मुंबई : पश्चिम उपनगरातील वर्सोवा विधानसभा मतदारसंघात यंदा इच्छुकांची अक्षरश: मांदियाळी आहे. काँग्रेस पक्षाकडून तब्बल २१ इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांना याच मतदारसंघातून सुमारे २१ हजारांचे मताधिक्य मिळाले. त्यामुळे वर्सोवा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. मुस्लीम मतदारांची संख्या जास्त असलेला हा मतदार संघ शिवसेना (ठाकरे) पक्षालाही हवा आहे.

वर्सोवा मतदारसंघातून भाजपच्या सहयोगी पक्ष असलेल्या ‘शिवसंग्राम’ पक्षाच्या भारती लव्हेकर या तिसऱ्यांदा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. नुकताच त्यांनी भाजपमध्ये प्रवेशही केला होता. परंतु त्यांचे नाव भाजपने पहिल्या यादीत जाहीर न केल्यामुळे भाजपमधूनही या मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवारांनी आपली ताकद पणाला लावली आहे. या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून भाजपच्या उत्तर भारतीय मोर्चाचे संजय पांडे यांनी जोर लावला आहे. त्याचबरोबर रघुनाथ कुलकर्णी यांचेही नाव चर्चेत आहे.

हेही वाचा >>> शेकाप ‘मविआ’तील समावेशाबाबत आशावादी; विधानसभेसाठी पाच उमेदवारांची घोषणा

अंधेरीपासून जवळ असलेल्या वर्सोवा मतदारसंघाने गेल्या निवडणुकीत ठाकरे गटाला चांगलीच साथ दिली. ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांना याच मतदारसंघातून सुमारे २१ हजारांचे मताधिक्य मिळाले. त्यामुळे या मतदार संघावर काँग्रेस शिवसेना या दोन्ही पक्षांनी दावा केला आहे.

बंडखोरीची शक्यता

शिवसेनेतून या मतदारसंघासाठी तीन मोठी नावे चर्चेत आहेत. त्यात माजी नगरसेविका राजुल पटेल, राजू पेडणेकर आणि काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले माजी नगरसेवक देवेंद्र आंबेरकर यांची नावे चर्चेत आहेत. इच्छुकांची संख्या सर्वच पक्षातून मोठी असल्यामुळे या मतदारसंघात बंडखोरीचाही फटका बसण्याची शक्यता आहे.

जावयाच्या उमेदवारीसाठी प्रयत्न

वर्सोवा मतदार संघासाठी काँग्रेसकडून तब्बल २१ उमेदवार इच्छुक आहेत. त्यात माजी मंत्री सुरेश शेट्टी, माजी आमदार बलदेव कोसा यांची नावे आघाडीवर आहेत. तर अन्य नावांमध्ये नुकतेच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले माजी पोलीस आयुक्त संजय पांडे, युवक काँग्रेसचे अखिलेश यादव, भावना जैन, अवनिश सिंग, मोनिका जगताप आदी इच्छुक आहेत. तर आमदार अस्लम शेख यांनी आपल्या जावयासाठीही प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे.