Kumbh Mela 1954 stampede Congress government : २९ जानेवारी २०२५ रोजी प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात मौनी अमावस्येच्या दिवशी चेंगराचेंगरी झाली. या घटनेत ३० जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले. या घटनेवरून विरोधकांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीकेची झोड उठवली आणि त्याचे पडसाद संसदेतही उमटले. मात्र, कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाल्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी १९५४ मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर पहिला कुंभमेळा अलाहाबाद (आता प्रयागराज) येथे आयोजित करण्यात आला होता. या भव्य कुंभमेळ्याला प्रमुख राजकीय व्यक्तींसह ४० लाखांहून अधिक यात्रेकरूंनी हजेरी लावली होती. त्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत शेकडो भाविकांचा मृत्यू झाला. मृतांची संख्या ३५०-४०० होती, परंतु अंदाजानुसार ही संख्या ८०० पर्यंत पोहोचली होती. १९५४ च्या कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीचा मुद्दा संसदेत उपस्थित करण्यात आला होता. गांधीवादी विचारवंत आणि स्वातंत्र्यसैनिक जे. बी. कृपलानी यांनी त्याचवर्षी १७ फेब्रुवारी रोजी सभागृहात हा मुद्दा मांडला. त्यावेळी केंद्रात आणि उत्तर प्रदेशात काँग्रेसची सत्ता होती. कृपलानी यांनी मृतांच्या अंत्यविधीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आणि तत्कालीन काँग्रेस सरकारच्या ‘व्हीआयपी संस्कृती’वर टीका केली होती. केवळ विधी पाळल्याने लोकांना त्यांच्या पापांपासून मुक्ती मिळणार नाही, असं ते म्हणाले होते.

आणखी वाचा : Parliament Sessions : काम वाढलं पण दिवस घटले; लोकसभेसह देशातील विधानसभांचं कामकाज कसं कमी होत गेलं? काय सांगते आकडेवारी?

चेंगराचेंगरीनंतर कृपलानी काय म्हणाले होते?

लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेदरम्यान कृपलानी म्हणाले, “राष्ट्रपतींनी अलाहाबादमध्ये कुंभमेळ्यादरम्यान झालेल्या दुर्दैवी घटनेचा उल्लेख केला आहे. आम्ही या सभेत या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांबद्दल शोक व्यक्त केला आहे, परंतु हे पुरेसे नाही. भविष्यात अशा घटना टाळायच्या असतील तर आपण स्वतःला निर्दोष ठेवणे आवश्यक आहे. जर आपण निर्दोष नसलो तर आपण कुठे चुकलो हे शोधून काढावे लागेल.” स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्षाचा दृष्टिकोन कसा बदलला हे कृपलानी यांनी भरसभागृहात सांगितलं. त्यांनी काँग्रेस पक्षाच्या धर्मनिष्ठतेबद्दल आणि अंधश्रद्धांबद्दलच्या दृष्टिकोनावर प्रश्न उपस्थित केले.

गांधीवादी विचारांची करून दिली आठवण

कृपलानी यांनी महात्मा गांधी यांच्या हरिद्वार येथील कुंभमेळ्यातील सहभागाची आठवण करून दिली. ते म्हणाले, गांधीजींनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गंगेच्या पवित्र पाण्यात डुबकी मारणे किंवा डोक्यावर पाणी शिंपडल्याने पापे धुतली जातील आणि पवित्रता प्राप्त होईल असे कधीही मानले नाही. आम्हीही अशा विचारांना निरर्थक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या विरोधात मानले, ज्यावर आम्ही गर्व करीत होतो. कुंभमेळ्यातील शेकडो नागा साधूंची मिरवणूकही आम्हाला फारशी उत्साहवर्धक वाटली नाही, असंही कृपलानी यांनी स्पष्ट केलं.

भारतीय संस्कृतीवर टाकला होता प्रकाश

भारताच्या सांस्कृतिक वारशाचा खरा अर्थ काय यावरही कृपलानी यांनी प्रकाश टाकला. ते म्हणाले, “जेव्हा आपल्यापैकी काहींनी भारतीय संस्कृतीचा पुनर्शोध घेतला, तेव्हा प्राचीन विचारसरणीत, तत्वज्ञानात आणि इतिहासात आपला देश महान प्रगतीत होता. आपल्या प्राचीन वास्तुकला, शिल्पकला, विचारधारा, तत्त्वज्ञान, विज्ञान, गणित, ज्योतिष आणि वैद्यकशास्त्रातील प्रगती अफाट होत्या. आपले पूर्वज साहित्य, नाटक, कविता, संगीत आणि नृत्य यांचे सौंदर्य पाहत होते. ते रानटी थाटमाट, धार्मिक विधी, पूजा आणि विविध सणांचे प्रदर्शन आणि त्याचे रंगीत उत्सव करत नव्हते.”

