राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होणाऱ्या खासदारांपैकी दोघांना केंद्रीय मंत्रिमंडळात सामावून घेतले जाण्याची शक्यता आहे. त्यात एक केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपद तर दुसरे राज्यमंत्रीपद असेल आणि मुंबई महापालिका डोळ्यांसमोर ठेवून राहुल शेवाळे यांना त्यात संधी मिळू शकते. 

महाराष्ट्रात शिवसेनेची साथ सोडून आपल्या सोबत सरकार स्थापन करणाऱ्या गटाचे नेते एकनाथ शिंदे यांना भाजपने थेट मुख्यमंत्रीपद दिले. मंत्रिमंडळ विस्तारात काही प्रमुख खाती देण्याचेही आश्वासन दिले आहे, असे बोलले जाते. त्याच धर्तीवर शिवसेनेची साथ सोडून शिंदे गटात येणाऱ्या खासदारांनाही केंद्र सरकारमधील सत्तेचे लाभ देण्यात येतील अशी चर्चा सुरू झाली आहे. केंद्र सरकारमध्ये शिंदे गटातील खासदारांपैकी एकाला कॅबिनेट मंत्रीपद तर अन्य एकास राज्य मंत्रीपद मिळू शकते. शिवसेना रालोआमधून बाहेर पडण्याआधी शिवसेनेकडे केंद्रीय मंत्रिमंडळातएक कॅबिनेट मंत्रीपद होते. अरविंद सावंत हे अवजड उद्योग खात्याचे कॅबिनेट मंत्री होते. तसेच शिवसेनेला दुसरे राज्यमंत्रीपद देण्याची भाजप नेत्यांची तयारी होती. तोच प्रस्ताव शिंदे गटाला देण्यात येईल अशी शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडून काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. त्यावेळी अरविंद सावंत यांना केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे एक प्रकारे शिवसेनेच्या वाट्याची केंद्रीय मंत्रिमंडळातील पदे शिंदे गटाला देऊन खासदारांना खूष करता येईल.

खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेनेने भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी जाहीर मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यामुळे ठाकरे यांच्यावर दबाव निर्माण झाला होता. राहुल शेवाळे यांचे हे योगदान आणि मुंबई महापालिकेतील माजी स्थायी समिती अध्यक्ष या नात्याने शेवाळे यांची मुंबई महापालिका निवडणुकीतील उपयुक्तता यांचा विचार करून  त्यांना कॅबिनेट मंत्री पद देण्यात येईल. तर उर्वरित महाराष्ट्रातून ग्रामीण भागातून एखाद्या खासदारास राज्यमंत्रीपद देण्यात येईल अशी चर्चा सुरू झाली आहे. 

Story img Loader