेते करत काहीच नाही; केवळ…
The Karanja Sub Bazar Committees board was dismissed and an administrator appointed
महायुती एक्टिव मोडवर! बाजार समिती बरखास्त करीत खासदार गटास दिला झटका.

सतराव्या लोकसभेमध्ये १४८ भाजपा खासदारांनी शेती हा आपला व्यवसाय असल्याचे घोषित केले होते. त्याखालोखाल काँग्रेसचे १६, द्रमुकचे सात, समाजवादी पार्टीचे सहा व तृणमूल काँग्रेसचे दोन खासदार शेती व्यवसायात होते. द्रमुक आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार बऱ्यापैकी तेवढेच राहिले असून, काँग्रेस आणि समाजवादी पार्टीने आपल्या खासदारांच्या संख्येत कमालीची वाढ केली आहे. त्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये दमदार कामगिरी केल्यामुळे भाजपाच्या खासदारांची संख्या या लोकसभेमध्ये घटली आहे. सामाजिक कार्य या क्षेत्राचा विचार केल्यास, १८ व्या लोकसभेतील एकूण खासदारांपैकी ११५ म्हणजेच २१.२२ टक्के खासदार या क्षेत्रात कार्यरत आहेत. मागील लोकसभेपेक्षा १३.१३ टक्क्यांनी या क्षेत्रात कार्यरत असलेल्या खासदारांची संख्या घटली आहे. मागील लोकसभेमधील १९२ खासदार (३४.३५ टक्के) या क्षेत्रात कार्यरत होते. भाजपाचे सर्वाधिक म्हणजेच ५२ खासदार सामाजिक कार्यात आहेत. मागील लोकसभेमध्ये भाजपाचे ९८ खासदार या क्षेत्रात होते; मात्र आता ती संख्या घटल्याचे चित्र आहे. सामाजिक कार्यात असणारे काँग्रेस आणि समाजवादी पार्टीचे खासदार मागील लोकसभेशी तुलना करता, वाढल्याचे दिसून येते. सामाजिक कार्यात असलेल्या काँग्रेसच्या खासदारांची संख्या २२ वरून २५ वर गेली आहे; तर समाजवादी पार्टीच्या खासदारांची संख्या तीनवरून आठवर गेली आहे. तृणमूल काँग्रेस आणि द्रमुकच्या सामाजिक कार्यात असलेल्या खासदारांची संख्या घटली आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार १० वरून नऊ; तर द्रमुकचे चारवरून एकवर इतकी घटली आहे.