‘रानटी उत्सव’ हा शब्द वापरल्याने वाद

दरम्यान, ‘रानटी उत्सव’ हा शब्द वापरल्याबद्दल अनेक खासदारांनी त्यावर आक्षेप घेतला, तेव्हा कृपलानी यांनी असा युक्तिवाद केला की, हा शब्द इंग्रजी भाषेतील एक सामान्य वाक्यप्रचार आहे आणि त्याचा हेतू कोणत्याही धर्माचा अपमान करण्याचा नव्हता. खासदारांच्या आक्षेपानंतर कृपलानी यांनी ‘प्राचीन वैभव’ हा शब्द वापरण्याचा निर्णय घेतला. ते म्हणाले की, “आपल्या पूर्वजांनी कुंभमेळ्यासारख्या कार्यक्रमांची कधीही जाहिरात केली नाही, पण आता आपण काय करत आहोत? आम्ही कुंमेळ्याचा मोठ्या प्रमाणात प्रचार केला आणि सर्वांना तिथे येण्याचे आमंत्रण दिले. भाविकांना आश्वासन देण्यात आले की, महाकुंभात सहभागी झाल्यानंतर तुम्हाला तिथे सर्व सुविधा मिळतील. परंतु, त्यांची फरफट झाली आणि शेवटी अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. पूर्वजांनी असे कधीच केले नव्हते, उलट ते अशा परिस्थितींपासून लोकांना सावध करीत होते.”

हेही वाचा : CEC Rajiv Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून राजीव कुमार यांचा कार्यकाळ कसा राहिला?

राज्यपालांच्या भूमिकेवर केली होती टीका

कुंभमेळ्यातील कार्यक्रमाच्या आयोजनातील बदलांवर भाष्य करताना गांधीवादी नेत्याने तत्कालीन उत्तर प्रदेशच्या राज्यपालांनी कुंभमेळ्यात शिबिर स्थापन केल्याचा उल्लेख केला, ज्यावर अनेक खासदारांसह उपसभापतींनी आक्षेप घेतला. उच्चपदस्थ व्यक्तींच्या भूमिकेवर सभागृहात चर्चा करू नये, असे मत त्यांनी व्यक्त केले. प्रत्युत्तरात कृपलानी म्हणाले, “मला नक्कीच सभागृहात आक्षेपार्ह असलेल्या सर्व गोष्टी टाळायच्या आहेत, परंतु राज्यपालांनी साधूंच्या आणि नागा साधूंच्या छावण्यांमध्ये जाऊन भाषणं दिली, ज्यामुळे या साधू संघटनांनी काँग्रेस सरकाराला पाठिंबा दिला आणि सत्ताधाऱ्यांचे हात आणखीच बळकट केले.”

कुंभमेळ्याच्या आयोजनातील बदलांवर प्रश्नचिन्ह

कृपलानी म्हणाले, “या धार्मिक संस्था राजकीय पक्षांच्या वादात ओढल्या जात आहेत, ज्यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचू शकते. ब्रिटीश सरकारच्या काळातही साधू संघटनांनी सरकारशी निष्ठा असल्याचे ठराव मंजूर केले होते. माझे असे मत आहे की, या प्रथा धार्मिक संस्थांची प्रतिष्ठा कमी करतात आणि त्यांना वादग्रस्त पक्ष-राजकारणात खेचून आणतात. धर्माच्या नावाखाली अशा राजकीय हस्तक्षेपांना प्रोत्साहन देणे योग्य नाही.” दरम्यान, कृपलानी यांच्या भाषणामुळे कुंभमेळ्याच्या आयोजनातील बदलांवर आणि उच्चपदस्थ व्यक्तींच्या सहभागावर प्रश्न उपस्थित झाले, ज्यामुळे भविष्यातील आयोजनांमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता अधोरेखित झाली.

Story img Loader