बऱ्याच खासदारांनी आपण उद्योजक असल्याचे घोषित केले आहे. उद्योजक असलेल्या खासदारांची संख्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. एकूण सभागृहातील १८.४५ टक्के म्हणजेच १०० खासदार उद्योजक आहेत. मात्र, मागील लोकसभेच्या तुलनेत उद्योग क्षेत्रात कार्यरत असलेल्या खासदारांची संख्यादेखील ७.३१ टक्क्यांनी घटली आहे. मागील लोकसभेमध्ये २५.७६ टक्के म्हणजेच १४४ खासदार उद्योग क्षेत्रात कार्यरत होते. काही खासदारांनी आपला नेमका काय उद्योग आहे, याचीही माहिती दिली आहे. १८ व्या लोकसभेमध्ये एक खासदार ऑटोमोबाइल विक्रेता, दोन खासदार बांधकाम व्यवसायात, तर दोन दळणवळण व्यवसायात आहेत. मागील लोकसभेमध्ये ११ खासदार बांधकाम व्यवसायात होते. तीन व्यापारी, तर १५ उद्योगपती होते. दोन दळणवळण उद्योगात, तर दोन तेलाशी संबंधित उद्योगामध्ये होते. ड्रायव्हिंग स्कूल, पर्यटन क्षेत्र, ज्वेलरी, हॉटेल, केमिकल व फार्मास्युटिकल कंपनी अशा क्षेत्रांतही प्रत्येकी एक याप्रमाणे खासदार कार्यरत होते. सध्या सभागृहामध्ये भाजपाचे ४८ खासदार उद्योजक आहेत. मागील लोकसभेमध्ये भाजपाचे ७८ खासदार उद्योजक होते. उद्योग क्षेत्रामध्ये असलेल्या काँग्रेसच्या खासदारांची संख्या नऊवरून १९ वर गेली आहे; तर समाजवादी पार्टीचा एक, द्रमुकचे सहा (आधी ११ होते) आणि तृणमूल काँग्रेसचे तीन (आधी दोन होते) खासदार उद्योग क्षेत्रात आहेत. सभागृहात असलेले सगळेच खासदार आता राजकारणी असले तरीही एकूण सभागृहाच्या १२.९२ टक्के म्हणजे ७० खासदारांनी आपले कामकाजाचे क्षेत्र राजकारण असल्याचे घोषित केले आहे. मागील लोकसभेमध्ये ६९ खासदारांनी आपण राजकारणी अथवा राजकीय कार्यकर्ता असल्याचे घोषित केले होते. मागील लोकसभेमध्ये भाजपाचे २९ खासदार राजकारणी होते; आता ही संख्या २७ वर आली आहे. काँग्रेसची संख्या १० वरून ११ वर गेली आहे; तर समाजवादी पार्टीची तीनवरून सातवर गेली आहे. द्रमुक आणि तृणमूल काँग्रेसच्या संख्येत मात्र घट झाली आहे. द्रमुकची संख्या तीनवरून एकवर; तर तृणमूलची संख्या तीनवरून दोनवर गेली आहे.

हेही वाचा : समलैंगिक अत्याचारप्रकरणी प्रज्ज्वल रेवण्णाच्या भावाला अटक; कोण आहे सूरज रेवण्णा?

कायद्याशी संबंधित व्यवसायात गुंतलेल्या खासदारांची संख्या ३९ असून, एकूण सभागृहाच्या ७.२ टक्के आहे. यातील बऱ्यापैकी खासदार वकील आहेत; तर कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अभिजित गंगोपाध्याय भाजपाच्या तिकिटावर निवडून आले आहेत. १७ व्या लोकसभेमध्ये एकूण सभागृहाच्या ८.४१ टक्के म्हणजेच ४७ खासदार या क्षेत्रात कार्यरत होते. वैद्यकिय व्यवसायामध्ये एकूण सभागृहाच्या ५.१७ टक्के म्हणजेच २८ खासदार कार्यरत आहेत. त्यातील दोन हृदयरोग तज्ज्ञ; तर एक क्ष किरणतज्ज्ञ आहेत. मागील लोकसभेमध्ये ३७ म्हणजेच ६.६२ टक्के खासदार डॉक्टर होते. चित्रपट, टीव्ही व संगीत क्षेत्राशी संबंधित खासदारांची संख्या या लोकसभेमध्ये घटली आहे. मागील लोकसभेमध्ये ३.९४ टक्के म्हणजेच २२ खासदार; तर या लोकसभेमध्ये २.२१ टक्के म्हणजेच १२ खासदार या क्षेत्रात कार्यरत आहेत. नव्या लोकसभेमध्ये तीन खेळाडूही आहेत. त्यापैकी दोन क्रिकेटपटू आहेत. १७ व्या लोकसभेमध्ये क्रीडा क्षेत्राशी संबंधित सहा खासदार होते. काही खासदारांनी इतरांहून फारच वेगळा व्यवसाय घोषित केला आहे. तेलुगू देसम पार्टीचे खासदार जी. एम. हरीश बालयोगी यांनी आपण ‘तंत्रज्ञ’ असल्याचे घोषित केले आहे; तर दुसरीकडे तुरुंगातून अपक्ष निवडणूक लढवून जिंकलेल्या अमृतपाल सिंग यांनी आपण ‘आई-वडिलांवर अवलंबून’ असल्याचे शपथपत्रात घोषित केले आहे.

Story img Loader